पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (नेट)/ स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट (सेट) या दोन परीक्षा महत्त्वाच्या असतात. कारण या परीक्षांद्वारे त्यांचा अध्यापक होण्याचा मार्ग मोकळा होतो. तसेच ज्यांना संशोधनकार्यात रस आहे त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात जाण्याची संधी मिळते.

नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक (असिस्टंट प्रोफेसर) या पदासाठी पात्र ठरतात. ही परीक्षा उत्तीर्ण उमेदवार विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेल्या देशातील कोणत्याही महाविद्यालयातील साहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करू शकतात. (सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता प्रदान केलेल्या राज्यातीलच महाविद्यलयातील साहाय्यक अध्यापकाच्या पदाच्या नियुक्तीसाठी पात्र ठरतात.)

यूजीसी-सीएसआयआर-नेट

द कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल रिसर्च ही संस्था यूजीसी-सीएसआयआर-नेट ही परीक्षा विज्ञान विषयांसाठी घेते. नेट आणि यूजीसी-सीएसआयआर-नेट ही परीक्षा दरवर्षी जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. जून महिन्याच्या परीक्षेची सूचना व विस्तृत माहिती मार्च महिन्यात रोजगार समाचार किंवा एम्प्लॉयमेंट न्यूज या साप्ताहिकात प्रकाशित केली जाते. जून महिन्यातील नेट परीक्षेचा निकाल ऑक्टोबरमध्ये घोषित केला जातो. डिसेंबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षेची सूचना व विस्तृत माहिती सप्टेंबर महिन्यात रोजगार समाचार या साप्ताहिकात प्रकाशित केली जाते. डिसेंबर महिन्यातील नेट परीक्षेचा निकाल पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित केला जातो

ज्या विद्यार्थ्यांना संशोधन अभ्यासक्रम करायचा आहे, त्यांना पाच वर्षांसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप दिली जाते. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत प्रत्येक विद्यापीठाला विशिष्ट संख्येत फेलोशिप निर्धारित केली जाते. या परीक्षेत सर्वोच्च गुण प्राप्त विद्यार्थ्यांची निवड फेलोशिपसाठी होत असते. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना अध्यापकपदासाठी नियुक्ती की फेलोशिपसाठी निवड हा पर्याय अर्ज भरताना द्यावा लागतो. फेलोशिपचा पर्याय दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप १९८४ सालापासून दिली जात आहे.

यूजीसी/सीएसआयआर-नेट ही ज्युनिअर रिसर्च फेलोशिपची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अध्यापकपदाच्या नियुक्तीसाठी पात्र ठरतात. वेगवेगळी विद्यापीठे, आयआयटी आणि इतर राष्ट्रीय संस्थांमधील मिळालेल्या स्थानानुसार वेगवेगळ्या योजनांमध्ये त्यांना फेलोशिप दिली जाते.

विषय- ही परीक्षा एकूण ९४ विषयांमध्ये देता येते.

ग्रंथालय आणि माहिती शास्त्र/ बुद्धिस्ट, जैन, गांधीयन स्टडीज आणि शांततेचा अभ्यास/ धर्माचा तुलनात्मक अभ्यास/ जनसंवाद आणि पत्रकारिता/ सादरीकरण कला-नृत्य, नाटय़, रंगमंच/ संस्कृत पारंपरिक विषय (ज्योतिष सिद्धांत, ज्योतिष नवे व्याकरण, व्याकरण मीमांसा, न्याय, शंकर योग, तुलनात्मक दर्शन, शुक्ल यजुर्वेद, माधव वेदांत, धर्मशास्त्र, साहित्य, पुराण इतिहास, आगम)/ तुलनात्मक साहित्य/ लोक साहित्य/ आदिवासी आणि प्रांतिक भाषा व साहित्य/ गुन्हेगारीशास्त्र/ पुरातत्त्वशास्त्र/ वस्तुसंग्रहालये आणि संवर्धन/ महिलांविषयक अभ्यास, दृष्य कला (चित्रकला/ पेंटिंग/ शिल्पकला/ ग्राफिक्स/ उपयोजित कला/ कलेचा इतिहास), भूगोल, सामाजिक औषधे आणि सार्वजनिक आरोग्य, पाली, कोंकणी, संगणकशास्त्र आणि उपयोजिता, इलेक्ट्रॉनिक्सशास्त्र, पर्यावरणशास्त्र, राज्यशास्त्र यामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध/ आंतरराष्ट्रीय अभ्यास (सुरक्षा/ रणनीतीचा अभ्यास, पश्चिम आशियाचा अभ्यास, दक्षिण-पूर्व आशियाचा अभ्यास, अफ्रिकेचा अभ्यास, दक्षिण आशियाचा अभ्यास, सोव्हिएत रशियाचा अभ्यास, अमेरिकेचा अभ्यास.) कामगार कल्याण/ व्यक्तिगत व्यवस्थापन/ औद्योगिक संबंध/ कामगार आणि समाज कल्याण/ मनुष्यबळ व्यवस्थापन/ भारतीय संस्कृती/ अरेबियन संस्कृती आणि इस्लामचा अभ्यास/ शारीरिक शिक्षण/ प्रौढ शिक्षण/ निरंतर शिक्षण/ प्रौढ शिक्षण पद्धती/ अनौपचारिक शिक्षण/ जॅपनीज/ जर्मन/ राजस्थानी/ पर्शियन/ रशियन/ विधि, मराठी, फ्रेंच (इंग्रजी आणि फ्रेंच रूप) मराठी/ गुजराती/ आसामी/ मणिपुरी/ नेपाली/ डोग्री/ मँड्रीन/ अरेबिक/ उर्दू/ संस्कृत/ पंजाबी/ ओरिआ/ मलयालम/ कन्नड/ हिंदी/ बंगाली/ मैथिली/ पाली/ प्राकृत व्यवस्थापन (मार्केटिंग/ कोऑपरेटिव्ह/ फायनान्शिअल/ पर्सनल/ इंडस्ट्रिअल रिलेशन अ‍ॅण्ड पर्सनल मॅनेजमेंट/ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन)

समाजशास्त्र/ इतिहास/ मानववंशशास्त्र/ वाणिज्य/ अध्यापन/ समाजकार्ये/ गृहविज्ञान/ संगीत/ लोकसंख्येचा अभ्यास/ लोक प्रशासन/ पर्यटन प्रशासन आणि व्यवस्थापन/ कर्नाटक संगीत/ रवींद्र संगीत/ मानव अधिकार आणि कर्तव्ये/ योग/ अर्थशास्त्र/ ग्रामीण अर्थशास्त्र/ सहकार/ विकास नियोजन/ विकास अभ्यास/ उपयोजित अर्थशास्त्र/ विकासात्मक अर्थशास्त्र/ व्यावसायिक अर्थशास्त्र/ लोकसंख्याशास्त्र, इत्यादी.

अर्हता-  खुल्या संवर्गातील उमेदवारांसाठी पदव्युत्तर परीक्षेत ५५ टक्के गुण आणि नॉन क्रिमीलेअर इतर मागास वर्ग वा अनुसूचित जाती आाणि जमाती संवर्गातील उमदेवारांसाठी ५० टक्के गुण आवश्यक. पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असलेले उमेदवार या परीक्षेला बसू शकतात. तथापि निर्धारित मुदतीत संबंधित उमेदवाराच्या परीक्षेचा निकाल लागायला हवा व त्यास विहित केलेली टक्केवारी मिळायला हवी. ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) परीक्षा घेतली जाते. मात्र परीक्षा घेणे व निकाल घोषित करणे यापुरताच बोर्डाचा अधिकार मर्यादित आहे. नेट उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यूजीसी-नेट ब्युरोमार्फत दिले जाते.

अशी असते परीक्षा

या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात. पेपर एकसाठी एक तासाचा वेळ आहे. एकूण गुण असतात- १००. या पेपरमध्ये ५० प्रश्न विचारले जातात. त्यापैकी पन्नास प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रत्येक अचूक उत्तराला दोन गुण दिले जातात. पेपर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो. विद्यार्थ्यांचा अध्यापनाकडे असलेला कल व क्षमता तसेच संशोधन कार्याकडे असलेला कल तपासणीसाठी या पेपरमधील प्रश्नांची रचना केली जाते. या पेपरमध्ये कार्यकारणभाव, सामान्य अध्ययन, वैविध्यपूर्ण विचार करण्याची क्षमता आणि आकलन क्षमता याची चाचपणी करणारे प्रश्न विचारले जातात.

पेपर दोनचा कालावधी दोन तास असतो. एकूण गुण असतात- २००. या पेपरमध्ये ५० प्रश्न विचारले जातात. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रत्येक अचूक उत्तराला दोन गुण दिले जातात. पेपर बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचा असतो. हा पेपर ज्या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असेल, त्याच्याशी संबंधित असतो. दोन्ही पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या संवर्गातील उमेदवारास सरासरीने ४० टक्के  आणि राखीव संवर्गातील उमेदवारास सरासरीने ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांने संबधित विषयाचे ज्ञान कशा पद्धतीने ग्रहण केले आहे, त्यास संकल्पना किती कळल्या आहेत, याची चाचपणी करणारे प्रश्न विचारले जातात. विद्यापीठीय परीक्षेपेक्षा अधिक सखोल व परिपूर्ण तयारी करणे आवश्यक ठरते. विद्यापीठाने सुचवलेली पुस्तके आणि संदर्भ साहित्याचा अभ्यास करायला हवा.

ही परीक्षा देशातील ९१ केंद्रांवर घेतली जाते. महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे – अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, पुणे.

संपर्क- हेड, यूजीसी-नेट ब्युरो, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, साऊथ कॅम्पस, न्यू दिल्ली- ११००२१,

दूरध्वनी- ०११-२४११६३१६

संकेतस्थळ – http://www.ugc.ac.in  सेट परीक्षेसाठी राज्याची नोडल संस्था म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची नियुक्ती करण्यात आली आहे.