नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा

संशोधन संस्था म्हणजे प्रत्येक देशासाठी एक तगडी गुंतवणूक असते. कारण तिथे केल्या जाणाऱ्या संशोधनाचे परिणामच देशाचे भविष्य ठरवत असतात. अशाच संशोधन संस्थांची माहिती करून घेऊयात, संशोधन संस्थायण या सदरातून दर गुरुवारी..

भारतातील सर्वोत्तम व सर्वाधिक सागरशास्त्रज्ञ असलेली संस्था, सागर संशोधनासाठी आवश्यक व अनुरूप असलेल्या सर्व पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेले ठिकाण आणि सागरशास्त्रामधील शिक्षण व संशोधनाचे एक प्रगत व अद्ययावत केंद्र या बिरुदांनी ओळखले जाणारी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी ही सीएसआयआरची (Council of Scientific and Industrial Research – वैज्ञानिक तथा औद्य्ोगिक अनुसंधान परिषद) देशातील एक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. गेली तब्बल ५० वर्षे ही संस्था देशाच्या सेवेत आहे.

संस्थेविषयी..

भारतीय सागरशास्त्रज्ञांनी १९६० साली इतर देशांमधील संशोधकांबरोबर International Indian Ocean Expedition ही आंतरराष्ट्रीय संशोधन मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. त्यानंतर मात्र भारतामध्येदेखील सागरशास्त्र (Oceanography) या विषयातील मूलभूत संशोधन करणारी संस्था असावी, अशी चर्चा इथल्या संशोधन जगतात मूळ धरू लागली. कदाचित, म्हणूनच मग भारत सरकारच्या विशेष प्रयत्नाने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) या सागरशास्त्रातील महत्त्वाच्या संशोधन संस्थेची स्थापना १ जानेवारी १९६६ रोजी झाली. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) या संशोधन संस्थेचे मुख्यालय गोव्यातील डोना पावला येथे आहे. संस्थेची कोची, मुंबई व विशाखापट्टणम या इतर तीन ठिकाणी प्रादेशिक केंद्रेदेखील आहेत.

संशोधनातील योगदान

एनआयओच्या स्थापनेपासूनच संस्थेमध्ये आंतरविद्याशाखीय संशोधनाला नेहमीच चालना व पुरेसा वाव दिला गेलेला आहे. आजघडीलासुद्धा संस्थेमध्ये सागरशास्त्रातील विविध शाखांमध्ये अनुक्रमे फिजिकल ओशनोग्राफी, केमिकल ओशनोग्राफी, बायोलॉजिकल ओशनोग्राफी, जिओलॉजिकल ओशनोग्राफी, मरिन इन्स्ट्रमेंटेशन, मरिन आर्किऑलॉजी यावर संशोधन चालू आहे. वरील संशोधन क्षेत्रांच्या नावावरूनच मुलभूत विज्ञानाचा सागरशास्त्राशी असलेला समन्वय लक्षात येतो. उपरोक्त सर्व संशोधन शाखांच्या माध्यमातून समुद्राचा विविध संशोधन मोहिमांच्या द्वारे शोध घेणे चालू असते. म्हणूनच एनआयओचे ब्रीदवाक्यही (Understanding the seas) तिच्या संशोधन कार्याशी साधम्र्य दाखवणारे आहे. त्यामुळेच की काय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आजतागायत या संस्थेमधील शास्त्रज्ञ व संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनत व हुशारीच्या जोरावर पाच हजारांपेक्षाही अधिक शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत. संस्थेकडे सागरी संशोधनासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधांनी सुसज्ज अशी दोन  जहाजे – आरव्ही सिंधू संकल्प व आरव्ही सिंधू साधना आहेत. एनआयओमध्ये खासगी औद्य्ोगिक क्षेत्राकडून प्रायोजित केलेले संशोधनही केले जाते. यामध्ये प्रामुख्याने महासागरीय माहिती संकलन, पर्यावरणीय प्रभाव मुल्यांकन, पर्यावरणीय प्रभावाचा अंदाज लावण्यासाठी केले जाणारे मॉडेलिंग इत्यादी विषयांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांसाठी विविध संधी

एनआयओ फक्त संशोधन संस्था नाही तर एक देशातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्रसुद्धा आहे. Academy of Scientific & Innovative Research (AcSIR)च्या अंतर्गत संस्थेमध्ये ‘स्कूल ऑफ ओशनोग्राफी’ची स्थापना केली आहे. या स्कूलच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी एनआयओमध्ये पीएचडीचे संशोधन करतात. तसेच, एनआयओ भारतातील व भारताबाहेरील अनेक विद्यापीठांशी पीएचडी अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. विद्यापीठांमध्ये पीएचडीचे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादीसारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी एनआयओमध्ये ठरावीक काळ (अगदी दोन महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतचा) व्यतीत करत असतात. तसेच दरवर्षी CSIR UF UGC च्या परीक्षांमधून गुणवत्ता प्राप्त केलेले अनेक जेआरएफ/ एसआरएफ विद्यार्थी इथे एनआयओमध्ये पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. सध्या तिथे १००  जेआरएफ / एसआरएफ विद्यार्थी सागरशास्त्रातील विविध विषयांत आपापल्या तज्ज्ञ संशोधक मार्गदर्शकांच्या मदतीने पीएचडीचे संशोधन पूर्ण करत आहेत. याव्यतिरिक्त, दरवर्षी विविध महाविद्यालये व विद्यापीठांमधील सुमारे तीनशेहून अधिक पदवी / पदव्युत्तर विद्यार्थी उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये आपापले संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात. महाविद्यालयीन जीवनात असतानाच तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचा अनुभव मिळावा यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान शाखांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांने प्रयत्नशील असावे व त्यासाठी एनआयओसारख्या कोणत्याही संशोधन संस्थेमध्ये सुट्टय़ांमध्ये संशोधन प्रकल्प मिळवण्यासाठी अर्ज करावेत.

संपर्क- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी, डोना पावला, गोवा – ४०३००४.

  • दूरध्वनी: +९१ (०)८३२- २४५०४५०.
  • ईमेल ocean@nio.org
  • संकेतस्थळ http://www.nio.org/