केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये तांत्रिक साहाय्यक पदावर उमेदवारांची निवड करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एनटीआरओ-टेक्निकल असिस्टंट एक्झामिनेशन – २०१७ ही पात्रता परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

जागांची संख्या व तपशील – निवड परीक्षेद्वारा भरण्यात येणाऱ्या एकूण जागांची संख्या ९९ असून त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स – उपलब्ध जागांची संख्या ६०. यापैकी २८ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी असून १३ जागा अनुसूचित जातीच्या, ५ जागा अनुसूचित जमातीच्या तर १४ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव आहेत.

टेक्निकल असिस्टंट कॉम्प्युटर सायन्स – उपलब्ध जागांची संख्या ३९. यापैकी १८ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी असून ८ जागा अनुसूचित जातीच्या, ४ जागा अनुसूचित जमातीच्या वर ९ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव आहेत.

शैक्षणिक पात्रता – अर्जदार खालीलप्रमाणे पात्रताधारक असायला हवेत.

टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स – अर्जदारांनी गणित वा भौतिकशास्त्र विषयांसह विज्ञान विषयातील पदवी वा इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन यासारख्या विषयांतील पदविका किंवा सैन्य दलांतर्गत तंत्रज्ञानविषयक पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे.

टेक्निकल असिस्टंट कॉम्प्युटर सायन्स- अर्जदारांनी गणित वा भौतिकशास्त्र या विषयांसह पदवी, कॉम्प्युटर अप्लिकेशनमधील पदवी वा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, संगणक विज्ञान, कॉम्प्युटर सायन्स व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यासारख्या विषयातील पदविका किंवा सैन्यदलांतर्गत संगणक तंत्रज्ञानविषयक पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे.

वयोमर्यादा – अर्जदारांचे वय ३० वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.

निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची लेखी निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर २६ व २७ ऑगस्ट २०१७ रोजी घेण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल व त्यामध्ये मुंबई केंद्राचा समावेश असेल. दोन तास कालावधीच्या या निवड परीक्षेत ४०० गुणांचे १०० प्रश्न असतील. निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. त्याआधारेच त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.

वेतनश्रेणी व भत्ते – निवड झालेल्या उमेदवारांना नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये टेक्निकल असिस्टंट म्हणून दरमहा ३५,४००- १,१२,४०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. या वेतन श्रेणीशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदे पण देय असतील.

अधिक माहिती व तपशिलासाठी – वरील निवड परीक्षेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशनची एनटीआरओ टेक्निकल असिस्टंट एक्झामिनेशन २०१७ ची जाहिरात पाहावी अथवा एनटीआरओच्या http://ntro.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०१७ आहे. विज्ञान विषयातील पदवीधर वा संगणकशास्त्र विषयातील पात्रताधारकांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञानासह संशोधन कार्यात करिअर करायचे असल्यास त्यांनी या निवड पात्रता परीक्षेचा अवश्य लाभ घ्यावा.