प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर

ugc marathi news, ugc academic year marathi news
शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार? युजीसीने दिल्या सूचना…
corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
oil companies latest marathi news
तेल कंपन्यांची हजारो डॉलरची बचत करणार ‘सिली’ उपकरण… काय आहे संशोधन?

विद्यापीठाची ओळख

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर हे २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जगातले अकराव्या क्रमांकाचे, तर आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ आहे. सिंगापूरमधील इतर दोन प्रमुख विद्यापीठ – नानयांग विद्यापीठ आणि सिंगापूर विद्यापीठ यांना एकत्र करून ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर’ची स्थापना १९८० साली करण्यात आली. एनएसयू या नावाने ओळखले जाणारे हे विद्यापीठ सिंगापूरमधील स्वायत्त संशोधन विद्यापीठ असून आशिया खंडातील एक प्रमुख संशोधन विद्यापीठ आहे. विद्यापीठात विज्ञान, औषध आणि दंतचिकित्सा, आरेखन आणि पर्यावरण, कायदा, कला आणि सामाजिक विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, संगणक आणि संगीत या विषयांतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील विविध अभ्यासक्रमांचे अध्ययन-संशोधन केले जाते. १९०५ मध्ये किंग एडवर्ड (सातवे) यांनी कॉलेज ऑफ मेडिसीन म्हणून ज्या वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली होती त्याला एनयूएसमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे, म्हणूनच वैद्यकीय अभ्यासक्रम विचारात घेतल्यास एनएसयू ही सिंगापूरमधील सर्वात जुनी उच्च शिक्षण संस्था आहे.

सिंगापूरच्या दक्षिण-पश्चिमेला असलेल्या केंट रिज परिसराजवळ एनयूएस विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस आहे. तसेच शहरात इतर ठिकाणी विद्यापीठाचे प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, महाविद्यालये आणि शैक्षणिक रुग्णालये इत्यादी गोष्टी पसरलेल्या आहेत. सध्या एनएसयूमध्ये अडीच हजारपेक्षाही अधिक तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत, तर शंभर देशांतील जवळपास छत्तीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सतरा शैक्षणिक-संशोधन विभागांद्वारे चालतात.

अभ्यासक्रम

एनएसयू विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम तीन ते चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी कला, विज्ञान, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. विद्यापीठ सर्व अभ्यासक्रम चालवण्यासाठी सेमिस्टर पद्धतीचे पालन करते. ब्रिटिश आणि अमेरिकन शैक्षणिक वातावरणाचा एक सुरेख मेळ विद्यापीठाच्या एकंदरीत शैक्षणिक वातावरणात पाहायला मिळतो. एनएसयूच्या तीन कॅम्पसमध्ये एकूण सतरा शैक्षणिक विभाग म्हणजे स्कूल्स आहेत. विद्यापीठातील कला आणि समाजशास्त्रे, व्यवसाय, संगणक, दंतवैद्यक, अभियांत्रिकी, कायदा अभ्यासक्रम, संगीत, सामाजिक आरोग्य, सामाजिक धोरणे, शास्त्रे, वैद्यकशास्त्र, डिझाइन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट, इंटिग्रेटिव्ह सायन्सेस अ‍ॅण्ड इंजिनीअिरग, युनिव्हर्सिटी स्कॉलर्स प्रोग्राम, येल-एनयूएस कॉलेज या सतरा प्रमुख विभागांमार्फत विद्यापीठातील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टििफकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या-त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा

एनएसयू विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच वसतिगृहांची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय वसतिगृह आणि हॉल्स ऑफ रेसिडेन्सेस यांदरम्यान विद्यार्थ्यांसाठी सहा हजारांहूनही अधिक निवासस्थानांची सुविधा उपलब्ध केलेली आहे. तसेच शहराच्या इतर भागांतून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बसची सोयही करण्यात आलेली आहे. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पाठय़वृत्तीच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हेल्थ इन्शुरन्स व इतर वैद्यकीय सुविधा विद्यापीठाकडून दिल्या जातात.

वैशिष्टय़

सिंगापूरचे आजवरचे चार पंतप्रधान व दोन राष्ट्रपती हे एनएसयू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजक आणि शास्त्रज्ञ निर्माण केले आहेत. संशोधनासाठी हे विद्यापीठ जागतिक पातळीवर नावाजले गेले आहे. विद्यापीठाकडून संशोधन क्षेत्रावर प्रचंड गुंतवणूक केली जाते. एनयूएसमधील प्रमुख संशोधन हे जैववैद्यकीय, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, नॅनोसायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, इन्फोकम्युनिकेशन, इन्फोटेक्नॉलॉजी आणि संरक्षण या क्षेत्रांतील संशोधन आहे.

संकेतस्थळ  http://nus.edu.sg/