वैद्यकीय आणि अभियांत्रिकीला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात नीट, जेईई या परीक्षांविषयी शंका असतात. त्यावरच लोकसत्ता मार्ग यशाचाह्ण या कार्यशाळेमध्ये  प्रा. किशोर चव्हाण, प्रा. निर्मलकुमार कुर्वे, प्रा. विनायक काटदरे, प्रा. रजनीकांत भट  आणि प्रा. दत्तात्रय नेरकर यांनी मार्गदर्शन केले.

परीक्षेत ९०-९५ टक्के मिळाले म्हणजे आपण खूपच हुशार झाल्याचे विद्यार्थ्यांना वाटते.  पण असे नसते. दहावीचे गुण हे पुढे तसेच राहतील असे नाही.  नीट आणि जेईईसारख्या परीक्षांच्या बाबतीत तर हा  भ्रमाचा भोपळा लवकरच फुटतो.  या काही खूप कठीण  परीक्षा नव्हेत. फक्त यासाठी अभ्यास करताना संकल्पना आणि तिचा वापरही समजून घ्यावा लागतो.

जेईई मेन परीक्षेमध्ये एकूण नव्वद प्रश्न येतात. भौतिकशास्त्रात तीस प्रश्न, रसायनशास्त्रात तीस प्रश्न आणि गणितात तीस प्रश्न असे वर्गीकरण करण्यात येते. सर्वसामान्य महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई मेन परीक्षा उपयुक्त ठरते. जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा आयआयटी प्रवेशासाठी द्यावी लागते.  जेईई मेन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी विशिष्ट चांगले गुण प्राप्त केल्यास जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरतात. मेडिकलला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट या एकाच परीक्षेचा पर्याय उपलब्ध आहे. नीट परीक्षा संपूर्ण भारतात होत असल्याने तुलनेने ही परीक्षा कठीण आहे. जेईई आणि नीट या दोन्ही परीक्षांसाठी बारावीच्या पुस्तकांसोबत एनसीईआरटीची पुस्तके असणे, गरजेचे आहे.

अकरावीत प्रवेश घेतल्यावर सर्वप्रथम प्राध्यापकांकडून महत्त्वाचे विषय  जाणून घ्या. प्रश्न स्वत: सोडवून बुद्धिमत्ता वाढवायला हवी. प्रश्न सोडवण्याचे तंत्र समजून घ्यायला हवे. प्रत्येक विषयाला विशिष्ट वेळ देऊन अभ्यास करा. जो विषय जास्त चांगला सोडवता येतो त्या विषयाचे प्रश्न सुरुवातीला सोडवा. एखादा विषय वाचला आणि सोडून दिला असं करू नका. तो मनात घोळवत राहा. त्यातील प्रश्न सोडवून त्यासंबंधीच्या शंका शिक्षकांना विचारा. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त प्रश्न  बरोबर सोडवण्यासाठी सराव हवा. नुसतेच उत्तरे माहिती असण्याला महत्त्व नाही. ते सोडवण्याची पद्धतही माहिती असायला हवी. जेईईला जायचं म्हणजे बायो सोडायचं आणि नीटला जायचं म्हणजे गणित सोडायचं असं करू नका. नीटचा पेपर सोडवतानाही गणिताचा वापर करावा लागतोच.

अभ्यासासाठी पुस्तके

दिनेश प्रकाशनचे ऑब्जेक्टिव्ह्ज इन फिजिक्स, ऑब्जेक्टिव्ह्ज इन बायोलॉजी, ऑब्जेक्टिव्ह्ज इन केमिस्ट्री या पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी नक्की अभ्यास करावा. प्रदीप प्रकाशनचीही याच प्रकारची पुस्तके आहेत. तसेच एनसीआरटीचे फिंगर टिप्स इन फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री या पुस्तकांचा लाभ घ्यावा. जीवशास्त्र विषयाचा अभ्यास करण्यासाठी दिशा प्रकाशनचे एक पुस्तक आहे ते विद्यार्थ्यांनी वापरायला हवे. या पुस्तकाचा अभ्यास केल्यावर तुम्हाला सिंगेज पब्लिकेशनच्या पुस्तकाचाही अभ्यास करता येऊ शकतो.  जीवशास्त्रासाठी अभ्यास परिपूर्ण करण्यासाठी ही दोन पुस्तके महत्त्वाची आहेत. तर रसायनशास्त्राच्या अभ्यासासाठी दिनेश आणि प्रदीप प्रकाशनची पुस्तके महत्त्वाची आहेत.

रसायनशास्त्र

नीट परीक्षेमध्ये १९ प्रश्न अकरावीवर आधारित आहेत. उर्वरित २५ प्रश्न बारावीवर आधारित प्रश्न आहेत. या परीक्षेमध्ये १८  सोपे प्रश्न, ४९ प्रश्न मध्यम आणि ३३ प्रश्न कठीण पातळीचे असतात. जेईई किंवा नीट या दोन्ही परीक्षांमध्ये सोपे, मध्यम आणि कठीण अशा तीन पातळ्यांवर प्रश्न विचारले जातात. या दोन्ही परीक्षांमध्ये अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमाला सारखे महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांतील परीक्षांमधील प्रश्न पाहिल्यास केमिकल बॉण्डिंगवर प्रश्न विचारले जातात. प्रत्येक परीक्षेत या विषयाचे कमीतकमी दोन प्रश्न विचारण्यात येतात.

जीवशास्त्र

हा विषय वर्णनात्मक असल्यामुळे तो समजून घेण्यासाठी अधिकाधिक वाचन आणि विषय आत्मसात करण्यासाठी सखोल अभ्यासाची गरज आहे. तसेच त्याची नियमीत उजळणीही हवी.

गणित

बारावीचा अभ्यासक्रम हा जेईईच्या तयारीचा पाया आहे. तो नीट समजून घेतला आणि अभ्यासला पाहिजे. बोर्डाच्या परीक्षेकडे नीट लक्ष द्या.    सूत्रे आणि संकल्पना एकदा वाचून सोडून देऊ नका. त्या लिहून काढा. सूत्रांचा वापर करून गणिते सोडवून पाहा. जेईई मुख्यच्या अभ्यासक्रमात गणितासाठी एकूण १६ युनिट आहेत. एकाचा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्याची सुरुवात करू नका.

भौतिकशास्त्र

भौतिकशास्त्रात संकल्पनांना अत्यंत महत्त्व आहे. फक्त एखादा नियम पाठ केलात की झाले, असे नव्हे. तो नियम का वापरला जातो, कशासाठी वापरला जातो हे लक्षात घ्यायला हवे. तो नियम सिद्ध करण्यासाठी कोणत्या कसोटय़ा आहेत, त्या जर बदलल्या तर नियमही बदलेल का अशा सगळ्या घटकांचा विचार करायला हवा. बरेचदा विद्यार्थ्यांना प्रश्न काय आहे, हेच कळत नाही. जर संकल्पना स्पष्ट असतील तर प्रश्न काय आहे, ते समजेल. त्यानुसार उत्तर देता येईल. जेवढी स्वत मेहनत घ्याल, तेवढा हा विषय जास्त समजेल.