उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

तुम्ही जळगावकडून धुळ्याकडे जायला निघालात की, गिरणा नदी ओलांडताना मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला लांबवर टेकडय़ांवरील तांबूस – गुलाबी इमारती तुमचे लक्ष वेधून घेतात. रस्त्याच्या डावीकडचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे भव्यदिव्य प्रवेशद्वार तुम्हाला खुणावते. प्रवेशद्वारातून आत त्या तांबूस- गुलाबी इमारतींकडे नेणारा मुख्य रस्ता आणि लांबवर दुतर्फा पसरलेली हिरवीगार झाडी जागेवरच खिळवून ठेवते. समोरच दिसणाऱ्या बोधचिन्हामधील ‘अंतरी पेटवू ज्ञानज्योत’ हे शब्द तुम्हाला विद्यापीठ स्थापनेमागची मूळ प्रेरणा सहजच सांगून जातात. कवी राजा महाजनांनी लिहिलेले ‘मंत्र असो हा एकच हृदयी, जीवन म्हणजे ज्ञान’ हे विद्यापीठ गीत गुणगुणतच तुम्ही विद्यापीठाच्या त्या आवारात प्रवेश केलात की तिथला परिसर तुम्हाला आपलेसे करतो. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्य़ांमधून उच्चशिक्षण घेणाऱ्या प्रत्येकालाच आपलासा वाटणारा हा परिसर तिथल्या आल्हाददायी वातावरणामुळे तुम्हालाही जवळचा भासतो. १५ ऑगस्ट १९९० रोजी तत्कालीन पुणे विद्यापीठातून स्वतंत्र होत स्थापन झालेले हे विद्यापीठ आता खान्देशातील विद्यार्थ्यांसाठी विद्याग्रहणाचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. गिरणा नदीच्या काठावर जवळपास साडेसहाशे एकरांच्या परिसरात अनेक टेकडय़ांवरून वसलेली विद्यापीठाची संकुले या भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्चशिक्षणाच्या अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविणाऱ्या शैक्षणिक प्रयोगशाळा म्हणूनच समाजासमोर येत आहेत. ‘नॅक’ मूल्यांकनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मिळालेली ‘ए ग्रेड’ या संस्थेच्या गुणवत्तेच्या अव्वल दर्जावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे.

संकुले आणि सुविधा

विद्यापीठाच्या मुख्य परिसरामध्ये विविध पदव्युत्तर शैक्षणिक विभाग चालतात. तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या चार आणि विद्यार्थिनींसाठीच्या सहा वसतिगृहांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या भव्य मध्यवर्ती ग्रंथालयातून विद्यार्थी आणि संशोधकांसाठी क्रमिक पुस्तके, संदर्भ ग्रंथ, शिक्षण आणि संशोधनविषयक नियतकालिके, जागतिक दर्जाची ऑनलाइन जर्नल्स उपलब्ध करून दिली जातात. ‘डिजिटल नॉलेज सेंटर’मधून शैक्षणिक वापरासाठी इंटरनेट आणि संगणकांची सुविधा, अभ्यासिका, विद्यापीठाच्या संकेतस्थळावरूनच उपलब्ध असलेली ‘ई-रिसोर्सेस लायब्ररी पोर्टल’ची सुविधा या ग्रंथालयामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. पदव्युत्तर विभागांच्या जोडीने विद्यापीठ अमळनेर, धुळे आणि नंदुरबार या तीन ठिकाणी उपकेंद्रेही येथे चालतात. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रांतर्गत मोठय़ा प्रमाणावर आदिवासी वस्त्याही आहेत. या भागातून पुढे येणारे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या नेमक्या गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. त्यासाठी नंदुरबार उपकेंद्रामध्ये ‘एकलव्य केंद्रा’ची स्थापना केली आहे. त्याद्वारे विद्यापीठाने सामाजिक विकास केंद्र, कौशल्याधारित शिक्षण केंद्र, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन केंद्र, आदिवासी महिला संशोधन केंद्र आदी संस्थांची पायाभरणी केली आहे. अमळनेरचे प्रताप तत्त्वज्ञान केंद्र, तसेच धुळे येथील महात्मा गांधी तत्त्वज्ञान मंदिरही विद्यापीठाच्या उपकेंद्रांचाच भाग ठरतात. खान्देशाचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र संग्रहालयही उभारले आहे.

वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम

विद्यापीठाच्या एकूण १३ स्कूल्समधून पदव्युत्तर शैक्षणिक विभाग चालविले जातात. ‘युनिव्हर्सिटी इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’ (यूआयसीटी) अंतर्गत रसायनशास्त्र आणि अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाशी निगडित नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमांसाठीचे नऊ  विभाग चालविले जातात. स्कूल ऑफ लँग्वेजेसमध्ये पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जोडीने भाषांतर, स्क्रिप्ट रायटिंग आणि प्रूफ रीडिंग या विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. स्कूल ऑफ आर्ट अँड ह्य़ुमॅनिटीज अंतर्गत पत्रकारिता विषयातील पदव्युत्तर, तर संगीत विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. स्कूल ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ सोशल वर्कमध्ये ‘अर्बन अँड रुरल कम्युनिटी डेव्हलपमेंट’ तसेच ‘फॅमिली अँड चाइल्ड वेल्फेअर’ या दोन विषयांमधील एमएसडब्ल्यू अभ्यासक्रम चालतो. स्कूल ऑफ थॉट्स अंतर्गत विविध विचारधारांना वाहिलेली संशोधने करण्याची सुविधा विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. स्कूल ऑफ कम्प्युटर सायन्सअंतर्गत कम्प्युटर सायन्स आणि आयटी या दोन विषयांमधील एम.एस्सी आणि पीएचडीचे अभ्यासक्रम चालतात. स्कूल ऑफ मॅथेमेटिकल सायन्सअंतर्गत येणाऱ्या स्टॅटेस्टिक्स विभागात इंडस्ट्रियल स्टॅटेस्टिक्स हा विशेष विषय घेऊन एम. एस्सी. करणे विद्यार्थ्यांना शक्य होते. याच स्कूलमधील डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅक्चुरियल सायन्समध्ये याच विषयातील पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेसमध्ये व्हीएलएसआय टेक्नोलॉजी विषयामधील एम. टेक अभ्यासक्रम, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसमध्ये केमिस्ट्रीच्या सहा विषयांमधून उपलब्ध असलेले एम. एस्सी, तसेच पीएचडीचे अभ्यासक्रम हे या विद्यपीठाचे वेगळेपण ठरते. विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट फॉर डिस्टन्स एज्युकेशन अँड लर्निग अंतर्गत दूरशिक्षणाचे एकूण १६ पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. अशा एक ना अनेक अभ्यासक्रमांची उपलब्धता करून देणारे हे विद्यापीठ ज्ञानज्योतीचा ध्यास घेतलेले एक केंद्र ठरते.

योगेश बोराटे –borateys@gmail.com