15 December 2018

News Flash

संशोधन संस्थायण : शोधाची पूर्व दिशा

सीएसआयआरचे संपूर्ण देशासाठी संशोधनाचे एकात्मिक धोरण आहे.

नॉर्थईस्ट इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, जोरहाट

आसाममधील जोरहाट येथे असलेल्या नॉर्थईस्ट इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या संशोधन संस्थेची स्थापना १९६१ साली झाली. या संशोधन संस्थेचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे इथे एकाच वेळी रसायनशास्त्रापासून ते अभियांत्रिकीपर्यंत व पेट्रोलियमसारख्या महत्त्वाच्या घटकापासून ते औषधी, सुगंधी व आर्थिक वनस्पती अशा जैवतंत्रज्ञानाशी नाते जोडणाऱ्या विषयांपर्यंत नानाविध विद्याशाखांतील मूलभूत आणि उपयोजित संशोधन केले जाते. देशातील पूवरेत्तर भागातील प्रमुख संशोधन संस्था अशी ओळख असलेली ही संस्था सीएसआयआरशी (वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद) संलग्न आहे.

संस्थेविषयी

स्वातंत्र्यानंतर संशोधन क्षेत्राची व्याप्ती देशभरात व्हावी या उद्दिष्टाने केंद्र शासनाने विविध राज्यांमध्ये रिजनल रिसर्च लॅबोरेटरीज म्हणजेच प्रादेशिक संशोधन प्रयोगशाळा स्थापन केल्या होत्या. या सर्व प्रादेशिक संशोधन प्रयोगशाळा नंतर सीएसआयआरच्या अखत्यारित घेण्यात आल्या. सीएसआयआरचे संपूर्ण देशासाठी संशोधनाचे एकात्मिक धोरण आहे. त्यामुळे या संस्थांचा प्रादेशिक चेहरा बदलण्याच्या या हेतूने सर्व प्रादेशिक संशोधन प्रयोगशाळांची नावे बदलली गेली. पूर्वीच्या अशा अनेक प्रादेशिक प्रयोगशाळांपैकी एक म्हणजे आसाममधील जोरहाट येथे असलेली नॉर्थईस्ट इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (एनईआयएसटीएस). ही संस्था पूर्वी रसायनशास्त्रात संशोधन करत असे. मात्र सीएसआयआरशी जोडली गेल्यानंतर संस्थेकडून आंतरविद्याशाखीय संशोधनाला भरपूर वाव दिला गेला. देशातील पूर्वोत्तर भागामध्ये उपलब्ध असलेल्या प्रचंड नैसर्गिक स्रोतांचा जसे की पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, खनिज, चहा, सुगंधी आणि औषधीय वनस्पती इत्यादींचा उपयोग करून देशी तंत्रज्ञानाचा विकास करणे या प्रमुख हेतूने संस्थेची स्थापना करण्यात आली. सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार एनईआयएसटीने इतर संशोधन क्षेत्रांमधील संशोधनास सुरुवात केलेली आहे. सध्या एनईआयएसटी औषधीय रसायनशास्त्र, नैसर्गिक उत्पादने रसायन, सिंथेटिक ऑरगॅनिक केमिस्ट्री, जैवतंत्रज्ञान, औषधी, सुगंधी व आर्थिक वनस्पती, जिओसायन्स, पेट्रोलियम, प्राकृतिक गॅस, अप्लाइड सिव्हिल इंजिनीयरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, सेल्युलोज, लगदा आणि कागद, मटेरियल सायन्स व कोळसा इत्यादी विषयांवरती विपुल संशोधन करते. याव्यतिरिक्त अलीकडील काही वर्षांमध्ये संस्थेने अ‍ॅग्रोटेक्नॉलॉजी व बायोलॉजिकल अ‍ॅण्ड ऑइल फिल्ड केमिकल्समध्ये शंभराहूनही अधिक उपयुक्त तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे.

योगदान

एनईआयएसटीएस ही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अद्ययावत संशोधन करण्यासाठी तेवढय़ाच दिमतीने अत्याधुनिक उपकरण आणि पायाभूत सुविधांसह संस्था सुसज्ज आहे. ही इंटरडिसीप्लिनरी सायन्सेसमध्ये संशोधन करणारी भारतातील एक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. येथे मूलभूत व उपयोजित असे दोन्ही प्रकारचे संशोधन केले जाते. मात्र, जास्तीत जास्त भर उपयोजित संशोधनावरतीच दिला जातो. संस्थेने केलेल्या उपयोजित संशोधनातून काही अभिनव उत्पादने तयार झालेली आहेत. संशोधनातून बाजारपेठेकडे वळण्यामध्ये संस्थेला यश आलेले आहे. नॅचरल प्रोडक्ट्स केमिस्ट्री, ड्रग्ज, ड्रग्ज इंटरमीडिएट, व्हीएसके सिमेंट, प्लँटटेक्नॉलॉजी , अ‍ॅग्रो-टेक्नॉलॉजीज, पेट्रोलियम मायक्रोबायोलॉजी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स, क्रूड ऑइल, पेपर अ‍ॅण्ड पेपर प्रोडक्ट्स, जिओटेक्निकल इन्व्हेस्टिगेशन, फाऊंडेशन डिझाइन इंजिनीअरिंग, माती आणि बांधकाम साहित्य इत्यादी विषयांवर प्रचंड संशोधन करून उत्पादित केलेल्या विविध उत्पादनांची विक्री फक्त देशभरात करून साधारणत: वार्षिक ११० कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

विद्यार्थ्यांसाठी संधी

पूवरेत्तर भारतात संशोधनासाठी कुशल मनुष्यबळ मिळावे व संशोधनाच्या माध्यमातून या भागाच्या विकासास हातभार लागावा या दीर्घकालीन उद्दिष्टाला समोर ठेऊन गेल्या दशकभरात संस्थेने २०० पेक्षाही जास्त जणांना पीएच.डी. पदवी बहाल केलेली आहे. संस्थेचे अनेक पीएच.डी. पदवीधारक भारतात व परदेशातदेखील औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. आजघडीला संस्था देशातील विविध विद्यापीठांबरोबर संलग्न होऊन अनेक शैक्षणिक व संशोधन प्रकल्प राबवत आहे. भारतातील इतर संशोधन संस्थंसारखे या संस्थेमध्येही विद्यार्थ्यांना Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. एनईआयएसटीएस अनेक विद्यापीठांशी पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. विद्यापीठांमध्ये पीएच.डी.चे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादीसारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी इथे ठरावीक काळ व्यतीत करत असतात. तसेच दरवर्षी CSIR च्या परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त जेआरएफ/ एसआरएफ विद्यार्थी इथे पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. या संशोधक विद्यार्थ्यांना देशविदेशातील अनेक कार्यशाळांना पाठवून त्यांचे कार्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.

संपर्क

  • नॉर्थईस्ट इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, राष्ट्रीय महामार्ग क्र ३७, पुलीबोर, जोरहाट आसाम – ७८५००६.
  • दूरध्वनी: +९१ ३७६२३७००१२.
  • ई-मेल : director@neist.res.in , drrljt@csir.res.in .
  • संकेतस्थळ :- http://www.rrljorhat.res.in

itsprathamesh@gmail.com

First Published on March 9, 2018 12:31 am

Web Title: northeast institute of science and technology neist