20 November 2017

News Flash

पुढची पायरी : कार्यालयातील कुचाळक्या

टवाळगप्पांच्या माध्यमातून कुणाच्या तरी प्रतिष्ठेवर हल्ला

डॉ. जयंत पानसे | Updated: July 15, 2017 1:18 AM

एखाद्या दिवशी कार्यालयात येताना किंवा जाताना तुमचा एक सहकारी अगदी हळू आवाजात कुजबुजतो, ‘‘तुला कळलं का…?’’ आणि त्याच्या मते एखादी रंजक व सनसनाटी बातमी सांगतो. तुम्हालाही उत्सुकता व मजा वाटते. तुम्ही विचारता, ‘‘तुला कुणी सांगितले?’’ ‘‘ते महत्त्वाचे नाही रे, बातमी ऐक!’’ त्याच्यावर विश्वासून तुम्ही पण ही बातमी तुमचा थोडा मसाला लावून अजून एका सहकाऱ्याला सांगता. तो हाच वारसा चालवतो. ही बातमी अशीच अजून थोडा थोडा मसाला लावून ऑफिसभर पसरते, याच सगळ्या घडामोडीला इंग्रजीमध्ये ‘ऑफिस गॉसिप’ म्हणतात. आपण मराठीत त्याला टवाळगप्पा म्हणू या.

खरं म्हणजे या टवाळगप्पांचा उगम कसा होतो ते या ब्रह्मांडाचा उगम कसा झाला हे सांगण्याइतकंच अवघड आहे! कुणीतरी कार्यालयाशी / त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संबंधित एखादी घटना पाहतो, काहीतरी ऐकतो; त्याचा स्वत:ला कळेल, पटेल तसा अन्वयार्थ काढतो. किंवा काही वेळेला कुणीतरी मुद्दाम खोडसाळपणा करून एखादी वावडी उठवतो. ऐकणाऱ्याला त्याचा अधिकृत उगम त्याला माहीत नसतो आणि हे ‘ज्ञान’ नुसते स्वत:जवळ ठेवण्याऐवजी त्याला ते कुणाला तरी सांगावसे वाटते. मग काय चालू होते गॉसिप! या टवाळगप्पांची एक गंमत असते. त्या पसरताना कुठलेही माध्यम चालते, शिवाय प्रचंड वेगात अशा बातम्या पसरतात, पसरताना त्यांना दिशेचे बंधन नसते. अगदी वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत अतिशय कमी वेळात नवनवीन मसाला लावून या टवाळगप्पा एखाद्या व्हायरससारख्या तुमच्यापर्यंत पोहोचतात.

या टवाळगप्पांची वर्गवारी अशी करता येईल –

 • कर्मचाऱ्यांच्या स्वप्नांची इच्छापूर्ती – बोनस, बढती, त्रासदायक साहेबांची बदली, पगारवाढ, इ.
 • भीतीच्या अतिशयोक्त कल्पना – कामगार कपात, पगारला होणारा उशीर, कंपनी बंद होण्याच्या अफवा, नको त्या ठिकाणी शिक्षा म्हणून बदली, इ.
 • कलह निर्माण करणाऱ्या अफवा – प्रतिस्पर्धी गटाची/व्यक्तीची हकालपट्टी, पदानवती, वरिष्ठ/कनिष्ठ सहकाऱ्यांचे कार्यालयातील/बाहेरचे माहीत नसलेले नैतिक/अनैतिक संबंध, सहकाऱ्यांची वैयक्तिक किंवा गटप्रमुख म्हणून असणारी अकार्यक्षमता, कंपनीच्या उत्पादकते/उत्पादनाविषयीच्या वातावरण कलुषित करणाऱ्या बातम्या.
 • वैयक्तिक -तुमच्या किंवा सहकाऱ्यांविषयी आर्थिक-सामाजिक-कौटुंबिक अशा चांगल्या/वाईट अफवा.

टवाळगप्पांचा हा व्हायरस बऱ्याच वेळा नकारात्मक गोष्टीच घडवून आणतो –

 • टवाळगप्पांच्या माध्यमातून कुणाच्या तरी प्रतिष्ठेवर हल्ला
 • सहकाऱ्यांबरोबरचे संबंध बिघडतात
 • ज्यांच्याविषयी या गप्पा पसरत असतात (त्यात तुम्हीही असू शकता) त्यांचे मानसिक व भावनिक खच्चीकरण होते
 • एकमेकांवरचा विश्वास कमी झाल्यामुळे एकत्र काम करणे अवघड होते
 • एकंदरीतच टवाळगप्पांमुळे प्रामाणिकपणे काम करायची प्रेरणा कमी होते, उत्पादकता कमी होते व परिणामत: कंपनीची उलाढाल कमी होऊ शकते.
 • टवाळगप्पा पसरविण्याच्या साखळीमध्ये तुम्ही जर पकडला गेलात तर शिस्तभंगाची कारवाईही होऊ शकते.
 • थोडक्यात म्हणजे काय की, नोकरीच्या या पहिल्या वर्षी तरी (खरं म्हणजे कधीच नाही) तुम्ही या टवाळगप्पांमध्ये सहभागी होऊ नये.

तुम्ही स्वत: अशा गप्पांचा विषय किंवा दुवा होऊ नये म्हणून पुढील गोष्टी कटाक्षाने कराच –

 • तुमचे किंवा कुठल्याही सहकाऱ्याचे वैयक्तिक आयुष्य जाणते/अजाणतेपणेही कार्यालयातील चर्चेचा विषय बनवू नका.
 • कुठल्याही पद्धतीने टवाळगप्पांमध्ये सहभागी होऊ नका. तुमच्यापर्यंत आलेली बातमी फोनवर, इमेलने, व्हॉटस् अ‍ॅपवर किंवा अन्य कुठल्याही माध्यमाने पुढे पाठवू नका.
 • आवश्यक वाटल्यास खासगीमध्ये तुमच्या वरिष्ठांच्या कानावर ही बातमी घाला.
 • टवाळगप्पांमुळे कळलेल्या बातमीबद्दल सहकाऱ्यांबरोबर कुठलीही टीकाटिप्पणी करणे टाळा.
 • प्रत्येकाची स्वत:ची एक चांगली प्रतिमा असते; त्यामुळे कुणाबद्दलही अपमानास्पद, मानहानीकारक बोलू नका.

शेवटी कितीही काळजी घेतली तरी कुठल्याही कार्यालयातील कुजबुज, अफवा व टवाळगप्पा आपण टाळू शकत नाही. फक्त या प्रकारात आपण स्वत: बळीचा बकरा बनत नाही ना, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र यासाठी कार्यालयातील तुमची प्रतिमा अतिशय स्वच्छ पाहिजे व तुम्ही सदैव यशस्वी व चांगल्या सहकाऱ्यांच्या सहवासात असणे आवश्यक आहे. गॉसिपमधून आलेल्या काही बातम्या चांगल्या व खऱ्याही असू शकतात. त्यामुळे अशा बातम्यांची योग्य ती शहानिशा व खातरजमा करून मगच त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.

dr.jayant.panse@gmail.com

First Published on July 15, 2017 1:18 am

Web Title: office gossips office issue