नोकरी नवीन असताना रजा घेणं किंवा मागणं हा मोठा संवेदनशील विषय असतो. कारण रजा घेणारी व्यक्ती म्हणजे काम टाळणारी व्यक्ती असं एक सरसकट समीकरण आपल्याकडे रुढ झालेलं आहे. पण कंपनीने मंजूर केलेल्या रजा योग्य नियोजन करून घेण्यात काहीच चुकीचे नाही. त्यांचे नियोजन मात्र उत्तम हवे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोकरीच्या पहिल्या वर्षांत आपण खूप सावध असतो. आपली प्रत्येक कृती वरिष्ठांकडून, सहकाऱ्यांकडून लक्षपूर्वक बघितली जाते व त्याचे मूल्यमापनही होते अशी जाणीव सारखी होत राहते. चांगले वागून व उत्तम काम करून संस्थेचा एक जबाबदार कर्मचारी व्हायचा आपलाही प्रयत्न चालू असतो. अशा वेळी वरिष्ठांकडे जाऊन रजा मागणे अवघडल्यासारखे वाटते. रजा घेणे हे आपल्या अकार्यक्षमतेचे मोजमाप तर होणार नाही ना, अशी भीती वाटत रहाते. पण जर काही अपरिहार्य कारण असेल तर रजा घेणे आवश्यकच ठरते. कामकाजाच्या दृष्टीने रजा घेणे म्हणजे तुमच्यावर सोपविलेल्या कामात खंड पडणे. वरिष्ठ याच बाबीचा विचार प्रथम करतात. कारण त्यांच्या दृष्टीने एखादा कर्मचारी रजेवर गेला तरी कामकाज अखंडित चालू राहणे आवश्यकच असते.

अनेक प्रकारच्या रजा उपलब्ध असतात. मुख्य प्रकार म्हणजे नियोजित रजा व अनियोजित रजा. नियोजित रजांमध्ये मुख्यत: अर्जित रजा (Earned leave) चा समावेश होतो. कायद्याप्रमाणे किंवा प्रत्येक संस्थेच्या रजा नियमावलीप्रमाणे हजर असलेल्या दिवसांच्या प्रमाणात ही रजा मिळते व एका वर्षांत न घेतल्यास, पुढील वर्षी पण जमा होते. अर्जित रजा घेताना वरिष्ठांची पूर्व संमती अत्यावश्यक असते. कायद्याप्रमाणे स्त्री कर्मचाऱ्यांसाठी प्रसूतीसाठी रजा व काही संस्थामध्ये मासिक ऋतुचक्रासाठी चार दिवसांची नियोजित रजाही मिळते. अलीकडे काही सहिष्णू विचारसरणीच्या संस्थांमध्ये स्त्रियांबरोबर पुरुषांनादेखील वडिलांची जबाबदारी उचलण्यासाठी प्रसूतीनंतर काही दिवसांची रजा मिळते. अनियोजित रजेमध्ये नैमित्तिक किंवा प्रासंगिक रजा व आजारपणाच्या रजेचा समावेश होतो. अशा रजा किती असाव्यात हे प्रत्येक संस्थेच्या रजा नियमावलीप्रमाणे ठरते. अनियोजित रजा घेतानासुद्धा वरिष्ठांची पूर्वसंमती घेणे किंवा त्यांना वेळीच सूचित करणे महत्त्वाचे आहे.

रजेचा तिसरा प्रकार देखील आहे आणि तो म्हणजे चक्क दांडी मारणे! म्हणजेच कुठलीही पूर्वसंमती न घेता, पूर्वसूचना न देता रजा घेणे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत अशी मारलेली ‘दांडी’ क्षम्य ठरू शकते; परंतु  दांडी मारण्याची कारणे जर वरिष्ठांना पटली नाहीत किंवा अशा दांडय़ा मारण्याचा आपला इतिहास असेल तर ही दांडी आपल्याला महागात पडू शकते. अशी रजा बिनपगारी करणे, तुमच्या गोपनीय अहवालात तशी नोंद करणे, तुम्हाला लेखी ताकीद देणे किंवा चक्क नोकरीवरून काढून टाकणे, अशा अनेक नकारात्मक गोष्टी होऊ  शकतात.

रजेचे नियोजन हा नोकरीमधील अतिशय संवेदनशील विषय आहे. पण तो यशस्वीरीत्या हाताळल्यास रजेचे फायदे तर मिळतातच व तुमची कार्यालयातील विश्वासार्हतासुद्धा वाढते.

कुठल्याही प्रकारची रजा घेताना पुढील पथ्ये पाळा

  • सर्वात प्रथम आपल्या हातातील कामांना पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाज घ्या.
  • रजेच्या काळात तुमचे काम अखंडित राहण्यासाठी कुठला सहकारी मदत करू शकेल ते ओळखून त्याला अनौपचारिकरीत्या मदत करावयाची विनंती करा.
  • तुमचे काम दीर्घ मुदतीचे व प्रकल्प पद्धतीचे असेल तर रजेवर जाण्याआधी जास्त वेळ काम करून ते कमीत कमी अंशत: पूर्ण करावयाचा प्रयत्न करा.
  • रजेच्या काळात उर्वरित काम घरून (work from home) अथवा तुम्ही जेथे जाणार तेथून आंतरजालकाच्या माध्यमातून करता येईल का याचा तपास करा.
  • आता तुमचे वैयक्तिक काम (घरगुती, सहलीला / समारंभास / रुग्णालयात उपचारासाठी जाणे, इ.) किती दिवसांचे असेल त्याप्रमाणे रजेसाठी अर्ज करा.
  • नैमित्तिक किंवा रुग्णालयातील उपचारांसाठी लागणाऱ्या रजेचेसुद्धा नियोजन करता येते.
  • वरिष्ठांशी बोलताना रजेच्या काळात काम अखंडित चालू ठेवण्यासाठी तुम्ही तयार केलेल्या विकल्पांची चर्चा करा व काम बाधित होणार नाही आणि झाल्यासच अतिशय अल्प प्रमाणावर होईल असे त्यांना पटवून द्या.
  • तुम्हाला घ्याव्या लागणाऱ्या रजेच्या काळातील कामाची व्यवस्था झाल्यामुळे तुमची रजा मंजूर होण्याची शक्यता वाढेल.
  • रजेवर असताना शक्य झाल्यास एखाद्या वेळेस वरिष्ठांना व सहकाऱ्यांना फोन करून कामाची

चौकशी करा.

अनियोजित रजा काही आकस्मिक कामामुळे घ्यावी लागणार असे दिसताच प्रथम वरिष्ठांना फोन करून परिस्थितीची कल्पना द्या व पुरेशी पूर्वसूचना न देता आल्याबद्दल खंत व दिलगिरी व्यक्त करा. सहकाऱ्यांनाही फोन करून रजेची कल्पना द्या व मदतीची विनंती करा.

dr.jayant.panse@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Office leave issue how to take leave
First published on: 07-10-2017 at 02:31 IST