देशभरात पाळीव पशूंना विविध सेवा पुरवणाऱ्या उद्योगांची भरभराट होत आहे. या क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणीही वाढत आहे. प्राण्यांची आवड, प्राण्यांना हाताळण्याचे कौशल्य अशा प्राथमिक निकषांवर उभे राहणाऱ्या या व्यवसायांना अद्यापही औपचारिक शिक्षणाची जोड भारतात मिळालेली नाही. ट्रेनिंग, ग्रुमिंगसारखे काही अभ्यासक्रम खासगी संस्थांकडून चालवले जातात. मात्र त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्याचबरोबर या अभ्यासक्रमांवर नियंत्रणच नसल्यामुळे त्याच्या वैधतेबाबतही काही वेळा प्रश्न उभे राहतात.

परदेशात ‘पेट इंडस्टी’मधील विविध अभ्यासक्रम खासगी संस्थांकडून उपलब्ध असले तरी सगळ्यांनाच या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांसाठी परदेशात जाणे शक्य नसते. मात्र तरीही अगदी शास्त्रीय माहिती, प्रमाणपत्रासह अभ्यासक्रमांची संधी उपलब्ध करून दिली आहे, ती ऑनलाइन अभ्यासक्रम चालवणाऱ्या विविध संस्थांनी! कुत्र्यांना प्रशिक्षण देणे, ब्रिडिंग, ग्रुमिंग, डॉग स्पोर्टस, बिहेविअर यातील विविध अभ्यासक्रम चालवले जातात.

साधारणपणे ५० डॉलर्स म्हणजे साधारण साडेतीन हजार रुपयांपासून पुढे असे या अभ्यासक्रमांचे शुल्क आहे. एक महिना ते दीड वर्षे कालावधीचे हे अभ्यासक्रम आहेत. अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था देशातील पाळीव प्राण्यांना विविध सेवा देणाऱ्या संघटनांशी जोडले गेले आहेत.

    पात्रता

प्रत्येक संस्थेनुसार अभ्यासक्रमाची पात्रता वेगवेगळी आहे. मात्र प्राण्यांची आवड,संभाषण कौशल्य, ई लर्निग असल्यामुळे संगणकाची प्राथमिक माहिती, इंटरनेटचा वापर येणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संगणक आणि इंटरनेट सेवा असणेही गरजेचे आहे. काही अभ्यासक्रमांसाठी किमान वयाची अट आहे. किमान १६ किंवा १८ वर्षे वयाची अट हे अभ्यासक्रम करण्यासाठी आहे.

*   अभ्यासक्रम कसा कराल?

नियमित शिक्षण, नोकरी सांभाळून हे अभ्यासक्रम करता येऊ शकतात. यामध्ये तासिकांचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह कोर्स) आणि मागणीनुसार तासिका (ऑन डिमांड लेक्चर्स) असे पर्याय उपलब्ध आहेत.

’   काही संकेतस्थळे

http://e-trainingfordogs.com – या संकेतस्थळावर ग्रुमिंग, ट्रेनिंग, ब्रिडिंगचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

http://www.opencolleges.edu.au  – कुत्र्यांना प्रशिक्षण देण्याचा अभ्यासक्रम चालवला जातो.

http://www.casinstitute.com- कम्पॅनिअन अ‍ॅनिमल सायन्स इन्स्टिटय़ूट या संस्थेचे हे संकेतस्थळ आहे. प्रशिक्षण, ब्रीडिंग, आहारतज्ज्ञ (न्यूट्रिशनिस्ट) अभ्यासक्रम चालवले जातात

http://www.animaledu.com – अ‍ॅनिमल बिहेविअर इन्स्टिटय़ूट या संस्थेचे हे संकेतस्थळ आहे. कुत्रे आणि मांजरे यांना प्रशिक्षण, वागणूक याबाबतचे अभ्यासक्रम आहेत.

http://animaltherapy.net  – ‘अ‍ॅनिमल असिस्टेड थेरपी’ अभ्यासक्रम चालवला जातो.