नवी दिल्ली येथे १९८२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर आपल्या देशात खऱ्या अर्थाने क्रीडा क्षेत्राचे महत्त्व वाढले. क्रीडा क्षेत्रातही करिअर करता येते हे हळूहळू लोकांना लक्षात येऊ लागले आहे. विविध खेळांमध्ये प्रशिक्षक म्हणूनही उत्तम संधी प्राप्त होऊ लागली आहे. विशेषत: क्रीडा क्षेत्रात व्यावसायिक स्पर्धाच्या वाढत्या प्रभावामुळे शासनामधील विविध आस्थापनांबरोबरच विविध व्यावसायिक क्लब किंवा संस्थादेखील पूर्णवेळ क्रीडा प्रशिक्षक नियुक्त करीत असतात.

प्रशिक्षकाचे करिअर

Centers for training of medical teachers are insufficient in the state
राज्यात वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र अपुरे; वैद्यकीय शिक्षक संघटना म्हणते…
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
Magnus Carlsen believes R Pragyanand is expected to perform well chess match
प्रज्ञानंदकडून चांगली कामगिरी अपेक्षित – कार्लसन
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र

क्रीडा प्रशिक्षक म्हणून दोन स्वरूपाचे करिअर करता येते. एक म्हणजे विविध खेळांमधील पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून नोकरी करता येते. अलीकडे फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिस, कुस्ती आदी खेळांमधील व्यावसायिक लीग व वाढत्या स्पर्धामुळे या खेळांकरिता विविध संघटना किंवा क्लबतर्फे पूर्णवेळ प्रशिक्षक नियुक्त करीत असतात. अर्थात त्यासाठी संबंधित खेळांच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संघटनांतर्फे प्रशिक्षकांकरिता अधिकृत प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित केले जातात. विविध श्रेणींमध्ये हे अभ्यासक्रम घेतले जातात. तुमची श्रेणी जेवढी जास्त असते त्यानुसार व्यावसायिक प्रशिक्षक म्हणून तुमची किंमत वाढत जाते. टेनिस, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट आदी खेळांमध्ये अनेक देशांमध्ये काही वैयक्तिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली असे अभ्यासक्रम घेतले जातात व त्यामध्ये अनेक देशांचे प्रशिक्षक भाग घेत असतात.  व्यावसायिक प्रशिक्षकांबरोबरच शासन नियुक्त क्रीडा प्रशिक्षक म्हणूनही काम करता येते. भारतीय क्रीडा प्राधिकरण, विविध शासकीय क्रीडा संस्था, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ आदी ठिकाणी पूर्णवेळ क्रीडा प्रशिक्षक म्हणून नोकरी मिळते. शासनाने ठरविल्यानुसार त्याला सर्व सुविधा व सवलती मिळत असतात. अलीकडे काही खेळांकरिता राज्य व राष्ट्रीय स्तरावरही पूर्णवेळ क्रीडा प्रशिक्षकांची नियुक्ती केली जात असते. हे प्रशिक्षक कोणत्या शाळा किंवा महाविद्यालयाशी संलग्न नसतात, मात्र शासनाच्या विविध क्रीडा योजनांखाली प्रशिक्षण देण्याची जबाबदारी या प्रशिक्षकाकडे असते.

पात्रता

कोणतीही सुदृढ व्यक्ती प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम करू शकते. साधारणपणे २३ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तीला ही संधी मिळू शकते. अर्थात वयाची पात्रता काही खेळांच्या आवश्यकतेनुसार बदलू शकते. हा अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या व्यक्तीस संबंधित खेळाचे प्राथमिक ज्ञान व आवड असणे जरुरीचे आहे. कोणत्याही शाखेतील पदवी त्याच्याकडे असली पाहिजे. विविध खेळांमधील व्यावसायिक प्रशिक्षकांबाबत ही अट शिथिल असते. उदारहणार्थ एखाद्या खेळाडूने पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला नसेल, पण त्याने खेळात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला असेल तर तो व्यावसायिक प्रशिक्षकाचा अभ्यासक्रम करू शकतो.

अभ्यासक्रम देणाऱ्या संस्था

क्रीडा प्रशिक्षक होण्यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणांतर्गत पतियाळा, बंगळुरू, कोलकाता, तिरुवनंतपुरम या ठिकाणी पदव्युत्तर अभ्यासक्रम घेतले जातात. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका असे दोन्ही स्वरूपांचे अभ्यासक्रम असतात. त्याखेरीज क्रीडा शिक्षक म्हणून अनेक शारीरिक शिक्षण महाविद्यालयांमध्येही पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम घेतले जातात.

सर्वच अभ्यासक्रमांसाठी शंभर टक्के तंदुरुस्ती असणे महत्त्वाचे असते. कारण केवळ एखाद्या खेळापुरते प्रशिक्षण न देता त्यासाठी असणारे पूरक व्यायामही करवून घेतले जात असतात. तसेच शरीरविज्ञान, खेळासंबंधी मानसशास्त्र आदींबाबतही तेथे ज्ञान दिले जात असल्याने त्यासाठी मानसिक तयारीही लागते.

नोकरीची संधी

बहुतेक सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळते. त्याखेरीज शासननियुक्त क्रीडा प्रशिक्षक म्हणूनही नोकरीची संधी असते. सेनादलाच्या क्रीडा संस्था, रेल्वे व अन्य सार्वजनिक आस्थापनांमध्येही क्रीडा प्रशिक्षक म्हणून संधी मिळू शकते.