आर्यलडमधील एक प्रमुख संशोधन केंद्र व महत्त्वाचे विद्यापीठ असलेल्या डब्लिन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (डीआयटी) या संस्थेकडून पदव्युत्तर पदवीसाठी आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. कलाशाखा, पर्यटन, अभियांत्रिकी, उद्योग, मूलभूत विज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमधील विविध अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती आहे.

शिष्यवृत्तीविषयी –

डीआयटी या नावाने जगभरात ओळखले जाणारे आर्यलडमधील डब्लिन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी हे जगातल्या पहिल्या नामांकित शंभर विद्यापीठांपैकी एक, तर आर्यलडमधील सर्वात मोठे व जास्त विद्यार्थी असलेले विद्यापीठ आहे. बावीस हजार विद्यार्थी शिकत असलेल्या या संस्थेत पदवीपासून पीएचडीपर्यंत सर्व अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या सत्तावीस विभागांद्वारे चालवल्या जाणाऱ्या या विविध अभ्यासक्रमांना संस्थेने सोयीसाठी आपल्या चार कॅम्पसमधील चार महाविद्यालयांमध्ये विभागले आहे. १८८७ मध्ये तंत्रशिक्षण देण्यासाठी स्थापन झालेले हे विद्यापीठ आर्यलडमधील जुने विद्यापीठ असून नव्या स्वरूपात व नव्या कायद्यानुसार १९९२ ला पुनस्र्थापित करण्यात आलेले आहे. डीआयटी आर्यलडच्या राजधानीत म्हणजे डब्लिन या शहरात स्थित असून, संस्थेच्या सर्व महाविद्यालयांचे कॅम्पसदेखील याच शहरात आहेत. डीआयटी हे आर्यलडमधील प्रमुख आणि  सर्वात मोठे शैक्षणिक-संशोधन केंद्रदेखील आहे. संस्थेच्या विविध विभागांमध्ये चालू असलेल्या संशोधनातील गुणवत्ता वाढावी व एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावरील  गुणवत्ता आकर्षित करता यावी या हेतूने डीआयटीकडून ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.

या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत ६० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती बहाल केली जाते. या शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कालावधीएवढा असेल. शिष्यवृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. शिष्यवृत्तीअंतर्गत या कालावधीदरम्यान शिष्यवृत्तीधारकाला अर्धे शिक्षण शुल्क दिले जाईल. याव्यतिरिक्त  त्या विद्यार्थ्यांला आंतरराष्ट्रीय आरोग्य विमा व अपघातापासून सुरक्षिततेसाठी विमा यासारख्या इतर सुविधाही बहाल  केल्या जातील.

अर्ज प्रक्रिया –

या शिष्यवृत्तीच्या अर्जप्रक्रियेसाठी विद्यापीठाने आपल्या संकेतस्थळावर स्वतंत्र अर्ज उपलब्ध करून दिलेला आहे. अर्जदाराने इच्छित अभ्यासक्रमाचा अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे पूर्ण करून यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांच्या ई-प्रतींसह संस्थेच्या प्रवेश कार्यालयाच्या या इमेलवर  centenary.scholarship@dit.ie ईमेल करावा. अर्जासह अर्जदाराने त्याचे एसओपी, सीव्ही, निबंध, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, जीआरई, जीमॅट व आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी आवश्यक परीक्षांचे गुण, कार्यानुभवाचे प्रशस्तिपत्र इत्यादी

गोष्टी जोडाव्यात. शिफारसपत्रांसाठी मात्र अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांचे अथवा तज्ज्ञांचे ई-मेल अर्जामध्ये नमूद करावेत. विद्यापीठ स्वतंत्रपणे संबंधित प्राध्यापकांस संपर्क करून शिफारसपत्र देण्यासाठी विनंती करेल.

निवड प्रक्रिया –

अर्जदाराची गुणवत्ता लक्षात घेऊन व संस्थेशी संबंधित प्रत्येक महाविद्यालयातील निवड समितीकडून त्याच्या अर्जाची तपासणी केली जाईल. तपासणीमधून गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल. समितीचा निर्णय अंतिम राहील. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना संस्थेकडून त्यांचा निकाल ईमेलने कळवला जाईल. यशस्वी अर्जदारांना शिष्यवृत्तीची स्वीकृती लवकरात लवकर करून संस्थेला कमाल दोन आठवडय़ांत तसे कळवायचे आहे. ते न कळवल्यास किंवा कळवण्यास उशीर झाल्यास शिष्यवृत्ती रद्द करता येईल.

महत्त्वाचे संकेतस्थळ – http://www.dit.ie/

अंतिम मुदत – या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. १९ मे २०१७ आहे.

आवश्यक अर्हता –

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. त्याची पदवीपर्यंतची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. पदवी पातळीवर त्याने किमान प्रथम श्रेणी मिळवलेली असावी. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असावे. अर्जदाराने परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी महत्त्वाची असलेली जीआरई किंवा जीमॅटसारखी परीक्षा उत्तीर्ण असावे अशी कोणतीही अट संस्थेने घातलेली नाही. मात्र, परदेशी विद्यापीठांच्या प्रवेशप्रक्रियेतील स्पर्धात्मकता लक्षात घेतली तर या परीक्षांपैकी शक्यतो जीआरई  चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे फायद्याचे ठरेल. आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी आयईएलटीएस या इंग्रजीच्या परीक्षेमध्ये त्यांना किमान आवश्यक बँड्स  मिळालेले असावेत. शिष्यवृत्तीसाठी विद्यापीठाने याव्यतिरिक्त कोणतीही किमान आवश्यक अर्हता नमूद केलेली नाही. मात्र अर्जदाराचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. पूर्णवेळ कार्यानुभव किंवा अभ्यासेतर उपक्रमांवरील विशेष ठसा त्याला अंतिम निवडीत नक्कीच प्राधान्यक्रम देऊ शकतात.