नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनॉलॉजी, नवी दिल्ली येथे उपलब्ध असणाऱ्या संशोधनपर पीएच.डी.साठी खालीलप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

योजनेअंतर्गत समाविष्ट विषय – संशोधनपर पीएच.डी.च्या २०१८-२०२० या सत्रामधील संशोधनपर पीएच.डी.साठी इन्फेक्शन अ‍ॅण्ड इम्युनिटी, जेनॅटिक्स, मॉल्युक्युलर अ‍ॅण्ड सेल्युलर बायोलॉजी, केमिकल, स्ट्रक्चरल अ‍ॅण्ड कॉन्प्युटेशनल बायोलॉजी अ‍ॅण्ड रिप्रॉडक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र यांसारख्या विषयातील एम.एस्सी., एम.टेक., एमबीबीएस, एमव्हीएसी, एम. फार्म यांसारखी पदव्युत्तर पात्रता कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.

निवडपद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनॉलॉजीतर्फे लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर प्रमुख शहरांमध्ये १८ फेब्रुवारी २०१८ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये पुणे केंद्राचा समावेश असेल. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी जॉइन्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स एक्झामिनेशन इन बायोलॉजी अ‍ॅण्ड इंटरडिसिप्लिनरी लाइफ सायन्सेस ही पात्रता परीक्षा २०१७ मध्ये दिली असेल ते सुद्धा या संशोधनपर पीएच.डी. करण्यासाठी पात्र असतील. अर्जदारांची प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे संशोधनपर पीएच.डी.साठी निवड करण्यात येईल.

संशोधनपर शिष्यवृत्ती – निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या संशोधन काळात दरमहा २५००० रुपयांची संशोधनपर शिष्यवृत्ती देण्यात येईल.

अर्जासह भरावयाचे शुल्क – अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून सर्वसाधारण गटातील उमेदवारांनी १००० रुपये (राखीव वर्गगटातील उमेदवारांनी ५०० रुपये) संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संदर्भ – या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनॉलॉजीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nii.res.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख – संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०१८