21 September 2020

News Flash

भौतिकशास्त्रात गती मिळवा

लेखी परीक्षा ही विद्यार्थ्यांचे ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्यावर आधारित असते.

रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे विज्ञान विभागातले दोन महत्त्वाचे विषय. बारावीच्या परीक्षेसाठी आता या अंतिम टप्प्यांत याची तयारी कशी करावी, याबद्दल सांगताहेत, , एचएससी बोर्डामधील परीक्षा नियामक..

उच्च माध्यमिक परीक्षेसाठी भौतिकशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एकूण १०० गुणांपैकी ७० गुण लेखी परीक्षेसाठी (कालावधी ३ तास) व ३० गुण प्रात्यक्षिक परीक्षेसाठी (कालावधी ३ तास) असतात. लेखी परीक्षेसाठी ७० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असून, त्यामध्ये दोन विभाग असतात. दोन्ही विभाग प्रत्येकी ३५ गुणांचे असून प्रत्येक विभागात चार प्रश्न असतात. दोन्ही विभागांसाठी एकच उत्तरपत्रिका असते.

लेखी परीक्षेची तयारी – लेखी परीक्षा ही विद्यार्थ्यांचे ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्यावर आधारित असते. प्रश्नपत्रिकेमध्ये १४ गुण वस्तुनिष्ठ (MCQ’S), ४२ गुण (विकल्पासह ५६) लघुउत्तरी व १४ गुण (विकल्पासह २६) दीघरेत्तरी स्वरूपाचे प्रश्न असतात. पाठय़पुस्तकाचा सखोल अभ्यास करणे हीच परीक्षेची खरी गुरुकिल्ली आहे. कमीत कमी वेळेत आकृती काढण्याचा सराव करणे गरजेचे आहे. आकृत्या सुबक व नामांकित काढाव्यात. प्रश्नपत्रिकेमध्ये लघुत्तरी प्रश्नांना  सर्वात जास्त गुण आहेत, त्यामुळे अभ्यासक्रमातील Diagrams, Definitions, Applications, Uses, Properties, Distinguish between, Small derivations इत्यादी भागावर जास्तीत जास्त भर द्यावा.

वस्तुनिष्ठ प्रश्न हे ज्ञान व आकलनावर आधारित असल्यामुळे पाठय़पुस्तक वाचन महत्त्वाचे आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिताना फक्त   a, b, c, d असे न लिहिता संपूर्ण उत्तर लिहिणे अनिवार्य आहे.

विभाग १ मध्ये सर्वाधिक गुण Oscillations (७ गुण) व Stationary waves (७ गुण) या पाठांना आहेत. विभाग २ मध्ये सर्वाधिक गुण Interference and Diffraction (६ गुण), EMI (६ गुण) व  Atoms, Molecules and Nuclei (६ गुण) या पाठांना आहेत. अर्थातच या पाठांची तयारी चांगली करावी. तयारी करताना नेहमी टाचण काढण्याची सवय असावी.

भौतिकशास्त्र विषयातील गणिते सोडविण्यासाठी प्रथम सूत्रांची उजळणी करणे गरजेचे आहे. पाठय़पुस्तकातील सोडवून दिलेली व सोडवण्यास दिलेली गणिते परत एक वेळ सोडवून उजळणी करावी. गणिते सोडवताना लॉग टेबल वापरणे अनिवार्य आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये ३४ ते ३६ गुण (विकल्पासहित) हे गणितासाठी असतात. गणिते सोडवताना प्रथम सूत्र, नंतर किमती टाकून उत्तर लॉग टेबल वापरून काढावे. शेवटी उत्तराला Unitc लिहिणे गरजेचे आहे.

विद्यार्थ्यांना संपूर्ण पेपर ३ तासांत सोडवायचा असतो, म्हणजेच संपूर्ण अभ्यासक्रम ३ तासांत आठवणे गरजेचे असते. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पुस्तक बंद करून प्रत्येक पाठातील संपूर्ण मुद्दे आठवतात की नाही याची पडताळणी करावी. जे मुद्दे आठवत नसतील ते बाजूला लिहून ठेवून त्यांची नंतर उजळणी करावी.

२) प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी कशी कराल?

प्रात्यक्षिक परीक्षेची तयारी करण्यासाठी ऑनलाइन लॅब हा सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित उपक्रम सी डॅक मुंबईने बनविला असून तो अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी www.olab.com संकेतस्थळाला भेट देऊन त्याचा लाभ घ्यावा. प्रात्यक्षिक परीक्षेच्या ३० गुणांपैकी प्रयोगवहीला ८ गुण, तोंडी उत्तरांना ६ गुण, १ प्रात्यक्षिक

८ गुण व दोन अ‍ॅक्टिव्हिटीजना ८ गुण असतात. लॉग टेबलच्या साह्य़ाने आकडेमोड करणे अनिवार्य आहे.

रसायनशास्त्राचे तंत्र

  • प्रा. किशोर चव्हाण

इयत्ता १२वी बोर्डाची ‘रसायनशास्त्र’ या विषयाची परीक्षा बुधवार, दिनांक ८ मार्च २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. नवीन अभ्यासक्रमात हा विषय अतिशय व्यापक असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या विषयाची भीती जास्त आहे. सध्याचा रसायनशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम हा CBSE (NCERT)च्या धर्तीवर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी राज्य शासकीय पाठय़पुस्तकांचा सखोलपणे अभ्यास केला, तर अशा विद्यार्थ्यांना मेडिकल तसेच इंजिनीअरिंगच्या प्रवेश-परीक्षेत पात्र होणे हे अवघड नाही.

रसायनशास्त्र या विषयाचा पेपर हा ७० मार्काचा आहे व वेळेची मर्यादा ३ तास आहे. या पेपरमध्ये दोन विभाग आहेत व प्रत्येकी चार प्रश्न आहेत. दोन्ही विभागात  प्रत्येकी एक प्रश्न हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी  स्वरूपाचा असतो. विद्यार्थ्यांनी प्रत्येक धडय़ाच्याखालील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नाचा अभ्यास करावा. विभाग १मध्ये फिजीकल आणि इनऑर्गनिक केमिस्ट्रीचे धडे आहेत. दुसऱ्या विभागात ऑरगॅनिक आणि उरलेले इनऑर्गनिक केमिस्ट्रीचे धडे आहेत. पहिल्या विभागात एकूण पाच धडय़ांमध्ये न्युमरिकल्स विचारले जातात. ३०% प्रश्न हे त्यावर असतात. हे न्युमरिकल्स फॉम्र्युला बेस्ड म्हणजे सूत्रांवर आधारित असतात. प्रत्येक धडय़ामधील सूत्रे पाठ केली आणि धडय़ाखालील सोडवलेले आणि न सोडवलेले न्युमरिकल्स सोडवलेत तर विद्यार्थी जवळपास १०-१२ गुण मिळवू शकतो. विभाग एकमध्ये नियम, व्याख्या, आकृत्या, डेरिव्हेशन्स, डिस्टिंक्शन्स  इत्यादी बाबींचा सखोल अभ्यास करून लक्षात ठेवणे आवश्यक आहेच. त्यासाठी जास्तीत जास्त वेळ पाठांतर करून लिहिण्याचा सराव करणे गरजेचे आहे.

इयत्ता १२ वीचा शास्त्र विषयाचा पेपर हा चार घटकांवर तयार केला जातो. ज्ञान, समज,उपयोग आणि कौशल्य. रसायनशास्त्राच्या दोन्ही विभागांत आकृत्या आणि रचना विचारल्या जातात. विद्यार्थ्यांनी एकूण १५धडय़ांखालील यूझेस ऑफ चा अभ्यास जरूर करावा. कारण जवळपास ४-६ गुण हे उपाययोजनांवर आधारलेले असतात. विभाग एकमध्ये पी ब्लॉक एलिमेंटस या धडय़ाला जास्त गुणांकन आहे. हा धडा कोणत्याही परिस्थितीत ऑप्शनला टाकू नका.

इनऑर्गनिक केमिस्ट्रीचे एकूण ४ धडे आहेत. विभाग एकमध्ये दोन आणि विभाग दोनमध्ये दोन. हे सर्व धडे थिअरॉटिकल म्हणजेच सैद्धांतिक असल्याने त्याचा नीट अभ्यास करा. धडय़ाखालील प्रश्न सोडवा. ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे एकूण ७ धडे आहेत. यामध्ये जवळपास ३५ नेम्ड रिअ‍ॅक्शन्स आहेत. त्या पाठ करणे आवश्यक आहे. दुसऱ्या विभागात शेवटच्या तीन धडय़ांमध्ये व्याख्या,

रॉ मटेरिअल्स लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनी शेवटी अभ्यास करत असताना न्यूमरिकल्स, लॉज, डेफिनेशन, डिस्टिंक्शन्स, यूझेस, अ‍ॅप्लिकेशन्स, डेरिव्हेटिव्हज, नेम्ड रिअ‍ॅक्शन्स, कन्व्हर्जन्स इ.चा व्यवस्थित अभ्यास केला तर विद्यार्थी परीक्षेत उत्तम गुण मिळवू शकतात. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला तर विद्यार्थ्यांना प्रश्नाचे स्वरूप व त्याची अपेक्षित उत्तरे लिहिता येतील, त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचे आहे. पेपर सोडवत असताना मनावर कोणताही ताण येऊ देऊ नका. जे प्रश्न सोपे वाटत असतील त्याची उत्तरे सुरुवातीला लिहा व जे प्रश्न कठीण वाटत असतील ते पेपर पूर्ण झाल्यावर त्यावर विचार करा, की ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रात्यक्षिक परीक्षेचे महत्त्वही लक्षात ठेवा. या परीक्षेसाठी ३० गुण आहेत. त्यापैकी १०गुण व्हॉल्युमेट्रीक अ‍ॅनालिसीस आणि १० गुण हे इतर प्रयोगांच्या कॉम्बिनेशन्सवर आधारलेले आहेत. उरलेले १० गुण जर्नल, प्रोजेक्ट, आणि व्हायवाला दिलेले आहेत. योग्य पद्धतीने किंवा मार्गाने आपण अभ्यास केला तर यश आपलेच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 12:17 am

Web Title: physics and chemistry
Next Stories
1 नोकरीची संधी
2 एमपीएससी मंत्र : सामान्य अध्ययन-२ चे हुकमी एक्के
3 करिअरमंत्र
Just Now!
X