19 October 2018

News Flash

संशोधन संस्थायण : भौतिकशास्त्राच्या विश्वात..

 एनपीएल ही आधुनिक भारतातील सर्वात प्राचीन म्हणजेच सन १९०० साली स्थापना झालेली संस्था आहे.

नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, दिल्ली

प्रथमेश आडविलकरभारतातील संपूर्ण संशोधन क्षेत्रावर नजर ठेवणाऱ्या सीएसआयआर म्हणजेच वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषदेची सर्वात पहिली संशोधन संस्था म्हणून ओळखली जाणारी प्रयोगशाळा म्हणजे नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी. ही दिल्लीस्थित संस्था एनपीएल या नावाने सर्वश्रुत आहे. या संशोधन संस्थेमध्ये मुख्यत्वे फिजिक्स (भौतिकशास्त्र) या विषयातील मूलभूत व उपयोजित संशोधन (Fundamental and applied research) केले जाते. तसेच आंतरराष्ट्रीय एकक समितीच्या निर्देशानुसार देशांतर्गत संशोधन क्षेत्रातील मोजमापांसंबंधी योग्य मार्गदर्शक म्हणून एनपीएल ही संस्था काम करते.

संस्थेविषयी 

एनपीएल ही आधुनिक भारतातील सर्वात प्राचीन म्हणजेच सन १९०० साली स्थापना झालेली संस्था आहे. ब्रिटिशकालीन भारतामध्ये असलेल्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी या प्रयोगशाळेला १९४३ मध्ये संशोधन संस्थेमध्ये रूपांतरित करण्याची संकल्पना कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) मांडण्यात आली. त्यानुसार तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या संस्थेच्या वास्तूची पायाभरणी दि.४ जानेवारी १९४७ रोजी झाली. तर २१ जानेवारी १९५० रोजी भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन केले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक मोजमापांसाठी जी ठरावीक मानके असतात, त्यांचे आपापल्या देशातील शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात योग्य पालन व्हावे अशी अट आंतरराष्ट्रीय एकक समितीने घातलेली असते. ही अट प्रत्येक देशातल्या संशोधन क्षेत्राला लागू असते. अर्थात या सर्व बाबींवर देखरेख करणारी त्या त्या देशाची एक राष्ट्रीय संशोधन संस्था असते. आंतरराष्ट्रीय एकक समितीच्या वतीने भारतातील हे सगळे काम पाहणारी संस्था म्हणजेच एनपीएल. गेली अनेक वर्षे एनपीएल, आंतरराष्ट्रीय एकक समितीच्या प्राथमिक आदेशाची रक्षणकर्ता म्हणून काम करत आहे.

विद्यार्थ्यांसाठी विविध संधी 

एनपीएलमध्ये विज्ञानाच्या अनेक शाखांमध्ये  संशोधन होते. त्यामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र व जीवशास्त्राशी संबंधित इतर शास्त्रे, गणित, जिओफिजिक्स, पर्यावरण, अभियांत्रिकी यांचा समावेश आहे. या संस्थेमध्येही Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यास पूर्ण करता येतात. एनपीएलमधील बहुतांश संशोधन पदार्थविज्ञानातच होते पण त्यातही विशेषत: फिजिक्स ऑफ एनर्जी हार्वेस्टिंग, मटेरिअल्स फिजिक्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, रेडिओ अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स, टाइम फ्रीक्वेन्सी अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल स्टँडर्ड्स, अ‍ॅपेक्स लेव्हल स्टँडर्ड्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल मेट्रॉलॉजी, क्वांटम फेनोमेना अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन्स, सोफिस्टिकेटेड अ‍ॅण्ड अ‍ॅनालिटिकल इन्स्ट्रय़ुमेंट्स या क्षेत्रांमधील संशोधन ही एनपीएलची मक्तेदारी आहे.

एनपीएल भारतातील अनेक विद्यापीठांशी पदार्थविज्ञानातील व इतर आंतरविद्याशाखीय संशोधनासाठी किंवा तत्सम अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. दरवर्षी सीएसआयआर किंवा यूजीसीच्या परीक्षांमधून गुणवत्ता मिळवलेले अनेक जेआरएफ वा एसआरएफ विद्यार्थी एनपीएलमध्ये पीएचडी करण्यासाठी प्रवेश घेतात.

संशोधनातील योगदान 

एनपीएलने विज्ञानाच्या मूलभूत आणि उपयोजित संशोधनात बरेच योगदान दिले आहे. निवडणुकीत बोगस मत रोखण्यासाठी वापरली जाणारी जी शाई असते त्यासाठीचे रासायनिक सूत्र एनपीएलच्या शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. तसेच एनपीएलमध्ये बायोमेडिकल इन्स्ट्रय़ुमेन्टेशन विभागाच्या माध्यमातून बायोसेन्सरच्या विकासावर संशोधन केले जातेय. हा विभाग सध्या कोलेस्ट्रॉल मापन आणि युरीक अ‍ॅसिड डिटेक्शनसाठी बायोसेन्सर विकसित करत आहे.

संपर्क

नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी, डॉ. के. एस. कृष्णन मार्ग,

नवी दिल्ली – ११००१२.

दूरध्वनी: +९१ ११४५६०९२१२.

Email: nplguesthouse@nplindia.org

संकेतस्थळ – http://www.nplindia.in

itsprathamesh@gmail.comv

First Published on January 11, 2018 1:32 am

Web Title: physics fundamental and applied research