20 January 2019

News Flash

एमपीएससी मंत्र : भौतिकशास्त्राचा अभ्यास

जीवशास्त्र या रसायनशास्त्र या विषयांइतकी सुसूत्रता यामध्ये कधीच पाहायला मिळत नाही.

प्रतिनिधिक छायाचित्र

विज्ञानामधील जीवशास्त्र, रसायनशास्त्र यानंतर शेवटचा तरीही तेवढाच महत्त्वाचा विषय म्हणजे भौतिकशास्त्र. सन २०१३ ते २०१७च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विज्ञान या विषयावरील सर्वाधिक स्थित्यंतर ज्या घटकामध्ये झाले तो म्हणजे भौतिकशास्त्र. जीवशास्त्र या रसायनशास्त्र या विषयांइतकी सुसूत्रता यामध्ये कधीच पाहायला मिळत नाही. प्रत्येक वर्षीच्या परीक्षेमध्ये वेगळ्या घटकांवर प्रश्न विचारलेले असतात, तरीही सर्व प्रश्नपत्रिकांचे एकत्रपणे सूक्ष्मपणे निरीक्षण केल्यास असे दिसून येते की, विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये विशिष्ट साच्यामधीच प्रश्न विचारले गेले आहेत

उदा. २०१३ – वस्तुनिष्ठ प्रश्न

२०१४ – संकल्पनात्मक प्रश्न

२०१५ व २०१६ – वस्तुनिष्ठ + तर्कविषयक

२०१७ – सांख्यिकीविषयक.

वरील पाचही प्रश्नपत्रिकांमध्ये केवळ एक समान धागा आहे, तो म्हणजे भौतिकशास्त्राची उपयोजितता, म्हणून भौतिकशास्त्र विषयांचा अभ्यास अभ्यास करत असताना.

१) वस्तुनिष्ठ  २) संकल्पनात्मक  ३) तर्कविषयक  ४) सांख्यिकीय ५) वरील सर्वाची उपयोजितता.

भौतिकशास्त्र विषयाच्या या विविध आयामांमुळे हा विषय अवघड वाटणे साहजिक आहे. परंतु आता आपल्याकडे वर दिलेले मुद्दे आहेत. तेव्हा या विषयाचा अभ्यास करीत असताना अभ्यासक्रमातील कोणताही मुद्दा राखीव ठेवता येणार नाही. भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी राज्य पाठय़पुस्तक मंडळाची जुनी तसेच नवीन (नवीन पुस्तके अधिक उपयुक्त) पुस्तके वाचणे आवश्यक आहे तसेच सोबत Lucents (ल्युसेंटचे) General Science हे पुस्तक वाचल्यास त्याचा अधिक फायदा होईल.

भौतिकशास्त्राच्या अभ्यासामध्ये –

अ)

१) बल २) दाब ३) कार्य ४) ऊर्जा ५) शक्ती ६) उष्णता ७) तापमान ८) पदार्थाचे अवस्थांतर ९) तापमान  पद्धती (राशी व एकके) असे अनेक लहान घटक आहे. यातील प्रत्येक घटकाचे टिपण काढायचे झाल्यास एका पाठपोठ पानापेक्षा जास्त होता कामा नये.

ब)

१) प्रकाश २) ध्वनी

३) भिंगे  ४) धाराविद्युत ५) चुंबकत्व ६) गती व गतीविषयक समीकरणे

इ. मोठे घटक यांचा समावेश भौतिकशास्त्रामध्ये होतो.

वरील सर्व घटकांचा अभ्यास सुरू केल्यानंतर सर्वप्रथम लहान घटकांमधील वस्तुनिष्ठ बाबी व त्यांच्या संकल्पना व्यवस्थित पाठ कराव्यात. त्यांचा उपयोग मोठय़ा घटकांच्या अभ्यासात होतो.

वस्तुनिष्ठ व संकल्पनात्मक बाबी आत्मसात केल्यानंतरच संख्यात्मक बाबींकडे लक्ष द्यायला हवे. संकल्पना स्पष्ट नसतील तर प्रश्न सोडवता येणार नाहीत. सांख्यिकीय प्रश्नांच्या सरावासाठी बाजारातील भरमसाट प्रश्न सोडविले पुस्तक घेण्यापेक्षा पाठय़पुस्तकाच्या पाठाच्या शेवटी केवळ स्वाध्यायामधील प्रश्नांचे अध्ययन करावे, कारण परीक्षेच्या बदलत्या स्वरूपामुळे यापासून मिळणारे लाभ गुणोत्तर प्रमाण

(Cost benefit ratio) कमी आहे. ठरावीक विषयांचे/घटकांचे वस्तुनिष्ठ व संकल्पनात्मक वाचन व आकलन व आत्मग्रहण यांना दैनंदिन जीवनातील विज्ञानाची जोड दिल्यास संपूर्ण विज्ञान व विषयाचे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. विज्ञान हा विषय कला घटक असणाऱ्यांना अवघड वाटतो तो त्यांच्या इंग्रजीमधील नावांमुळे. संकल्पना तर कोणत्याही भाषेत समजावून घेता येऊ शकते. विज्ञान विषयाचे अध्ययन करण्यासाठी सर्वप्रथम मनातून ही भीती काढून टाकणे आवश्यक आहे.

आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिका पुन्हा एकदा सोडविल्यास विचारलेल्या प्रश्नांचा आवाका काय व किती आहे ते लक्षात येईल. त्यासाठी विज्ञान विषयाच्या अभ्यसास सुरुवात करण्याआधी सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे प्रश्नपत्रिकांचे अध्ययन. प्रश्नांचे स्वरूप समजल्यानंतर कोणत्या घटकाला किती महत्त्व द्यायचे हे आपले आपणच ठरवून शकतो. त्यानुसार अभ्यासाची रणनीती बनवू शकतो.

First Published on February 7, 2018 4:45 am

Web Title: physics practice for mpsc exam 2018