20 January 2019

News Flash

यूपीएससीची तयारी : सामाजिक मानसशास्त्र वृत्ती अथवा दृष्टिकोन

एखाद्या गोष्टीविषयी असलेल्या दृष्टिकोनांमधून त्याबद्दलच्या वृत्ती तयार होत असतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

यूपीएससीच्या चौथ्या पेपरचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे सामाजिक मानसशास्त्र (Social Psychology) होय. या घटकामध्ये खालील विषयांचा समावेश होतो –

अ)वृत्ती अथवा दृष्टिकोन (Attitude) (घटक, रचना व कार्ये)

ब) दृष्टिकोनाचा विचार आणि वर्तनाशी असलेला संबंध

क)     दृष्टिकोन – सामाजिक प्रभावाचे आणि मतपरिवर्तनाचे साधन

ड)     नैतिक आणि राजकीय दृष्टिकोन

ई)     भावनिक बुद्धिमत्ता (संकल्पना, उपयुक्तता आणि उपयोजन)

या विषयांची तयारी करण्यासाठी उमेदवारांनी योग्य अभ्यास साहित्याचा वापर करणे आवश्यक आहे. एकंदरीतच वरील विषय हे नेमके व गुंतागुंतीचे असे आहेत. जेव्हा वृत्तींचा किंवा दृष्टिकोनांचा सामाजिक मानसशास्त्रात विचार केला जातो तेव्हा या शब्दाच्या सर्वसाधारण अर्थापेक्षा वेगळा असा अर्थ त्यामध्ये अभिप्रेत आहे. रोजच्या वापरामध्ये जेव्हा आपण या शब्दाचा उपयोग करतो तेव्हा एखाद्याची वृत्ती ‘बेदरकार’, ‘धाडसी’, ‘खुनशी’ आहे, अशा प्रकारे केला जातो. एखाद्या गोष्टीविषयी असलेल्या दृष्टिकोनांमधून त्याबद्दलच्या वृत्ती तयार होत असतात.

वृत्ती म्हणजे काय याच्या विविध व्याख्या आजपर्यंत करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारणत: वृत्ती म्हणजे एक मानसशास्त्रीय स्पष्टीकरण असणारा असा विशिष्ट कल आहे. ज्यामधून व्यक्ती सभोवतालच्या व्यक्तींचे व परिस्थितीचे विश्लेषण करीत असते व त्याआधारे त्या व्यक्तीबद्दल अथवा परिस्थितीबद्दल चांगले किंवा वाईट ग्रह बनत असतात. त्यावर आधारित निर्णय आपण घेत असतो. एखाद्या व्यक्तीबद्दलची अथवा परिस्थितीबद्दलची आपल्या स्मृतीतील सारांश व त्याबद्दलचे आपण करत असलेले ग्रह यांच्यातील दुवा म्हणजे देखील वृत्ती होय. सोप्या भाषेत सांगायचे तर सकारात्मक अथवा नकारात्मक भावना निर्माण करण्याची प्रक्रिया ही या व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असते. या सर्व व्याख्यांमधील सूक्ष्म फरक बाजूला ठेवल्यास एक गोष्ट आपल्या लगेच लक्षात येते ती म्हणजे वृत्ती व त्यावर आधारित निर्णय घेणे अथवा कौल ठरविणे यात जोडलेला मूलभूत संबंध म्हणूनच वृत्ती आपल्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर प्रत्यक्ष परिणाम करत असते. एखादा सामाजिक-सांस्कृतिक मुद्दा, वस्तू, अथवा व्यक्ती हे आवडणे अथवा न आवडणे हे काही अंशी व्यक्तीच्या वृत्तीवर अवलंबून असते. यावरून वृत्ती (Attitude) म्हणजे एकप्रकारे विविध गोष्टींचे/व्यक्तींचे केलेले मूल्यमापन असते, असे आपण म्हणू शकतो. पण मग असा प्रश्न उपस्थित होतो की, हे मूल्यमापन कोणत्या निकषांवर आधारित असते? हे समजून घेण्यासाठी, असे मूल्यमापन कोणत्या घटकांवर अवलंबून असते हे पाहणे गरजेचे आहे. वृत्ती तीन वेगवेगळ्या घटकांनी बनलेल्या असतात. हे तीन घटक पुढीलप्रमाणे –

(i)     आकलनात्मक अथवा ज्ञानात्मक घटक (Cognitive)

(ii)    वर्तनात्मक घटक (Behavioural)

(iii) भावनात्मक घटक (Affective)

वरील सर्व घटक पाहता, ते खूप क्लिष्ट आहेत असे वाटत असले तरी, बारकाईने विचार केल्यास आपल्या आजूबाजूला ते कायम दिसत असतात, हे आपल्या लगेच लक्षात येईल. अनेक वेळा एखादे मत ठरवत असताना आपण फायद्या-तोटय़ांचा सखोल विचार करून ते ठरवत असतो. उदा. लॅपटॉप खरेदी करण्याआधी आपण अतिशय खोलात जाऊन, विविध कंपन्या, त्यांची विविध लॅपटॉप मॉडेल यांचा विचार करून कोणता ब्रँड आपल्याला पसंत आहे हे ठरवतो. पण काही वेळा आपण भावनांच्या प्रतिसादावरून दृष्टिकोन ठरवतो. जसे की, ‘मला या कापडाचा स्पर्श खूप आवडला’ किंवा ‘यावरील कलाकुसर मला खूप भावली’. या सर्वाचा भावनात्मक घटकांत समावेश होतो. वर्तनात्मक घटक हे त्या विषयावरील तुमच्या पूर्वानुभवातून बनतात. एखाद्या उपाहारगृहात जेव्हा तुम्ही आधी गेला होतात तेव्हा तुम्हाला उत्तम सेवा मिळाली, म्हणून तुम्ही पुन:पुन्हा तेथे जाता आणि या प्रक्रियेमधून त्या उपाहारगृहाविषयी तुमचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. अनेक वेळा एखाद्या गोष्टीविषयीच्या वृत्ती एकापेक्षा जास्त घटकांवर सुद्धा अवलंबून असू शकतात. वृत्तीच्या रचनेकडे पाहिल्यास आपल्या असे लक्षात येते की, दृष्टिकोन बनवत असताना व्यक्ती त्या गोष्टीकडे समतोल अंगाने पाहते का याचा विचार केला जातो.

वृत्ती मानवी आयुष्यात प्रामुख्याने काय भूमिका बजावतात यावर डॅनिअल कॅट्झ (Daniel Katz) या मानसशास्त्रज्ञाने काम केले आहे. वृत्तींचे कार्य पुढीलप्रमाणे

* ज्ञानाचे नियोजन

*  उपयुक्तता

*  ‘स्व’चे सरंक्षण

*  तत्त्वांचा स्वीकार

एकंदरीतच वृत्ती अथवा दृष्टिकोनाचे कार्य आपल्या सहज लक्षात येत नसले तरी मानवी आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग व्यापणारे आहे. वरती दिलेल्या ४ मुद्दय़ांविषयी अधिक सखोल चर्चा करणे शक्य आहे. मात्र त्या आधी नागरी सेवेत वृत्तीचे व त्याच्या आकलनाचे काय महत्त्व असते हे समजून घेणे आवश्यक आहे.

प्रस्तुत लेखकांनी नीतीशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमता या पुस्तकाचे लेखन केले आहे.

First Published on January 9, 2018 4:18 am

Web Title: preparation for upsc 2018 exam