स्पर्धा परीक्षांमध्ये मागील वर्षांच्या

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करण्यासाठी संपूर्ण तयारीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या विश्लेषणातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे तर लक्षात येतेच, पण त्याचबरोबर अभ्यासक्रमाशी सांगड घालून हे विश्लेषण केले तर सर्वसाधारणपणे महत्त्वाचे घटकही समजतात. या विश्लेषणातून एखाद्या वर्षी विचारल्या जाऊ शकणाऱ्या अपेक्षित मुद्दय़ांचा अंदाजही घेता येतो. अशा विश्लेषणातून पूर्वपरीक्षेतील वेगवेगळ्या घटकविषयांमधील अंदाजे अपेक्षित घटक व त्यातील अपेक्षित मुद्दे यांबाबत या व पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

इतिहास विषयाबाबत चालू घडामोडी हा मुद्दा असंबद्ध वाटू शकतो, पण तो तसा नाही. एखाद्या वेळी एखाद्या ऐतिहासिक घटना, व्यक्ती किंवा निर्णयाबाबत नव्याने चर्चा, विवाद सुरू झाले तर तो मुद्दा अपेक्षित यादीमध्ये समाविष्ट करावा. ज्या ऐतिहासिक घडामोडींना ३००, २००, १७५, १५०, १००, ७५, ५०, २५ वष्रे पूर्ण झाली असतील त्यांचाही समावेश या यादीत होतो. ऐतिहासिक व्यक्तीची जन्मशताब्दी किंवा १००वा स्मृतिदिन असल्यास त्यांच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो.

मागील काही वर्षांपासून संयुक्त महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रातील समाजसुधारक व क्रांतिकारक यांच्यावर प्रश्न विचारण्याचा कल वाढलेला आहे. मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास एप्रिल २०१८च्या पूर्वपरीक्षेमध्ये पुढील मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्याची अपेक्षा करतायेईल.

  • संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महत्त्वाचे नेते
  • भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील सन १९४२ पासूनचे महत्त्वाचे टप्पे व निर्णय
  • चलेजाव चळवळ आणि त्या दरम्यान सुरू असलेल्या चळवळी (साताऱ्याचे प्रतिसरकार, इ.)
  • क्रांतिकारी चळवळीचा दुसरा टप्पा व त्यातील महाराष्ट्राच्या क्रांतिकारकांचे योगदान
  • चंपारण्य सत्याग्रह तारीख, १९१८मधील गांधीजींचे इतर सत्याग्रह, त्यांच्या सर्व सत्याग्रहांचा क्रम व समकालीन आंतरराष्ट्रीय घटना
  • काँग्रेसचे सन १९१६चे अधिवेशन, महत्त्व, अध्यक्ष व त्याबाबत टिळकांची भूमिका
  • दादाभाई नौरोजी, त्यांची काँग्रेस अध्यक्षपदे, कार्य
  • वृत्तपत्रे, त्यांचे संपादक आणि बोधवाक्ये
  • वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य, नोकरी, इ.
  • रवींद्रनाथ टागोर यांचे कार्य
  • इंग्रज मराठा युद्धे व त्यांची निष्पत्ती, तह
  • टिपू सुलतान आणि त्याचे विचार, प्रशासन व कार्य, इंग्रजांबरोबरची युद्धे व तह
  • विजयनगर साम्राज्यातील वंशियांचा क्रम, महत्त्वाचे राजे, कृष्णदेवरायची कारकीर्द व त्याच्या दरबारामध्ये आलेले परदेशी प्रवासी. या कालावधीतील भारतभेटीवर आलेल्या परदेशी प्रवाशांची वर्णने विशेषत: बाबरेसा, अब्दुल रज्जाक, डॉिमगो पाएस, इ.
  • सम्राट अकबर आणि त्याचे कार्य व युद्धे
  • मोहम्मद तुघलक आणि त्याच्या मोहिमा व महत्त्वाचे निर्णय
  • संगम साहित्यातील साहित्यिक व त्यांची पुस्तके (पुस्तकातील विषयांचे वर्णन)
  • प्राचीन ग्रंथ, त्यांचे विषय व लेखक (अर्थशास्त्रज्ञ चाणक्य, प्लिनी – नॅचरल हिस्ट्री, टॉलेमी – भूगोल, इ.)
  • मेगास्थेनिसचा इंडिका हा ग्रंथ व त्यातील भारतीय समाजाचे वर्णन
  • मौर्य शासक आणि त्यांचा क्रम, सम्राट अशोकाचे शिलालेख, त्यांची संख्या, ठिकाणे आणि त्यांमधील लिपी व भाषा
  • वैदिक साहित्य आणि त्यातील महत्त्वाचे उल्लेख. (नद्या व त्यांची वैदिक नावे किंवा धातू / दागिना / अन्नपदार्थ / राजा / मुलगी यांच्यासाठीचे वैदिक शब्द)
  • सिंधू संस्कृतीमधील पुरातत्त्व स्थळे आणि तेथील उत्खननामध्ये सापडलेल्या महत्त्वाच्या वस्तू (एखादे स्थळ विचारण्यापेक्षा जोडय़ांवर आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता अधिक)

या अपेक्षित मुद्दय़ांचे सर्व आयाम व्यवस्थित समजून घेतल्यास त्याचा या पूर्वपरीक्षेमध्ये फायदा होईल. अर्थात पूर्वपरीक्षेचा इतिहास हा घटक एवढय़ा मुद्दय़ांपर्यंतच सीमित आहे असे समजून अभ्यास मर्यादित करण्यासाठी ही अपेक्षित यादी नाही. अभ्यास करताना या मुद्दय़ांवर जास्त भर देणे उपयुक्त ठरेल व जास्तीतजास्त गुण मिळवण्यासाठी या विश्लेषणावर आधारित यादीची नक्कीच मदत होईल.

पुढील लेखामध्ये भूगोल आणि पर्यावरण या विषयांच्या अपेक्षित मुद्दय़ांबाबत चर्चा करण्यात येईल.