नाइकवाडे

राज्य लोकसेवा आयोगाकडून शासनाच्या विविध विभागांमधील पदांवर भरतीसाठी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येतात. संबंधित पदांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेऊन त्या पदांसाठी परीक्षा पद्धती, तिचा अभ्यासक्रम आणि काठीण्य पातळी ठरविण्यात येते. त्यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकांचा पॉटर्न व दर्जा यामध्ये फरक असतो.

गट अ आणि गट ब राजपत्रित पदांसाठीची राज्यसेवा परीक्षा ही गट ब अराजपत्रित अधिकारी व गट क कर्मचारी यांच्या निवडप्रक्रियेपेक्षा अभ्यासक्रम आणि काठीण्य पातळी यांपेक्षा वेगळी आहे. मात्र या दुय्यम सेवांच्या परीक्षांमध्ये बरेच साम्य आहे आणि त्यांची कमी वेळेत एकत्रित तयारी करणे शक्य आहे. या सेवांच्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे आणि परीक्षेचे स्वरूपही.

गट ब अराजपत्रित व गट क सेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप

यामध्ये फरक आहे तो काठिण्य पातळीचा. गट ब अराजपत्रित पदांसाठी आयोगाने विहीत केलेला प्रश्नांचा दर्जा आहे पदवीचा तर गट कसाठी बारावीचा. एकाच अभ्यासक्रमावर आयोगाकडून वेगवेगळ्या स्तराचे प्रश्न कसे विचारले जातात त्याचे उदाहरण पाहू.

गट ब सेवा प्रश्न

प्रश्न खालीलपैकी कोणते विधान / विधाने

सत्य आहेत?

(अ) ३० जून २०१४ रोजी भारताच्या       पी.एस.एल.व्ही – सी.२३ ने चार देशांचे पाच उपग्रह प्रक्षेपित केले.

(ब) पी.एस.एल.व्ही – सी.२३ चे वजन २३० टन असून उंची ४४.४ मीटर आहे.

(क) पी.एस.एल.व्ही – सी.२३ चा खर्च रु.१०० कोटी इतका आहे.

(ड) प्रक्षेपकाने आजपर्यंत परदेशांचे ३० व भारताचे ३५ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.

पर्याय

१.  अ आणि ब

२.  ब केवळ

३.  अ, ब आणि क

४.  वरील सर्व

गट क सेवा प्रश्न

खालील विधाने विचारात घ्या.

(अ) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना १९८४ मध्ये झाली.

(ब) ‘आर्यभट्ट’ हा भारताचा पहिला उपग्रह होता, इस्रोने चांद्रयान व मंगळयान या मोहिमा यशस्वी केल्या आहेत.

(ड) १५ फेब्रुवारी २०१७ रोजी इस्रोने १०४ उपग्रह अवकाशात सोडून जागतिक विक्रम केला.

वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/त?

१.   अ, ब आणि क      २. अ, क आणि ड

३.    ब, क आणि ड      ४. अ, ब आणि ड

वरील प्रश्न हे एकाच मुद्यावर विचारण्यात आलेले आहेत. त्यांचे विश्लेषण केल्यावर पुढील बाबी समजून येतात.

* दोन्ही प्रश्न बहुविधानी असले तरी गट कसाठीच्या प्रश्नातील मुद्दे हे गट बसाठीच्या प्रश्नातील मुद्दय़ापेक्षा ढोबळ आणि थेट आहेत.

* गट कमधील विधाने ही तथ्यात्मक माहिती  विचारणारी असली तरी ही तथ्ये त्यामध्ये बारकाईने व नेमकेपणाने माहीत असणे आवश्यक असल्याचे दिसते. पी.एस.एल.व्ही – सी.२३ चा खर्च हा त्यावेळी बातम्यांमधील मुख्य चच्रेचा मुद्दा होता. इतक्या कमी खर्चामध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता भारताकडे आल्याने जागतिक उपग्रह प्रक्षेपण बाजारामध्ये भारताच्या सेवांची मागणी भविष्यात वाढण्याच्या शक्यतांचा आढावा घेतला जात होता. त्यामुळे हा खर्चाचा आकडा आणि त्याबरोबर इतर तथ्ये विचारण्यात आली आहेत.

* गट क सेवेसाठीच्या प्रश्नामध्ये भारताने जागतिक विक्रम केल्यावर सदर प्रश्न विचारलेला आहे. पण यामध्ये इतर देशांचे विक्रम किंवा भारताचाच या आधीचा विक्रम किंवा या प्रक्षेपणाची इतर अनन्य वैशिष्टय़े विचारलेली नाहीत. त्याऐवजी बारावीच्या स्तराचे ढोबळ मुद्दे विचारलेले आहेत.  हे मुद्दे पारंपरिक अभ्यासक्रमाचा भाग आहेत आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही उमेदवाराला त्या विषयातील अतिरिक्त प्रावीण्य न मिळवताही या बाबी माहीत असणे सर्वसामान्यपणे अपेक्षित असते.

* थोडक्यात चालू घडामोडींमध्ये गट बसाठीच्या प्रश्नांमध्ये मुख्य मुद्दय़ाशी संबंधित महत्त्वाचे चच्रेतील मुद्दे माहीत असणे आवश्यक आहे. तर गट कसाठी संबंधित पारंपरिक मुद्दे माहीत असणे आवश्यक आहे. दोन्ही बाबी व्यवस्थित समजून घेतल्यास दोन्ही परीक्षांसाठी एकाच वेळी अभ्यास करणे शक्य आहे.

* मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे बारकाईने विश्लेषण केल्यावर लक्षात येते की राज्यशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान व अर्थव्यवस्था या घटक विषयांच्या मूलभूत संकल्पनांवर प्रश्न विचारण्यात येतात तर. इतिहासामध्ये तथ्यात्मक मुद्दे आणि व्यक्तींवर आधारित प्रश्न विशेषत्वाने विचारण्यात येतात.

*  वरील पद्धतीने सामान्य अध्ययनाच्या इतर घटकविषयांचा विचार केल्यास पदवीचा स्तर आणि बारावीचा स्तर यांमधील फरकाचे मुद्दे लक्षात येतील. पदवीच्या स्तरावरून अभ्यास करताना पारंपरिक मुद्दय़ांची नोंद केल्यास या दोन्हीचा अगदी राज्यसेवेसाठीसुद्धा उपयोग होऊ शकेल.