कंपनी आपल्याला नोकरीला ठेवते तेव्हा नुसता पगार देत नाही तर बऱ्याच काही गोष्टी त्याबरोबर देते. त्यातील मुख्य म्हणजे तुमची नवीन ओळख. कंपनीतील अमुक जबाबदारी पेलणारा कर्मचारी म्हणून ही ओळख असते. कंपनीची जनमानसातील प्रतिमा, त्यांची तत्त्वे, कंपनीला मिळणारा आदर यांची साथ व आधार तुम्हाला आपोआप मिळतो. यामुळेच कंपनीने जबाबदारीने दिलेल्या अनेक वस्तूंचे व गोष्टींची जपणूक व निगराणी करणे हे तुमचे कर्तव्य ठरते.

तुम्हाला दिलेली मालमत्ता व्यवसायवृद्धीसाठी आहे, वैयक्तिक वापरासाठी नाही ही जाणीव मनात पक्की राहायला हवी. ज्या क्षणी नोकरीचा स्वीकार केलात त्या क्षणापासून एक नवी जबाबदारी तुमच्यावर येते. ती म्हणजे तुमच्या जबाबदारीनुसार तुम्हाला मिळालेली कंपनीची मालमत्ता सांभाळणे, त्याची हानी, चोरी, गैरवापर होऊ न देणे.

यातील काही वस्तूंची यादी अशी

*    कंपनीचे नाव व चिन्ह (लोगो), संगणक, लॅपटॉप, मोबाइल फोन आणि साहाय्यक उपकरणे.

सॉफ्टवेअर आणि सॉफ्टवेअर परवाने.

*   कार्यालयीन सामान, दरवाजाच्या / कपाटांच्या किल्ल्या.

*   फॅक्स, कॉपी मशीन आणि इतर कार्यालयीन उपकरणे.

*   पुस्तके, इलेक्ट्रॉनिक माध्यम, सीडीज, डीव्हीडी, यूएसबी आणि इतर माध्यमे,

*   व्यवसाय योजना, संशोधन व विकास, सहयोगी संस्थांबरोबरच्या कराराचा तपशील यांची माहिती.

*   उत्पादनाचे व गुणवत्ता नियंत्रणाचे तंत्रज्ञान

*   ग्राहक, पुरवठादार आणि वितरक यांची सूची आणि माहिती

जर चोरी झाली असेल, मालमत्तेचा किंवा निधीचा दुरुपयोग किंवा अपव्यय झाला असेल किंवा त्यांच्या योग्य वापराबद्दल काही प्रश्न असतील तर आपल्या व्यवस्थापक किंवा प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांशी मोकळेपणाने बोलावे. कंपनीच्या संपत्तीचा गैरवापर करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचा भंग आहे आणि तो एक गुन्हा ठरू शकतो. अशा सुविधा / मालमत्ता व्यक्तिगत उपयोगासाठी वापरल्या तर कारवाई होऊन तुमची नोकरी पण जाऊ  शकते.

इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा सेवा – ई-मेल, इंटरनेट, इंट्रानेट्स, टेलिफोन, कॉम्प्युटर उपकरणे, व्हिडीओ/ व्हॉइस आणि अन्य प्रकारच्या संवादसेवा याबद्दल घ्यायची विशेष काळजी : वरील सर्व उपकरणे / सेवा उपलब्ध करून देताना, त्यांचा सुयोग्य व सुरक्षित उपयोग व्हावा, गोपनीयता रहावी यासाठी कंपनी प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र ओळख क्रमांक (Login id-  लॉगइन आयडी) व संकेतशब्द (पासवर्ड) देते. अशा वेळी तुम्ही या दोन्ही गोष्टी फक्त आणि फक्त तुमच्या कामाशी संबधित कारणासाठीच वापरल्या पाहिजेत. त्या कोणालाही सांगितल्या जाणार / कळणार नाहीत याची काळजी घेऊन सुरक्षित ठेवणे आवश्यक असते.

या सर्व सिस्टिम्स व्यावसायिक कामासाठी दिल्या आहेत. विशिष्ट परिस्थितीत वैयक्तिक उद्देशासाठी ई-मेल, इंटरनेट, इंट्रानेट आणि फोनचा मर्यादित आणि प्रासंगिक वापर करण्याची परवानगी कंपनी देईलही, तथापि, तुम्ही वैयक्तिक कारणासाठी त्याचा अति वापर केल्यास ही कृती बहुतेक वेळेस निषिद्ध समजली जाईल. अनुषंगिक कारवाई व शिक्षा भोगावी लागेल.

इलेक्ट्रॉनिक उपकरणे / माध्यमे वापरायला सोपी असतात असा बहुतेकांचा समज आहे. पण बरेच वेळा या गोष्टी कशा वापराव्या याचे सखोल ज्ञान आवश्यक ठरते. अन्यथा चुकीच्या वापरामुळे, अजाणतेपणीसुद्धा अवांछित व्यक्तींकडे कंपनीची गोपनीय माहिती जाऊ शकते, जो मोठाच गुन्हा ठरतो. यामुळेच तुम्हाला कंपनीने दिलेली कुठलीही उपकरणे किंवा सुविधेचा वापर प्रथम नीट अभ्यासून घ्या.

ई-मेलसारखी लेखी संवाद साधने वापरताना उत्तम भाषेचा वापर करा. सम्यक विचारच त्यात मांडा. निष्काळजी, अतिशयोक्तीपूर्ण किंवा चुकीची ई-मेल विधाने टाळा. अशी विधाने तुमच्या  किंवा कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई करताना वापरली जाऊ  शकतात.

अपमानकारक किंवा इतर व्यक्तीस छळवणारी कोणतीही माहिती पाठवू किंवा डाउनलोड करू नका.

अश्लील, जुगार किंवा गेमिंग किंवा तत्सम सामग्रीशी संबंधित असलेल्या इंटरनेट साइट्स कंपनीमध्ये पाहणे निषिद्ध असते.

संगीत, चित्रफिती, छायाचित्रे डाउनलोड करण्याची सुविधा वापरून कॉपीराइटचा भंग करू नका. तसेच वैयक्तिक वापरासाठी कुठलेही अ‍ॅप्लिकेशन / प्रोग्रॅम / गेम डाउनलोड करू नका.

नोकरीच्या पहिल्या वर्षांत अज्ञानामुळे किंवा नाठाळ सहकाऱ्यांच्या अवास्तव दडपणामुळे बऱ्याच चुका होऊ  शकतात. तेव्हा काळजी घ्या, खंबीर राहा व सदैव सतर्क राहा.

डॉ. जयंत पानसे  dr.jayant.panse@gmail.com