बक्र्बेक विद्यापीठाच्या व्यवसाय, अर्थशास्त्र व माहिती विभागाच्यावतीने दरवर्षी एमफील व पीएचडी अभ्यासक्रमांचे उच्चशिक्षण घेऊ  इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमांसाठी बक्र्बेक विद्यापीठामध्ये निशुल्क प्रवेश, उत्तम वार्षिक विद्यावेतन व इतर सर्व सोयीसुविधा असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे एकंदरीत स्वरूप आहे. संगणक विज्ञान, अर्थशास्त्र, गणित, सांख्यिकी, व्यवस्थापन आणि मानसशास्त्र या विषयांपैकी कोणत्याही एका विषयामधील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून विद्यापीठाने अर्ज मागवले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल

लंडनमधील ब्लुम्स्बरीमध्ये असलेले ‘बक्र्बेक युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’ हे तेथील एक प्रमुख शासकीय विद्यापीठ आहे. ते शिक्षण आणि संशोधनातील कामगिरीसाठी जगातील अग्रगण्य विद्यापीठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. टाइम्स हायर एज्युकेशन अ‍ॅवॉर्डसकडून या विद्यापीठाला अनेकदा ‘युनिव्हर्सिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरवले गेलेले आहे. जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या १५० तर युरोपमधील पहिल्या २५ विद्यापीठांमध्ये स्थान मिळवणाऱ्या बक्र्बेक विद्यापीठाला म्हणूनच आंतरराष्ट्रीय वर्तुळात ‘ग्लोबल एलिट’ या नावाने संबोधले जात असावे.

बक्र्बेक विद्यापीठाच्या ‘व्यवसाय, अर्थशास्त्र व माहिती विभागाच्या (The School of Business, Economics & Informatics) वतीने दरवर्षी व्यवसाय, अर्थशास्त्र व माहिती तंत्रज्ञानातील एमफील व पीएचडी अभ्यासक्रमांचे उच्चशिक्षण घेऊ  इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत एकूण नऊ  आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एमफील व पीएचडीच्या संशोधन अभ्यासक्रमासाठी पूर्णवेळ शिष्यवृत्ती बहाल केली जाते. पीएचडी व एमफील दोन्ही अभ्यासक्रमांचा संपूर्ण कालावधी वेगवेगळा असल्याने दोन्हींसाठी शिष्यवृत्तीचा कालावधी वेगवेगळा आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत विद्यापीठाकडून पीएचडी व एमफील दोन्ही अभ्यासक्रमांच्या पूर्ण कालावधीकरता शिष्यवृत्तीधारकाला १६,५५३ युरोज वार्षिक वेतन देण्यात येईल. शिष्यवृत्तीधारकाचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ केले जाईल. याव्यतिरिक्त शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला येण्या-जाण्याचा विमानप्रवास भत्ता, प्रकल्प निधी, संशोधनासाठी आवश्यक असलेल्या प्रवासासाठी भत्ता, आंतरराष्ट्रीय आरोग्य विमा यांसारख्या इतर सर्व सोयीसुविधाही दिल्या जातील. शिष्यवृत्तीधारकाला शिष्यवृत्ती स्प्रिंग २०१७ साठी बहाल केली जाईल, जेणेकरून त्याला त्याचा अभ्यासक्रम २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांमध्ये सुरू करता येईल. प्रत्येक वर्षांच्या शेवटी शिष्यवृत्तीधारकाच्या वर्षभरातील कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल व त्या आधारावर त्याची पुढील वर्षांची शिष्यवृत्ती सुरू राहील.

आवश्यक अर्हता 

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांना खुली आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार संगणक विज्ञान, अर्थशास्त्र, गणित, सांख्यिकी, व्यवस्थापन आणि मानसशास्त्र या विषयांपैकी कोणत्याही एका विषयामधील पदव्युत्तर पदवीधर असावा. अर्जदाराची पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. त्याचे बोली व लेखी इंग्रजीवर प्रभुत्व असावे. अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएसपैकी एका इंग्रजी भाषेच्या परीक्षेत अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. अर्जदाराकडे पदवीस्तरावर एखाद्या नामांकित प्रयोगशाळेतील किंवा संस्थेतील संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तिपत्र असावे.

अर्ज प्रक्रिया

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज विद्यपीठाच्या संकेतस्थळावरील ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे जमा करावा. अर्जदाराने त्याच्या वैयक्तिक व शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एसओपी, त्याचा सीव्ही, त्याने पदवी व पदव्युत्तर अभ्याक्रमात पूर्ण केलेल्या प्रकल्प किंवा संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध, अथवा जर अर्जदाराने शोधनिबंधाच्या स्वरूपात त्याचे एखादे संशोधन प्रकाशित केले असल्यास त्याची प्रत, तसेच त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या तीन प्राध्यापक किंवा मार्गदर्शक तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, त्याचे टोफेल किंवा आयईएलटीएसचे गुणांकन, संशोधन, अनुभवाचे प्रशस्तिपत्र, पारपत्राची व राष्ट्रीय ओळखपत्राची साक्षांकित प्रत इत्यादी सर्व गोष्टी अर्जाबरोबर जमा कराव्यात. अर्जदारांचे अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

निवड प्रक्रिया

  • अर्जदाराने अर्ज केलेल्या विषयातील त्याची गुणवत्ता व संशोधनातील आवड लक्षात घेऊन अंतिम निवड केली जाईल.

महत्त्वाचा  दुवा

  • http://www.bbk.ac.uk/

]अंतिम मुदत

  • या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २ मे २०१७ आहे.

itsprathamesh@gmail.com