सह्यद्री प्राथमिक विद्यामंदिर, संगमनेर या शाळेतील शिक्षिका अनिता पवार यांची हातोटी आहे, विषय अगदी सोप्पा करून शिकवणे आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुंदर शैक्षणिक साहित्य तयार करणे. त्यांनी विविध विषयांसाठी तब्बल ३०० आकर्षक अभ्यासपत्रे तयार केली आहेत.

सह्यद्री प्राथमिक विद्यामंदिर, संगमनेर ही खासगी शाळा आहे. येथे बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले जातात. या शाळेतील विद्यार्थी गणित, मराठी आणि इंग्रजीचे धडे अगदी पहिलीपासून गिरवत आहेत, पण अभ्यास म्हणून नव्हे तर खेळाच्या माध्यमातून. अगदी गमतीजमतीने. याचे कारण आहेत त्यांच्या शिक्षिका अनिता पवार. अनिता गप्पांतून आणि खेळांतून विद्यार्थ्यांची भाषेशी मैत्री करून देतात. पहिलीपासून इंग्रजी शिकवायचे म्हणजे शिक्षकासाठी एक मोठीच गोष्ट असते. कारण पहिलीची मुले म्हणजे अगदी लहान. मुळात एकाजागी बसून अभ्यास करायचा, ही गोष्टच त्यांच्या पचनी पडण्यास कठीण. त्यात अशा दोन भाषा शिकवायच्या म्हणजे शिक्षकाला काही युक्त्या कराव्याच लागतात. अनिता यासाठी द्विभाषा प्रकल्प राबवतात. यामध्ये त्या मराठी आणि इंग्रजीची एकत्रित अक्षरओळख करून देतात. म्हणजे आंब्याची माहिती सांगितली तर त्याला मँगो म्हणतात, त्याचा रंग पिवळा म्हणजेच यल्लो आहे, हेसुद्धा लगोलग सांगितले जाते. अर्थात हे सगळे विद्यार्थ्यांसमोर येते आकर्षक अभ्यासपत्रांतून. अशी अभ्यासपत्रे तयार करणे हे अनिता यांचे एक वैशिष्टय़च झाले आहे. मुळात या अभ्यासपत्रांची कल्पना त्यांना सुचली ती शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना तयार करताना.

अकरा वर्षांपूर्वी त्या जेव्हा या शाळेत रुजू झाल्या तेव्हा त्यांना चौथीचा वर्ग मिळाला. या वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी तयारी करून घेताना त्यांच्या लक्षात आले की, आपण या विद्यार्थ्यांवर चौथीत आल्यावर एकदम अनेक गोष्टींचा मारा करतोय. म्हणजे विद्यार्थ्यांना गणित, मराठी असे विषय समजलेले असतात, पण त्यातील काठिण्य पातळीच्या प्रश्नांशी त्यांची कधीच गाठ पडलेली नसते, शिष्यवृत्ती परीक्षेत नेमके असेच प्रश्न येतात. त्याऐवजी त्यांची शिष्यवृत्तीची तयारी आपण आधीपासूनच करून घेतली तर जास्त बरे होईल. हे करण्याची संधीही त्यांना लगेच पुढच्या वर्षी मिळाली. त्यांच्याकडे पहिलीचा वर्ग आला. हाच वर्ग त्यांना चौथीपर्यंत न्यायचा होता. मग अनिता यांनी प्रयोगांना सुरुवात केली ती खेळापासून. त्यांनी विशेष शैक्षणिक खेळ सुरू केले. म्हणजे वेगवेगळ्या फुलांची, फळांची नावे विद्यार्थ्यांकडून तालात म्हणून घ्यायला सुरुवात केली. हळूहळू मुलांना घरून विचारून काही नावे आणायला सांगितली. हा गृहपाठ होता खरा, पण त्याच्या स्वरूपामुळे विद्यार्थ्यांना त्याचे ओझे जाणवत नव्हते. व्याकरणाच्या बाबतीत त्यांना आधी नामांच्या याद्या बनवायला सांगितल्या. फळे, प्राणी यांच्या नावांच्या याद्या आणायला सांगितल्या. आधी तोंडी असलेला गृहापाठ लिखाणाची सुरुवात झाल्यावर लेखी द्यायला सुरुवात केली.

दिवाळीनंतर विद्यार्थी लिहू लागल्यावर अनिता यांनी हाच अभ्यास लेखी द्यायला सुरुवात केली. घरचा अभ्यास अगदी साचेबद्ध नसल्याने विद्यार्थी तो हौसेने करू लागले. मग विशेष नामे, विशेषणे, क्रियापदे अशाप्रकारे अनिता यांनी त्यांच्याकडून घरच्या अभ्यासातच या गोष्टी करून घेतल्या. पण कधीही हे करून घेताना आपण क्रियापद शिकतो आहोत किंवा नाम शिकतो आहोत, याचा उच्चारही केला नाही. यामुळे या गोष्टी अभ्यास म्हणून न होता गंमत म्हणून झाल्या आणि मनोरंजक स्वरूपामुळे अधिक लक्षात राहिल्या. हाच वर्ग त्यांच्याकडे सलग दुसरी-तिसरी आणि चौथीसाठीही येणार होता. त्यामुळेच दरवर्षी अनिता या विद्यार्थ्यांचे अशाचप्रकारे उपक्रम घेत गेल्या. त्यांनी प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासपत्रे बनवली. या अभ्यासपत्रांवर विद्यार्थ्यांना शिकवलेल्या विषयावरचेच अगदी सोपे प्रश्न असायचे. वर्गानुरूप या अभ्यासपत्रांची काठिण्यपातळी वाढत जायची. अशाप्रकारची तब्बल ३०० अभ्यासपत्रे अनिता यांनी स्वत: बनवली. या अभ्यासपत्रांवर फक्त व्याकरणच नव्हे तर बुद्धिमत्ता चाचणी, गणित यामधीलही छोटे प्रश्न आले. गणित तर अनिता यांनी कधीही फळ्यावर शिकवले नाही. कायम आधी व्यवहारातील उदाहरणे त्या देत असत. मग त्यामागील गणिती क्रिया समजावून सांगत. यामुळे विद्यार्थ्यांना सूत्रे पाठ करावी लागली नाहीत. गुणाकार का करायचा, बेरीज का करायची यामागचे कारण समजल्यानंतर विद्यार्थ्यांची गणिताची भीती गेली. ते अधिक सोपे झाले. अनिता यांनी कायम वर्गामध्ये गटपद्धती राबवली. त्या म्हणतात, ६० मुलांच्या वर्गात सर्वाचीच आकलनक्षमता समान नसते. मग मुलांच्या आकलनक्षमतेनुसार त्यांचे गट तयार केले. जास्त आकलनक्षमतेच्या विद्यार्थ्यांना पटकन शिकवून होई. ती मुले अभ्यासपत्रे सोडवत बसत तर कमी आकलनक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांवर जास्त मेहनत घेता येत असे.

कधीकधी तर विद्यार्थ्यांना आणखी गंमत वाटावी म्हणून त्यांनी शैक्षणिक साहित्यातही अनेक बदल केले. मग विशेषणे समजून देताना वर्गात निरनिराळ्या प्रकारची, रंगाची, आकाराची पाने आणली. त्याचे वर्णन करता करता वाक्यांतील अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना समजल्या.

बुद्धिमत्ता चाचणीचेही तेच. त्यातील कूट प्रश्नांची तयारी अगदी तिसरीपासूनच सुरू झाली होती. आपल्याकडील माहितीचा सूत्रांचा वापर, प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कशाप्रकारे करावा, याची सवयच अनिता विद्यार्थ्यांना लावत होत्या. यातून विद्यार्थ्यांना स्वत: विचार करून लिहिण्याची सवय लागली. त्यांना गणिते सरधोपट सूत्रांनी न सोडवता ती करून पाहण्याची सवय लागली. या सगळ्या मेहनतीचे फळ म्हणूनच चौथीला अनिता यांच्या वर्गातली तब्बल २३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. यावर आणखी हुरूप येऊन त्यांनी जोमाने  प्रयत्न सुरू ठेवले. पण गेल्याच वर्षी चौथीची शिष्यवृत्ती बंद होऊन ती पाचवीपासून सुरू करण्यात आली. अनिता यांच्याकडे पाचवीचा वर्ग नाही, त्यामुळे आता त्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेत नाहीत. पण त्यांनी करून घेतलेली अभ्यासाची तयारी विद्यार्थ्यांच्या चांगलीच उपयोगी येत आहे.

स्वाती केतकर- पंडित : swati.pandit@expressindia.com