16 February 2019

News Flash

करिअर कथा : छायाचित्रणाची ‘आनंदवारी’

वृत्तपत्र छायाचित्रकारितेचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी मुक्त छायाचित्रकार म्हणूनही काम केले.

आपल्या आवडीचे काम करता येण्यासाठी संदेश भंडारेंनी हातातली नोकरी सोडली आणि सर्जनशील छायाचित्रकार म्हणून स्वतंत्र ओळख मिळविली. गेल्या एकोणीस वर्षांच्या कारकीर्दीत त्यांची या विषयावर पाच पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. ही पुस्तके म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीतील महत्त्वाचा दस्तावेज ठरतील, अशीच आहेत. भंडारेंच्या करिअरवर एक प्रकाश.

पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातून संदेश भंडारे यांनी ‘जीडी आर्ट’ हा पाच वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. महाविद्यालयीन काळात ‘इंडिया टुडे’मधील रघुराय, रघुवीर सिंह या छायाचित्रकारांच्या छायाचित्रांनी ते प्रभावित झाले होते. छायाचित्रणाविषयी अधिक ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. वृत्तपत्र छायाचित्रकारितेचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी मुक्त छायाचित्रकार म्हणूनही काम केले. पुढे एका नामांकित वृत्तपत्रात ‘वृत्तपत्र छायाचित्रकार’ म्हणून अकरा वर्षे नोकरीही केली. यादरम्यान लोकांच्या जीवनाशी संबंधित विविध विषयांवर छायाचित्रे काढण्याची संधी त्यांना मिळाली. नोकरी करत असतानाच या ठरावीक साच्यातील छायाचित्रकारितेक्षा वेगळी छायाचित्रकारिता करावी, असा विचार त्यांच्या मनात आला. मनासारखे आणि अधिक आवडीचे काम करता यावे यासाठी त्यांनी नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.

सुरुवातीला वेगळ्या प्रकारचे काम मिळाले नाही. पण निराश न होता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. पुण्यातील ‘सेंटर फॉर लर्निग रिसोर्सेस’ या संस्थेचे जॉन कुरियन, झाकिया कुरियन यांच्याकडून संदेश यांना एक काम मिळाले. नुकतेच जन्मलेले अर्भक ते साडेतीन वर्षे वयाचे बालक यांचा होणारा शारीरिक आणि भावनिक विकास या विषयावर कुरियन दाम्पत्याने एक प्रकल्प/प्रदर्शन तयार केले होते आणि त्यासाठी काही छायाचित्रे काढण्याचे काम संदेश यांना मिळाले. संदेशने या संधीचे सोने केले. राजस्थान, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यातही या प्रदर्शनाचे आयोजन केले गेले. त्यानंतर महाराष्ट्रातील गावोगावी भरणाऱ्या ‘जत्रांमधील कुस्तीचे आखाडे’, ‘देवळी कोनाडे’, ‘ब्राह्मण’ आदी विषयांवर त्यांनी छायाचित्रे काढून त्याचे प्रदर्शन भरविले. ‘देवळी कोनाडे’ या प्रदर्शनाला इब्राहिम अल्काझी यांच्याकडूनही शाबासकीची थाप मिळाली.

या कामाची दखल घेऊन बंगलोर येथील एका संस्थेकडून संदेश यांना ‘महाराष्ट्रातील तमाशा’ या लोककलेवरील छायाचित्रे काढण्याचे मोठे काम मिळाले. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा प्रवास झाला आणि त्यातून तमाशाविषयक छायाचित्र प्रदर्शन आणि तमाशा या लोककलेविषयीच्या इतिहासाचे दस्तवेजीकरणही झाले. संदेश यांच्या या कामाचीही खूप वाहव्वा झाली. पुढे त्यांनी ‘महाराष्ट्रातील वारी’ हा विषय घेऊन छायाचित्रे काढली. महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी माहिती देणारे ‘असा हा महाराष्ट्र’ हे छायाचित्र प्रदर्शन यातूनच आकाराला आले. संदेश यांचे हे काम फक्त प्रदर्शनापुरतेच न राहता त्या छायाचित्रांना पुस्तकांचे कोंदणही मिळाले. ‘तमाशा-एक रांगडी गंमत’, ‘वारी-आनंदयात्रा’, ‘असा ही एक महाराष्ट्र’, ‘पुणेरी ब्राह्मण’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. परममित्र प्रकाशन, ग्रंथाली, मनोविकास प्रकाशन यांनी ही पुस्तके प्रकाशित केली असून सर्व स्तरातून त्याचे स्वागत झाले आहे. ही पुस्तके मराठीसह इंग्रजी, फ्रेंच कोकणी, कानडी भाषेत आली आहेत. मुंबई विद्यापीठाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विद्यापीठाने खास छायाचित्रांचे पुस्तक प्रकाशित केले त्याचे काम संदेशनीच केले. कोल्हापूर, पुणे आदी शहरांवरील छायाचित्रे असलेली पुस्तकेही त्यांच्या नावावर आहेत.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका महाश्वेता देवी यांच्या ‘महादू’ या कथेवर चित्रपट काढण्याची संकल्पना संदेश यांचीच. चित्रपटाची पटकथाही त्यांनीच लिहिली होती. परिमल चौधरी या चित्रपटाच्या निर्मात्या होत्या. संदेश यांचे आधीचे छायाचित्रणविषयक काम पाहून महाश्वेता देवी यांच्यासारख्या दिग्गज लेखिकेने कोणत्याही विशिष्ट मानधनाची अपेक्षा न ठेवता आपली कथा चित्रपटासाठी दिली.

गेल्या १८-१९ वर्षांत संदेश यांनी कायमच वेगळ्या प्रकारे छायाचित्रकारिता आणि त्यातून कलात्मक अभिव्यक्ती सादर केली आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागांत त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आली; पण लंडन, फ्रान्स, हॉलंड, पॅरिस येथेही त्यांच्या छायाचित्रांची प्रदर्शने झाली आहेत. ते म्हणतात, मला समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील, स्तरातील माणसांची छायाचित्रे काढण्याची संधी मिळाली. अनेक परंपरा, इतिहास, संस्कृतीचे दर्शन झाले. या सगळ्याची छायाचित्रे काढली गेली असल्याने त्याचे एकप्रकारचे दस्तावेजीकरणही झाले, याचा संदेश यांना खूप आनंद आहे.

आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट भ्रमणध्वनी आणि महागडे कॅमेरे असल्यामुळे छायाचित्रकाराची गरज नाही असे काही जणांना वाटते. पण शेवटी ही एक कला आहे. आपण कसे आहोत ते तटस्थपणे दाखविण्याचे काम छायाचित्रकार करत असतो. एखादी घटना, प्रसंग किंवा क्षण गोठविण्याची किमया छायाचित्रण कलेत आणि छायाचित्रकाराकडे असते. छायाचित्रकाराकडील कला आणि सर्जनशीलता हे जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत छायाचित्रण कलेला आणि छायाचित्रकारालाही मरण नाही, असे संदेश यांचे म्हणणे आहे. त्याचसोबत ज्यांना उत्कृष्ट छायाचित्रकार व्हायचे आहे त्यांनी फक्त पैशाच्या मागे लागू नये तर सर्जनशीलतेची कास धरावी म्हणजे यश आणि पैसा आपोआपच आपल्याकडे चालत येतील, असाही सल्ला ते देतात.

shekhar.joshi@expressindia.com

First Published on April 13, 2018 2:19 am

Web Title: sandesh bhandare photographer