जगभरातील ज्या निवडक  संस्था भावी अंतराळवीर घडवण्याचे कार्य  करतात त्यांपकी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University). या विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६ मधील विविध अभ्यासक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तींसाठी संबंधित विषयातील अर्जदारांकडून ३० नोव्हेंबर २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीबद्दल..
अंतराळ क्षेत्रातील विकासाच्या साहाय्याने संपूर्ण जगाचे हित साधावे आणि त्यातून मानवजातीचे भविष्य समृद्ध व्हावे या हेतूने आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठ (International Space University) या संस्थेची स्थापना १९८७ साली पीटर डायमंड्स, टॉड हॉले व रॉबर्ट रिचर्ड्स या तीन अंतराळवीरांनी एकत्र येऊन केली.  फ्रान्समधील अल्सेस प्रांताची राजधानी असलेल्या स्ट्रॉसबर्ग शहरात स्थित असे हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय, आंतरसांस्कृतिक व आंतरविद्याशाखीय अशा तीन तत्त्वांवर चालते. या विद्यापीठामध्ये अंतराळ अभ्यासक्रमाशी संबंधित अनेक अभ्यासक्रम सुरू आहेत. मात्र,  प्रत्यक्ष अंतराळवीरांचा सहभाग असलेले  एकूण तीन अभ्यासक्रम या विद्यापीठात उपलब्ध आहेत आणि या तिन्ही अभ्यासक्रमांना विद्यापीठातर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. हे तीन अभ्यासक्रम म्हणजे मास्टर ऑफ स्पेस स्टडीज् (MSS), स्पेस स्टडीज् प्रोग्रॅम (SSP) आणि सदर्न हेमिस्फियर प्रोग्रॅम ( SH-SSP). या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकांना विद्यापीठामध्ये निवड झालेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो. त्यादरम्यान विद्यापीठाकडून या शिष्यवृत्तीधारकाला संबंधित अभ्यासक्रमाच्या कालावधीकरता केवळ शिकवणी शुल्क वार्षकि वेतनाच्या स्वरूपात दिले जाते. या शिकवणी शुल्कामध्येच त्याच्या निवासाच्या व भोजनाच्या खर्चाचा समावेश आहे. शिष्यवृत्तीधारकाच्या इतर खर्चाचे नियोजन त्याला स्वत:ला करावे लागेल. २०१६ च्या शैक्षणिक सत्राच्या प्रवेशाकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून या वेळी  अर्ज मागवण्यात आले आहेत.
या वेळच्या शैक्षणिक प्रवेशासाठी या तिन्ही अभ्यासक्रमांना अर्ज करण्याची अंतिम मुदत वेगवेगळी आहे.

आवश्यक अर्हता  
ही शिष्यवृत्ती विकसनशील देशांमधील सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे तसेच त्यांच्याकडे कोणत्याही विषयाची पदवी असावी. पदवीचा कालावधी किमान तीन वर्षांचा असावा. अर्जदाराकडे अंतराळ क्षेत्रातील शैक्षणिक, संशोधन किंवा इतर कोणताही अनुभव असल्यास, त्याला प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराने त्याच्या संशोधनाचे किंवा अनुभवाचे प्रशस्तीपत्र जोडावे. अर्जदाराची पदवी स्तरावरील शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. भारतातील अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या कोणत्याही एका परीक्षेत उत्तीर्ण असावे.

अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून खाली नमूद केलेल्या वेबसाइटवर जमा करावा. विद्यापीठाने संपूर्ण अर्जप्रक्रिया नि:शुल्क केलेली आहे. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल सविस्तर माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., स्वत:चा सी.व्ही., त्याने पदवी अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध, त्याला पदव्युत्तर पदवीकरता करायच्या असलेल्या संशोधनाची थोडक्यात ओळख करून देणारा एक अहवाल (Research Proposal), त्याने शोधनिबंधात प्रकाशित केलेले त्याचे संशोधन, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती आणि त्याचा वर्षभराचा वित्त अहवाल इत्यादी गोष्टी वेबसाइटवर दिलेल्या विद्यापीठ प्रवेश कार्यालयाच्या ई मेलवर जमा कराव्यात तसेच अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे त्या प्राध्यापकांना पीडीएफ स्वरूपात स्वतंत्रपणे प्रवेश कार्यालयाला पाठवावयास सांगावी.

निवड प्रक्रिया  
अर्जदाराचा अर्ज व त्याबरोबर संशोधनातील त्याची गुणवत्ता व त्याची शैक्षणिक पाश्र्वभूमी लक्षात घेऊन संबंधित विषयांतील तज्ज्ञ त्याच्या अर्जाची छाननी करतील.
जे अर्जदार शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील, त्यांना पाच ते सहा आठवडय़ांत त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.

अंतिम मुदत
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०१५ आहे.

महत्त्वाचा दुवा
http://www.isunet.edu
itsprathamesh@gmail.com