स्वित्झर्लंडमधील इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट’ (IMD) हे व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रम देणारे युरोप आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक अग्रगण्य बी स्कूल आहे. आयएमडीच्या व्यवस्थापन विभागाकडून दरवर्षी हुशार व उत्तम शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना एमबीए व संलग्न इतर पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विविध  शिष्यवृत्ती दिल्या जातात. दरवर्षीप्रमाणे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठीही आंतरराष्ट्रीय पदवीधर विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तींसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीविषयी

स्वित्झर्लंडमधील ‘इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट’ म्हणजेच आयएमडी हे एक नामांकित बी स्कूल आहे. आयएमडीची स्थापना १९९० मध्ये झाली. एमबीए व संलग्न इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध असलेले हे स्कूल व्यवस्थापन क्षेत्रामधील आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील तेवढेच नावाजलेले आहे. २०१२ पासून ते २०१७पर्यंत दरवर्षी ‘फायनान्शियल टाइम्स’ने आयएमडीच्या व्यवस्थापनातील मुक्त अभ्यासक्रमांना जागतिक दर्जाचे संबोधून पहिला क्रमांक बहाल केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये जागतिक पातळीवरील व्यावसायिक स्पर्धेचे आव्हान लीलया पेलण्याची क्षमता विकसित व्हावी, व्यवसायातील मूलभूत तंत्रांबाबतीत एक प्रकारची सजगता तयार व्हावी, परिणामी या क्षेत्रातील जागतिक नेतृत्व आकारास यावे; आदी हेतू लक्षात घेऊन संस्थेकडून हा शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांत एमबीए व संलग्न इतर काही अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. एमबीए अभ्यासक्रम आणि शिष्यवृत्ती दोन्हींचा कालावधी एक वर्षांचा असेल. आयएमडी शिष्यवृत्ती कार्यक्रम हा एकूण सात ते आठ उपविभागांमध्ये विभागला गेलेला आहे. वेगवेगळ्या स्तरांतील घटकांना याचा लाभ व्हावा, या हेतूने यामध्ये मग आशियाई अर्जदार, विकसनशील देशातील अर्जदार, महिला अर्जदार असे घटक डोळ्यासमोर ठेवले गेले आहेत. २०१८-१९  या शैक्षणिक वर्षांसाठी दिल्या जाणाऱ्या एकूण शिष्यवृत्तींची संख्या सोळा एवढी आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत अर्जदारास कमाल  ५०,००० स्वीस फ्रँक शिक्षण शुल्क व त्यासहित इतर सुविधा दिल्या जाणार आहेत.

आवश्यक अर्हता

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान पदवीधर असावा. अर्जदाराचे वय साधारणपणे २५ ते ३५ च्या दरम्यान असावे. त्याच्याकडे किमान तीन वर्षांचा पूर्ण वेळ कार्यानुभव असावा. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराची पदवीपर्यंतची शैक्षणिक पाश्र्वभूमी चांगली असावी. त्याचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. अर्जदाराने जीमॅट ही परीक्षा अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय भारतीय विद्यार्थ्यांनी इंग्रजीच्या टोफेल किंवा आयईएलटीएस या दोन्ही परीक्षांपैकी एक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदाराने तो अर्ज करू इच्छित असलेल्या अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहिती आयएमडीच्या संकेतस्थळावर जाऊन मिळवावी.

अर्ज प्रक्रिया

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह mbafinance@imd.org या ई-मेलवर पाठवावा. अर्जासह अर्जदाराने त्याचे एसओपी, सीव्ही, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, जीमॅट व आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी आवश्यक परीक्षांचे गुण, कार्यानुभवाचे प्रशस्तीपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात. शिफारसपत्रांसाठी मात्र अर्जदाराने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन शिक्षक वा प्राध्यापकांचे ई-मेल अर्जामध्ये नमूद करावेत. विद्यापीठ स्वतंत्रपणे संबंधित प्राध्यापकास संपर्क करून शिफारसपत्र देण्यासाठी विनंती करेल. प्रत्येक शिष्यवृत्तीनुसार अर्जदाराला निबंधांचे विषय दिलेले आहेत. त्या विषयावर निबंध लिहून अर्जदाराला तो अर्जासह जमा करावयाचा आहे.

निवड प्रक्रिया

अर्जदाराची निबंधांच्या विषयासह त्याच्या अर्जातील एकूण गुणवत्ता लक्षात घेऊन व निवड समितीकडून अर्जाची छाननी झाल्यानंतर त्याची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. अर्जदाराने ही मुलाखत आयएमडीमध्ये जाऊन द्यायची आहे. मुलाखतीनंतर दोन आठवडय़ांत सर्व अर्जदारांना संस्थेकडून त्यांच्या निकालाबाबत कळवण्यात येईल.

उपयुक्त संकेतस्थळ 

http://www.imd.org/

अंतिम मुदत

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०१७  आहे.

itsprathamesh@gmail.com