निरनिराळ्या विद्याशाखांतील उच्च शिक्षण, संशोधन अशा हेतूंच्या पूर्ततेसाठी गुणवंत विद्यर्थ्यांना विशिष्ट कालावधीसाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीस ‘विद्यावेतन’ (फेलोशिप) असे म्हणतात. शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) हा गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरूपात दिला जाणारा पुरस्कार (अ‍ॅवॉर्ड) आहे. गुणवत्तेची स्पष्ट अपेक्षा असल्यामुळे ‘विद्यावेतन’ आणि ‘शिष्यवृत्ती’ हे दोन्ही शब्द अनेकदा एकमेकांच्या जागी वापरले जातात; ‘अभ्यासवृत्ती’, ‘अधिछात्रवृत्ती’ अशा पर्यायी संज्ञाही या संदर्भात वापरल्या जातात; परंतु सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल, की पदवीधरांना अथवा पदव्युत्तर अध्ययन करू इच्छिणाऱ्यांना दिली जातात ती विद्यावेतने; आणि शालेय वा महाविद्यालयीन पदवीपूर्व शिक्षण घेत असलेल्यांना देण्यात येतात त्या शिष्यवृत्त्या आहेत.

  • विद्यावेतने आणि शिष्यवृत्या या शासन, शैक्षणिक संस्था (शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे इ.), प्रतिष्ठाने व तत्सम काम करणाऱ्या संघटना, धर्मादाय संस्था इत्यादींकडून दिल्या जातात. काही विशिष्ट व्यक्तींच्या नावानेही विद्यावेतने व शिष्यवृत्त्या दिल्या जातात.
  • ज्यांना सांकेतिक व औपचारिक अर्थाने ‘विद्यार्थी’ म्हणता येणार नाही, त्यांनाही काही विशिष्ट विषयाच्या संशोधनासाठी आर्थिक साहाय्य देण्यात येते. उदा. विख्यात मराठी साहित्यिक विजय तेंडुलकर यांना भारतीय समाजातील हिंसाचार या विषयावरील संशोधनार्थ जवाहरलाल नेहरू अभ्यासवृत्ती (फेलोशिप) देण्यात आली होती ( १९७४-७५). त्याचप्रमाणे नामवंत मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटकाकार च्िंा. त्र्यं. खानोलकर यांना त्यांचे लेखनसंकल्प पूर्ण करण्यासाठी ‘रायटर्स सेंटर’ या संस्थेतर्फे सहा महिन्यांची अभ्यासवृत्ती (स्टडीग्रांट) देण्यात आली होती (१९६४).
  • भारत सरकारतर्फे गुणवंत विद्यार्थी व त्यांनी निवडलेल्या विविध विद्याशाखांत अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात येतात. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे विद्यावेतने दिली जातात, ती दरमहाही दिली जातात. ‘राष्ट्रीय प्रज्ञा शोध’ परीक्षेतून जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात, त्यांच्या पदवी व पदव्युतून जे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात, त्यांच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची आर्थिक जबाबदारी केंद्र शासनाकडून घेतली जाते. शासकीय विद्यानिकेतनांतून उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना, त्यांच्या शालान्त परीक्षेनंतरच्या शिक्षणाच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र शासनातर्फे शिष्यवृत्त्या दिल्या जातात.