16 December 2017

News Flash

भावनिक कणखरपणा हवा

यश-अपयश येत राहते. त्यात काही प्रासंगिक भाग असतात.

किन्नरी जाधव | Updated: June 17, 2017 1:58 AM

अभ्यासाबरोबरच ओघाने येणारा कंटाळा आणि ताण यावर मात कशी करायची हा विद्यार्थ्यांसाठी मोठा प्रश्न असतो. मानसोपचारतज्ज्ञ  डॉ. आनंद नाडकर्णी यांनी याचे सोप्या शब्दांत  उत्तर दिले.

करिअरमध्ये भावनिक कणखरपणा हवा. हे खरेच! पण म्हणजे नक्की काय? तर करिअरदरम्यान जे सर्व प्रासंगिक ताणतणाव परिस्थितीकडून येतील त्याला तोंड देत असताना आपल्या भावना ओळखणे, समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखणे आणि त्याचे योग्य नियोजन करणे म्हणजेच, भावनिक कणखरपणा. वास्तवाला तोंड देण्यासाठी भावनिक कणखरपणा आणि भावनिक ऊब महत्त्वाची ठरते.

यश-अपयश येत राहते. त्यात काही प्रासंगिक भाग असतात. आपण त्यात नकारात्मक भर घालायची की सकारात्मक विचार ठेवायचा हा प्रश्न असतो.  तणाव येणार नाही असे एकही करिअर नाही. आवश्यक तणाव आणि अनावश्यक तणाव असे दोन प्रकार तणावाचे येतात. आवश्यक तणावाअंतर्गत नियंत्रण करू शकतो असे घटक आणि नियंत्रित करता येणार नाहीत, असे घटक कोणते याचे ज्ञान आणि भान असणे गरजेचे आहे. नियंत्रित होऊ न शकणाऱ्या घटकांचा विचार केल्यावर आपले ध्येय तुकडय़ांमध्ये विभाजित करायला हवे. भविष्यातील एखादे ध्येय गाठण्यासाठी आजच्या दिवसाच्या ध्येयाचे नियोजन करणे महत्त्वाचे असते.  ध्येयासाठीच्या प्रयत्नांना कंटाळवाणे किंवा साचेबद्धही बनवू नका. तर वैविध्यपूर्ण बनवा.   सराव हा कायम डोळस हवा.  प्रयत्नांवर निष्ठा असल्याशिवाय परिणाम हाती येत नाही. अशा वेळी आवश्यक ताण गरजेचा असतो. कारण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी साजेसे पर्याय काढण्याची क्षमता आवश्यक ताणामध्ये असते.

जेव्हा आपण समस्येवर लक्ष केंद्रित करत असतो तेव्हा आपण आवश्यक तणावात असतो. मात्र समस्येवर लक्ष केंद्रित न करता एखाद्या गोष्टीला जबाबदार ठरवणे हे अनावश्यक तणावाकडे घेऊन जाणारे आहे. अशा वेळी प्रयत्नांसाठी लागणारी ऊर्जा कमी होत असते. कृतीवर लक्ष केंद्रित करणे हे आवश्यक तणावात येते, तर व्यक्तीवर किंवा स्वत:वर लक्ष केंद्रित करणे हे अनावश्यक तणावाअंतर्गत येते. चांगली कृती केली तर तेवढय़ापुरते समाधान असावे. आपले लक्ष संबंधित वेळेच्या कृतीवर असावे. स्वत: किती उत्कृष्ट किंवा निकृष्ट असे विचार नसावेत. आव्हानांना तोंड द्यायचे असेल तर बुद्धिमत्तेसोबतच भावनिक कणखरपणा अतिशय महत्त्वाचा ठरतो. यश आणि अपयश केवळ त्या वेळेपुरते असतात. मात्र प्रयत्न कायमचे असतात. प्रयत्न करताना जर तुम्हाला आनंद मिळाला तर मग  यश-अपयश या लाटा आहेत, हे कळायला वेळ लागत नाही.

बरेचदा आपण स्वत:च आपल्या गुणांचे किंवा दोषांचे मूल्य, अवमूल्यन करत असतो. कोणत्याही परिस्थितीत यश आणि अपयशावरून ‘स्व’ची किंमत करणार नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवे. तसेच ही बाब पालकांनीही लक्षात घ्यावी. तरच विद्यार्थी आणि पालक मिळून अपयशाचा सामना करू शकतील.  पालक आणि विद्यार्थ्यांची टीम असायला हवा. यात कोणी कोणते काम करायचे हे ठरवायला हवे. उदा. सोपी गोष्ट अशी की करिअरचा पतंग हा विद्यार्थ्यांनी उडवायचा आहे. पालकांनी मागे फिरकी धरायची आहे. जेव्हा पालक स्वत:च पतंग हाती घेतात तेव्हा अडचण होते.

एखाद्या करिअरमध्ये केवळ आवड महत्त्वाची नसून त्या क्षेत्रात जाण्याची क्षमता आहे की, नाही हे समजणे महत्त्वाचे आहे. आवड आणि क्षमता यांच्या बळावर कृतीचा पूल आतापर्यंत बांधला गेला आहे का हे तपासून करिअरची निवड व्हावी. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आणि बुद्धिमत्ता महत्त्वाची असते.

एखादे ध्येय माझे आहे याची खात्री पटल्याशिवाय एकाग्रता येत नाही. आवडीच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांमध्ये अडचणी येणार हे ध्यानात घ्यायला हवे. एखादी नावडणारी गोष्ट उद्दिष्टांपर्यंत पोहोचवणारी असल्यास त्या नावडणाऱ्या गोष्टीचा स्वीकार करायला हवा. नावडणारी गोष्ट सहन करण्याची क्षमता म्हणजे एकाग्रता आहे. नावडणारी गोष्ट सहन करण्याची क्षमता वाढवायला हवी.

एकाग्रता आणि अनेकाग्रता याचा समतोल साधता आला तर समरसता साध्य होते. अभ्यास करतानासुद्धा मजा यायला लागते तेव्हा समरसता येते. निर्णायक क्षणी चूक झाल्यास तिचे परिणाम भोगण्याची तयारी असायला हवी. त्याबाबत मनात कटुता ठेवू नये. ही कटुता विसरून आपण अपयशाला सामोरे जाऊ शकतो.

First Published on June 17, 2017 1:58 am

Web Title: studies emotional psychiatrist dr anand nadkarni