26 March 2019

News Flash

विद्यापीठ विश्व : मराठवाडय़ातील ‘ज्ञानतीर्थ’

१७ सप्टेंबर, १९९४ रोजी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

ओळख

दक्षिण मराठवाडय़ामधील उच्च शिक्षणाच्या सोयी-सुविधांचा विकास आणि या भागातील उच्च शिक्षणविषयक नेमक्या गरजांची पूर्तता करण्यासाठीच १७ सप्टेंबर, १९९४ रोजी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. हैदराबाद मुक्तिसंग्रामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने विद्यापीठाला वेगळी ओळख देण्यात आली. या माध्यमातून त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचाही गौरव करण्यात आला आहे. सध्या मराठवाडय़ाच्या दक्षिण भागामधील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्य़ांमध्ये या विद्यापीठाचे कार्य चालते. या विद्यापीठामार्फत नेहमीच्या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त नव्या आणि वेगळ्या अभ्यासक्रमांवर भर दिला जात आहे. आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय दृष्टिकोनाचा विकास होण्यासाठी म्हणून स्कूल संकल्पनेच्या आधाराने साधर्म्य असलेल्या विषयांना एकाच छताखाली शैक्षणिक सुविधा मिळवून देण्याचे प्रयत्न या विद्यापीठातून केले जातात. या धोरणाला पूरक ठरेल अशा अभ्यासक्रमांची आखणी आणि पुनर्रचनाही विद्यापीठाने केली आहे. अध्यापन आणि मूल्यमापनाच्या अभिनव पद्धतींवर भर देत विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य सरू आहे. याच कार्याची दखल घेत नॅकने पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेत या विद्यापीठाला ‘ए ग्रेड’ दिली आहे.

संकुले आणि सुविधा

नांदेड-लातूर रस्त्यावरील विष्णुपुरी भागामध्ये जवळपास साडेपाचशे एकर परिसरात विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक संकुल वसलेले आहे. त्यातील अद्ययावत पायाभूत सुविधा असलेल्या इमारतींमधून विद्यापीठाचे प्रशासकीय आणि शैक्षणिक कामकाज चालते. मुख्य संकुलाच्या जोडीने विद्यापीठाने परभणी आणि लातूर येथे उपकेंद्रे उभारली आहेत. तसेच, हिंगोली येथे न्यू मॉडेल डिग्री कॉलेजच्या माध्यमातून पदवी पातळीवरील व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जातो आहे. परभणी येथील उपकेंद्रावर विद्यापीठाने फॉरेन लँग्वेज सेंटरच्या माध्यमातून फ्रेंच आणि स्पॅनिश भाषेतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. लातूर येथील उपकेंद्रावर स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस, स्कूल ऑफ टेक्नोलॉजी, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस आणि स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचरचे अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या मुख्य शैक्षणिक संकुलामधील ग्रंथालयामार्फत (नॉलेज रिसोर्स सेंटर) विद्यार्थ्यांसाठी चोवीस तास चालणारा अभ्यास आणि वाचन कक्ष, वृत्तपत्र दालन, इंटरनेट लॅब, ऑनलाइन लायब्ररी आदी सुविधा पुरविल्या जातात. किनवट येथे विद्यापीठ उभारत असलेल्या हर्बल रिसर्च सेंटरच्या माध्यमातून या परिसरातील आदिवासी समाजाकडे असणाऱ्या औषधी वनस्पतींच्या पारंपरिक ज्ञानाला अधिकाधिक समाजापर्यंत पोहोचविण्यासाठीचे संशोधन करण्याचे प्रयत्नही आता विद्यापीठाने सुरू केले आहेत. मुख्य संकुलामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठीची स्वतंत्र वसतिगृहे आहेत. तसेच दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रम पुरवण्यासाठीही विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम

पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधन, पदविका आणि प्रमाणपत्र अशा नानाविध टप्प्यांवर वेगवेगळे अभ्यासक्रम विद्यापीठात चालतात. तसेच विद्यापीठाच्या स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसमध्ये केमिस्ट्रीच्या सहा विषयांमधील एम. एस्सी. अभ्यासक्रमांसह एम. फिल. आणि पीएच.डी.चे संशोधन चालते. स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये नेहमीच्या अभ्यासक्रमांच्या जोडीने चालणारा एम. बी. ए. इंटिग्रेटेड हा बारावीनंतरचा अभ्यासक्रम वैशिष्टय़पूर्ण ठरतो. स्कूल ऑफ फाइन अँड परफॉर्मिग आर्ट्समध्ये थिएटर आर्ट अँड फिल्म्समधील एम. ए., तसेच बारावीनंतरचा डिप्लोमा इन डिजिटल आर्ट्स अँड ग्राफिक्स हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. स्कूल ऑफ लँग्वेज, लिटरेचर अँड कल्चर स्टडीजमध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेतील एम. ए. अभ्यासक्रमाच्या जोडीने स्पॅनिश आणि फ्रेंच भाषेतील प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमही चालतात. स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसमध्ये नेहमीच्या एम. एस्सी.सोबतच बारावीनंतरचा इंटिग्रेटेड एम. एस्सी. हा अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. स्कूल ऑफ मीडिया स्टडीजमध्ये मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, इलेक्ट्रॉनिक मीडिया स्टडीज आणि इंटिग्रेटेड कोर्स इन मास मीडिया या विषयांसाठी एम. ए.चे अभ्यासक्रम चालतात. त्या जोडीने डिजिटल फिल्म मेकिंग, क्रिएटिव्ह रायटिंग फॉर इलेक्ट्रॉनिक मीडिया, फिल्म अ‍ॅप्रिसिएशन, रेडिओ प्रोग्राम प्रोडक्शन या विषयांतील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही चालविले जातात. स्कूल ऑफ फार्मसीमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसोबत चार वर्षे कालावधीचा बी. फार्म. हा अभ्यासक्रमही चालतो. स्कूल ऑफ सोशल सायन्सेसमध्ये एमएसडब्ल्यू, अप्लाइड इकोनॉमिक्स आणि ह्य़ुमन राइट्समधील एम. ए. चे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. स्कूल ऑफ अर्थ सायन्सेसमध्ये इन्व्हायर्न्मेंटल सायन्स, भूगोल, जिओफिजिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसोबतच जिओइन्फर्मेटिक्स विषयातील पदव्युत्तर पदविका, इंडस्ट्रियल सेफ्टी विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहे. लातूर उपकेंद्रामधील स्कूल ऑफ टेक्नोलॉजीमध्ये बी.एस्सी. कम्प्युटर सायन्स इंटिग्रेटेड, एम. एस्सी. कम्प्युटर सायन्स, एम. एस्सी बायोइन्फर्मेटिक्स हे अभ्यासक्रम चालतात. या सर्वाच्या जोडीला हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये पदवी पातळीवरील व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमही आहेतच.

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांची ही जंत्री पाहता, ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे यांनी लिहिलेल्या विद्यापीठ गीतामधील ‘ज्ञानतीर्थ’ हा शब्द किती योग्य आहे, हे जाणवते!

योगेश बोराटे : borateys@gmail.com

First Published on March 6, 2018 1:53 am

Web Title: swami ramanand teerth marathwada university