16 October 2019

News Flash

‘प्रयोग’ शाळा : हसतखेळत अभ्यास

नयना पगार यांनी डीएड करून २००५ साली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली.

स्वाती केतकर- पंडित swati.pandit@expressindia.com

गणिताच्या आकडेमोडी असूदेत किंवा भाषेतील कठीण व्याकरण हे सगळे काही नयना पगार या गुणी शिक्षिकेच्या वर्गात सोपे वाटते. कारण विद्यार्थ्यांसोबत अभ्यास करण्यासाठी असतात, मोज्याच्या बाहुल्या, रंगीबेरंगी फळे, तराजू आणि संगीताची साथ. हसतखेळत शिक्षणाचे खरेखुरे उदाहरण देणाऱ्या नयना पगार यांच्या शैक्षणिक ‘प्रयोगांची’ ही ओळख..

नयना पगार यांनी डीएड करून २००५ साली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. सोनज या शाळेमध्ये ८ वर्षे काढल्यानंतर २०१३ साली त्यांची बदली झाली, मालेगाव तालुक्यातील मांजरा गावच्या प्राथमिक शाळेमध्ये.

मांजरा हे गाव तालुक्याच्या सीमेवरचे गाव. साधारण दीड हजार लोकवस्तीच्या या गावात पाण्याचे प्रमाण अगदीच कमी. कोरडवाहू शेतीवर जगणारी काही शेतकरी कुटुंबे आणि शेतमजूर आणि जवळपास असलेली भिल्ल वस्ती. जवळपास दुष्काळी भागच. पण अन्नधान्यासोबत इथे शिक्षणाचा आणि त्याविषयी आपुलकीचा दुष्काळच होता. यामुळेच अर्थात विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेली. पण नयना डगमगल्या नाहीत तर त्यांनी ही परिस्थिती एक आव्हान म्हणून स्वीकारली. नयना यांना पहिला वर्ग मिळाला तो सातवीचा. पहिली-दुसरीनंतर नीट शिक्षकच न मिळाल्याने या वर्गात अनेकांना साधी अक्षरओळखही धड नव्हती. मग पाठांऐवजी अगदी मुळाक्षरांपासून सुरुवात झाली ती सहामाहीपर्यंत सुलभ वाचनापर्यंत पोहोचली. हजेरीपट कायम अर्धाच भरलेला असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी ‘शाळा आपल्या दारी’ हा उपक्रम नयनांनी राबवला. वस्तीत घंटा वाजवत भल्या सकाळी वस्तीत आलेल्या बाईंची तळमळ बघून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये बदल होऊ लागला. विद्यार्थी शाळेत रमण्यासाठी आठवडय़ाला नवे उपक्रम, स्नेहसंमेलन, सहल अशा सगळ्याची सुरुवात झाली.. आणि हळूहळू विद्यार्थी शाळेकडे वळू लागले.

ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा आणि त्याविषयीच्या प्रशिक्षणांचा नयना यांना खूपच फायदा झाला. त्यांचा स्वत:चा प्रत्येक विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. गणित आणि भाषेच्या अभ्यासासाठी नयना पगार यांनी खूप साहित्य तयार केले. शिवाय काही नवनवे खेळही विद्यार्थ्यांसाठी शोधून काढले. उदा. संगीतखुर्चीचा खेळ. हा खेळ अगदी सोप्पा शिवाय संगीताची जोड असल्याने सगळ्यांना आवडला. मग गणितासारख्या अवघड विषयासाठी नयनातरईनी या खेळाची निवड केली. मुलांना नंबर देऊन संगीत खुर्ची खेळायला लावायची. सगळे जण खुर्च्यावर बसल्यावर त्यातून कोणता आकडा तयार होतो, तो बाकीच्यांनी ओळखायचा. या खेळातून संख्याओळख अगदी हसतखेळत होते, हा नयनाताईंचा अनुभव.

असाच आणखी एक खेळ म्हणजे, टिंब आणि गोलाचा. कागदावर वेगवेगळ्या रंगातील टिंब काढलेली असायची. प्रत्येक रंगाला एकक, दशक, शतक अशी ओळख दिली जायची. हातातला गोल मुलांना सापशिडीतल्या फाशाप्रमाणे टाकायचा. तो जिथे पडेल त्या भागातले, दशक, एकक, शतक यांची बेरीज करून संख्या तयार करायची. या खेळातही विद्यार्थी अगदी रंगून जात. याच खेळात पुढे, गणिती क्रिया यायच्या, चढता-उतरता क्रम यायचा. शेवटी गोल आणि टिंब नावापुरती उरत आणि त्या खेळाच्या माध्यमातून गणिती क्रियांमध्ये विद्यार्थी केव्हा पारंगत होत, हे त्यांचे त्यांनाही कळत नसे.

इंग्रजीसाठीही नयनांनी असे उपक्रम घेतले. मुळात या भाषेची दहशत त्यांनी मुलांच्या मनातून दूर करण्याचा प्रयत्न केला. याचेच फलित म्हणून त्यांच्या दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी गणिताच्या मंथन परीक्षेचा पेपर चक्क इंग्रजीतून सोडवला. असे करणारा तालुक्यातील त्यांचा एकमेव वर्ग होता. या परीक्षेत त्यांच्या वर्गातली मुलगी राज्यात ३३वी तर जिल्ह्य़ात २३वी आणि तालुक्यात प्रथम आली होती.

अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून वर्गात विद्यार्थ्यांकडून कविता करवून घ्यायच्या होत्या. प्रत्येकाला कविता करता येणार नाही, हे सत्य आहेच पण नयनांनी हार मानली नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांला उत्तम कविता करता आली नाही तरी चालेल पण अभिव्यक्ती करणे आले पाहिजे यासाठी त्यांनी जमेल तेवढे प्रयत्न केले. अगदी पहिलीतल्या मुलांनाही अवांतर वाचनासाठी छोटय़ा बडबडगीतांची, गाण्यांची पुस्तके आणली. या आवडीचा उपयोग करून घेत, शब्दांचे यमक या गोष्टीशी विद्यार्थ्यांची ओळख करून दिली. कवितेला चाल कशी मिळते, लयबद्धता कशी मिळते, हे सोदाहरण पटवून दिले. याचाच परिपाक म्हणून कविता करणे, हा अभ्यासाचा भाग न राहता मुलांसाठी आवडीची गोष्ट झाली. या कवितांचे शाळेतल्या शाळेत संमेलनही भरवले. गावकऱ्यांनी, पालकांनी आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी या नव्या कवींचे छान स्वागत केले. त्यातील भागिरथी सोनावणे आणि साक्षी निकम या तिसरीतल्या मुलींचा चक्क ‘गुंजन’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला.

शाळेमध्ये वर्गात भिंतीवर मध्यभागी काळे फळे होते, एकदा नयना यांच्या डोक्यात कल्पना आली की या फळ्यांना आपण रंगीबेरंगी करायला हवे, त्यामुळे त्यांनी चक्क एकदा सुटीच्या दिवशी, रंग, कार्डबोर्ड कागद घेऊन वर्गात प्रवेश केला आणि मुलांच्या मदतीने संपूर्ण वर्ग रंगवून काढला. मग काळ्या फळ्यांच्या जागी कार्डबोर्ड आले, त्यावर प्लास्टिक लावून त्यावर निरनिराळ्या गोष्टी, तक्ते, मुलांनी काढलेली चित्रे या गोष्टी सजल्या. दुसऱ्या दिवशी नयनाच्या वर्गाचे हे सरप्राईज साऱ्या शाळेलाच चकित करून गेले.

बाहुली म्हणजे लहानग्यांची अगदी आवडती त्यामुळे नयनाताईंनी मोज्यांपासून बाहुली तयार केली आणि काही काही संकल्पना तर या बाहुलीशी होणाऱ्या संवादातून शिकवल्या. या बाहुलीचा शो विद्यार्थ्यांना इतका आवडायचा की त्यांनी तिचे नाव ठेवले होते, तिच्यासाठी ते संवाद लिहीत असत, तिला प्रश्न विचारत, ती काय उत्तरे देईल याची कल्पना करत. एकूणच बाहुलीच्या निमित्ताने कल्पनाविस्ताराचा एक पाठ विद्यार्थी नकळत शिकले होते.

हळूहळू विद्यार्थ्यांसोबत गावकऱ्यांच्या मनातही नयनाताईंनी आदराचे स्थान मिळवले. नुकतीच काही महिन्यांपूर्वी त्यांची मालेगाव जिल्ह्य़ातल्याच साकुरी नि. या गावात बदली झाली. मांजरे शाळेतील निरोपसमारंभात विद्यार्थ्यांनी आपल्या पगारबाईंना खूप पत्रे लिहिली. त्यातल्या ऋतुजा नावाच्या एका मुलीने त्यांना दिलेला किताब मात्र सर्वात मोठा होता, तो म्हणजे शाळेतली आई. नयना यांच्या शैक्षणिक कार्यासोबत त्यांच्या तळमळीला या विद्यार्थिनीने केलेला सलामच होता तो!

First Published on January 4, 2019 2:38 am

Web Title: teacher naina pagar easy way of teaching maths