17 January 2019

News Flash

‘प्रयोग’  शाळा : सुरांनी आत्मविश्वास दिला!

आपल्या शिक्षणव्यवस्थेने कलाशिक्षणाला काहीसे दुय्यम स्थान दिलेले आहे.

शिक्षक सोमनाथ वाळके

फक्त अभ्यासच नव्हे तर एखादी कलाही आपल्याला शाळेमध्ये प्रतिष्ठा मिळवून देऊ शकते, हे पारगाव जोगेश्वरीच्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना आता लक्षात आले आहे. त्यांना ही शिकवण दिली आहे, सोमनाथ वाळके या त्यांच्या शिक्षकानी. त्यांच्या शाळेत महाराष्ट्रातला पहिला ऑडिओ-व्हिडीओ स्टुडिओ आहेच, पण त्याहीपेक्षा इथल्या विद्यार्थ्यांकडे आलेला आत्मविश्वास जास्त उल्लेखनीय आहे.

आपल्या शिक्षणव्यवस्थेने कलाशिक्षणाला काहीसे दुय्यम स्थान दिलेले आहे. नृत्य, गायन यांसारख्या गोष्टी फक्त छंद होऊ शकतात. त्यात करिअर नाही, असा आजही अनेकांचा समज असतो. पण कलेचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये वेगळी जाणीव, आत्मविश्वास निर्माण करू शकते, या मुद्दय़ाकडे फार कमी जणांचे लक्ष जाते. सोमनाथ वाळके हे असेच एक वेगळा विचार करू पाहणारे शिक्षक.

गेली १३ वर्ष ते शिक्षक म्हणून काम करत आहेत. पहिल्यांदा औरंगाबादच्या पैठणमधील चिंचाळा गावातील जिल्हा परिषदेची शाळा आणि मग आष्टी तालुक्यातील जामगाव इथल्या शाळांमध्ये त्यांनी अनेक नवनवे शैक्षणिक उपक्रम घेतले होते. जुलै २०१४मध्ये त्यांची बदली झाली, पारगाव जोगेश्वरीच्या जिल्हा परिषद शाळेत. या गावाची लोकसंख्या जास्त आहे. पण शाळेत पटसंख्या मात्र तेवढी नाही. इथे येणारे अनेक विद्यार्थी हे आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा निम्न स्तरातील होते. अनेकजण अभ्यासात कच्चे होते. पण त्यांच्याकडे एक गोष्ट मात्र होती, ती म्हणजे संगीत. सोमनाथना स्वतला संगीताची, गाण्याची आवड आहे. त्यांना काही वाद्यही वाजवता येतात. त्यामुळे वर्गात शिकवताना त्यांनी कवितेला चाल लावल्याशिवाय ती कधी शिकवली नाही. पारगावच्या शाळेत मुलांसोबत कविता म्हणताना त्यांना लक्षात आलं की, ‘या पोरांना तर संगीताची चांगली जाण आहे. अनेकांचा गळा चांगला आहे.’

एव्हाना यू टय़ूब, गुगल या गोष्टींवर सरांची चांगलीच दोस्ती झाली होती. कराओके ट्रॅक हा प्रकारही त्यांना माहिती होता. त्यावर ते स्वत प्रयोग करत होतेच, पण वर्गातल्या सुरेल विद्यार्थ्यांना पाहून त्यांनी एकदा वर्गात कराओके न्यायचे ठरवले. राहुल आणि सोनाली या चौथीतल्या विद्यार्थ्यांनी धिटाईने त्यावर गाणे गायले आणि सोमनाथ चकितच झाले. कुठलेही शिक्षण न घेता फक्त कण्र्यावर ऐकून ही मुले इतके सुंदर गातात तर मग यांच्यातल्या गाण्याला आपण बाहेर काढायलाच हवे, असे सोमनाथना वाटले. त्या दृष्टीने विचार केल्यावर त्यांना लक्षात आले की पीटीसाठी आपण शाळेत जे ड्रम आणले होते, ते वाजवायलाही अनेकांना आवडते आणि जमते आहे. म्हणजे गाणंच नव्हे तर वाद्यांचीही मुलांना चांगली जाण आहे. मग सोमनाथनी हळूहळू वाद्ये जमवायला सुरुवात केली. या वाद्यांच्या तालावर, कराओकेच्या साथीने गाणी म्हणताना, विद्यार्थी खूश झाले. पण हा संगीतप्रयोग सोमनाथना इतक्यावरच मर्यादित ठेवायचा नव्हता. त्यांनी या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धामध्ये बक्षिसे घ्यायला लावून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. त्यातल्या अनेकांना अभ्यासात फारशी गती नव्हती. पण गाण्यामुळे शाळेत त्यांचे कौतुक होऊ लागले. गाण्याप्रमाणे अभ्यासही आपल्याला जमू शकतो, याची या विद्यार्थ्यांना जाणीव झाली. त्यांना हळूहळू अभ्यासाचीही गोडी लागली. मग कधी पदरचे पैसे खर्च करून, कधी लोकसहभागातून कधी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने सोमनाथनी शाळेमध्ये चांगला माइक, कराओके सिस्टिम बसवून घेतली. शाळेच्याच एका खोलीत हा स्टुडिओ तयार झाला. सोलापूरच्या एका कंपनीच्या सीएसआर उपक्रमातूनही सोमनाथनी शाळेसाठी मदत मिळवली. त्यासाठी स्वत नेटाने पाठपुरावा केला. या कंपनीने शाळेला संपूर्ण सोलार सिस्टीम दिली आणि विजेचा महत्त्वाचा प्रश्न सुटला.

या स्टुडिओत सोमनाथनी विद्यार्थ्यांची गाणी रेकॉर्ड केली आणि ती पालकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकायला सुरुवात केली. या ग्रुपमध्ये पालक खरेतर कमी होते. कारण बऱ्याच जणांकडे मोबाइलच नव्हते. मग या ग्रुपमध्ये गावातीलच काही गुणी तरुण दाखल झाले. त्यांनी ग्रुपवर येणारे विद्यार्थ्यांच्या गाण्याचे व्हिडीओ त्यांच्या पालकांना दाखवायला सुरुवात केली. आपल्या लेकरांचे शाळेत कौतुक होते, हे जाणवल्यावर पालकांनाही शाळा आपलीशी वाटू लागली. हे व्हिडीओ सोमनाथनीही आपल्या यू टय़ुब चॅनलवर टाकले होते. तेच पाहून मुंबईतील एका निवृत्त मुख्याध्यापिकांनी विद्यार्थ्यांना महागातला ऑक्टोपॅड दिला. स्मार्टबोर्ड आला. कीबोर्डही अशाच लोकसहभागातून आला. सोमनाथ यांच्या स्वप्नातला स्टुडिओ सजू लागला. पण हे नवे साहित्य आल्यावर ८-१० दिवसांतच शाळेत चोरी झाली. सोमनाथनी अत्यंत व्यथित होऊन यावर ‘एका स्वप्नाचा गर्भपात’ ही फेसबुक पोस्ट लिहिली. ती व्हायरल झाली आणि अनेकांपर्यंत या शाळेची व्यथा पोहोचली. त्यातून पुन्हा मदत मिळाली आणि शाळेत महाराष्ट्रातला पहिला ऑडिओ-व्हिडीओ स्टुडिओ पुन्हा उभा राहिला. इथे आता जवळपास दीड लाखाचे साहित्य आहे. एखाद्या ऑर्केस्ट्रामध्ये जसा सेटअप असतो, तसाच इथेही आहे. या खोलीत येऊन कविता गायला मुलांना ‘लय मज्जा’ येते. इथे सोमनाथनी विद्यार्थ्यांची वेगवेगळी गाणी रेकॉर्ड केली आहेत.

या स्टुडिओखेरीजही शाळेत अनेक उपक्रम चालतात.  स्वत टेकसॅव्ही असल्याने सोमनाथनी गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या गोष्टींचा अत्यंत कल्पक उपयोग करून घेतला आहे. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिपच्या माध्यमातून विद्यार्थी शाळेतच बसल्या बसल्या जगभरातल्या अनेक गोष्टी पाहू शकतात. त्यांनी अ‍ॅमेझॉनचे खोरे, द. अफ्रिकेतील कासवांचे रुग्णालय, पेंग्विन संवर्धनाचे काम अशा अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. शिवाय स्काइपच्या माध्यमातून विद्यार्थी पुस्तकातील धडय़ांच्या लेखकांसोबत गप्पा मारतात, प्रश्न विचारतात. हे सगळे उपक्रम होतात, ते स्टुडिओच्याच वर्गखोलीत. महत्त्वाचे म्हणजे ही सगळी उपकरणे विद्यार्थीच हाताळतात. आता तर शाळेमध्ये १५ टॅबही आलेले आहेत. त्यावरच्या अनेक अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून मुले अभ्यास करतात. रोज सगळ्यांना टॅब मिळू शकत नसल्याने त्याचे एक रजिस्टर केले आहे. त्यामध्ये नोंदणी करून मुले टॅब घेऊन जातात. त्या रजिस्टरचे कामही ३ मुलीच पाहतात.

सोमनाथ म्हणतात, ‘मी बदली होऊन गेल्यानंतर हे संगीतशिक्षण बंद होऊ नये, यासाठी मी मोठय़ा विद्यार्थ्यांना मला येणारी वाद्ये, गाणी शिकवत असतो. माझी अपेक्षा असते की त्यांनी हे लहान विद्यार्थ्यांना शिकवावे आणि ते ती पूर्ण करतातही. सर्व उपकरणांचेही तसेच आहे. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनाच ही उपकरणे हाताळायला लावतो. जबाबदारी दिल्यावर विद्यार्थी ती पुरेपूर सांभाळतातच.!’

स्वाती केतकर- पंडित swati.pandit@expressindia.com

First Published on February 14, 2018 4:45 am

Web Title: teacher somnath walke promote art artwork in zilla parishad school