चालू घडामोडीचा अभ्यास नेमका काय, कसा आणि कशातून करायचा, याविषयी ‘टू द पॉइंट’ चर्चा या लेखात करू. चालू घडामोडी म्हणजे ‘काय वाट्टेल ते’ विचारले जाऊ शकते या मुक्तछंदातून बाहेर पडून, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाला एक निश्चित चौकट असते, हे समजून घ्यायला हवे. मग ती परीक्षा कोणतीही असो. हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन आपला अभ्यास मिनिमाइज करा.  प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून लक्षात येईल की चालू घडामोडी घटकात –

*    स्वतंत्र चालू घडामोडी

*   सामान्य अध्ययनामध्ये समाविष्ट इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राजकारण, विज्ञान, पर्यावरण या घटकांशी संबंधित चालू घडामोडी.

*   सामान्य ज्ञान स्वरूपाची माहिती, अशा तीन प्रकारचे प्रश्न विचारले जातात.

अभ्यासासाठी अशी विभागणी केली तरी प्रश्नांचे नेमके स्वरूप समजण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. वारंवार प्रश्नपत्रिका पाहिल्या पाहिजेत. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पूर्वी उमेदवारांना करावे लागायचे, काही वर्षांपूर्वी असे रेडीमेड विश्लेषण यूपीएससी परीक्षांसाठी मिळू लागले. आता राज्य सेवा परीक्षांसाठीही असे विश्लेषण काही संस्थांनी प्रसिद्ध केले आहे. त्याचा वापर करावा. प्रश्नांची प्रकृती लक्षात आली की, अभ्यासाला दिशा मिळते. दैनिके, मासिकांत नेमके काय वाचायचे, हे लक्षात आले पाहिजे. वृत्तपत्रातील ‘बातमी’ आणि स्पर्धा परीक्षेविषयी आवश्यक ‘माहिती’ यात फरक करता आला पाहिजे. हा फरक लक्षात आला की अभ्यास ‘मिनिमाइज’ होईल आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनानुसारसुद्धा होईल.

पूर्वपरीक्षेत विचारले जाणारे प्रश्न सर्वसाधारणपणे मागील एक वर्षांच्या घडामोडींवर विचारले जातात. ‘एक वर्ष’ असा लिखित नियम नाही. अजून खोलात जायचे तर मागील आठ-नऊ महिन्यांच्या घडामोडींवर फोकस जास्त असतो. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी असे अभ्यासक्रमात नमूद आहे. पण प्रश्नांचा प्राधान्यक्रम पाहता या क्रमात राष्ट्रीय पहिले आणि मग राज्य व आंतरराष्ट्रीय असे दिसते. त्यामुळे आपल्या अभ्यासाचे प्राधान्यक्रम ठरवताना, या विश्लेषणाचा आधार घ्यावा.

सर्वप्रथम प्रत्येक घटकाशी संबंधित पायाभूत पुस्तकांच्या वाचनाद्वारे पक्क्या केलेल्या संकल्पनांशी थेट संबंध असणाऱ्या घडामोडी पाहिल्या पाहिजेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उलथापालथींचा प्रभाव कधी अल्पकालीन तर कधी दीर्घकालीन असतो. पकी बऱ्याच घटनांचा थेट प्रभाव महाराष्ट्राच्या, भारताच्या राजकीय, सामाजिक, आíथक क्षेत्रांवर पडणारा असतो. हा प्रभाव सामान्य अध्ययनाच्या प्रश्नपत्रिकेवर पडणे स्वाभाविक असते.

परीक्षेला काही दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या काही दिवसांत प्रभावी अभ्यासासाठी निवडक आणि नेमक्या संदर्भ साहित्यासाठी जास्त वेळ दिला पाहिजे. माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे प्रकाशित होणारे इंडिया इयर बुक हे पूर्व व मुख्य परीक्षेसाठी जसे ‘प्रमाण ग्रंथ’ आहे, तसेच गंभीरपणे लिहिले, बोलले व सुचविले जाते. पण तितक्याच गंभीरतेने ते वाचले जातेच असे नाही. कारण अभ्यासासाठी वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांत सर्वाधिक ‘बोअर’ करणारे हे ‘इयर बुक’ असते! पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ते वाचले जात नाही आणि तशी आवश्यकताही नसते. इंडिया इयर बुकमध्ये शासनातर्फे अधिकृतपणे प्रसिद्ध केलेली आकडेवारी, तथ्यात्मक माहिती असते तर केंद्रीय आíथक पाहणी अहवालामध्ये आकडेवारी, तथ्यांसह विश्लेषणही असते. पुढे सुचविल्याप्रमाणे त्यातील मोजकीच प्रकरणे पाहावीत.

इंडिया इयर बुक (हिंदी/इंग्रजी) प्रकरण १,४,५,१०,११,१२,१६,१९,२१,२२,२४,२५,२६,२७,२८ आणि केंद्रीय आíथक पाहणी अहवालाची पान नं.५३ ते ७७, ८२ ते ९८, ११३ ते १२२, १४० ते १६५, १७३ ते १९५ आणि ३०० ते ३१४ इतका भाग पाहावा. महाराष्ट्राच्या आíथक पाहणी अहवालातील विश्लेषणात्मक बाबी समजून घ्याव्यात.

शेवटच्या काही दिवसांत हे सर्व पाहणे, अभ्यासणे शक्य नसेल तर या सर्व संदर्भग्रंथांचा अभ्यास करून तयार केलेली विविध प्रकाशनांची पुस्तके, विशेषांक उपलब्ध आहेत. पकी सर्व माहितीचे एकत्रित संकलन असलेले साहित्य निवडावे. उमेदवारांच्या सोयीसाठी पुढील काही लेखांत महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय आíथक पाहणी अहवालासंदर्भातील आवश्यक माहितीबाबत चर्चा करू. राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माहितीसाठी आपले सरकार पोर्टल उपयुक्त आहे.  कितीही पुस्तके हाताळली तरी चालू घडामोडींचा अभ्यास हा संपणारा नसतो. म्हणून ‘टू द पॉइंट’ अभ्यास करून आपले प्रयत्न पूर्ण करा.