*   मी बायोमेडिकल इंजिनीअर आहे. पण मला अद्याप नोकरी मिळालेली नाही. मला या क्षेत्रातील पुढील शिक्षण आणि नोकरीविषयी माहिती सांगा. मला कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे काय?

– प्रणिता धवले

भारतामध्ये अद्याप बायोमेडिकल इंजिनीअिरग हे क्षेत्र प्राथमिक अवस्थेत आहे. वैद्यकीय उपकरण निर्मिती उद्योग, रुग्णालये आणि विद्यापीठे यांच्यामध्ये अद्यापही या विषयाच्या अभ्यासक्रमाची म्हणावी तेवढी निश्चिती होऊ  शकलेली नाही. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवाराला सेवा, देखभाल, ग्राहक तक्रार निवारण, विक्री, व्यवस्थापन अशासारख्या अतांत्रिक नोकऱ्या मिळू शकतात. विद्यापीठ, प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे यामध्ये संशोधनासंदर्भातील करिअर करता येते. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी ,चीन, सिंगापूर, इंग्लंड आदी विकसित देशांमध्ये मात्र या क्षेत्राचा विकास होत आहे. या विषयातील एमएस अथवा पीएचडी केल्यास चांगल्या संधी मिळू शकतात. भारतामध्ये एल अँड टी, जनरल इलेक्ट्रिकल ग्लोबल रिसर्च, सिमेन्स, फिलिप्स हेल्थकेअर आदी संस्थांमध्ये संधी मिळू शकते. मात्र त्यासाठी व्यक्तिश: प्रयत्न करावे लागतील. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी बाल्टिमोर, अटलांटास्थित जॉर्जिया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, सॅन दिएगोस्थित युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, स्टॅनफोर्डस्थित स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, बोस्टनस्थित बोस्टन युनिव्हर्सिटी, फिलालडेफिलिया स्थित पेन्सिलव्हॅनिया युनिव्हर्सिटी या काही संस्थांमधील अभ्यासक्रम उत्कृष्ट समजले जातात.

*   मी बी.कॉमच्या शेवटच्या वर्षांला आहे. पुढच्या वर्षी मी एम.कॉम. करणार आहे. ते करताकरताच मला वाणिज्य शाखेतील एखादा अभ्यासक्रम करायचा आहे. सीए, सीएस, एमबीए, आयसीडब्ल्यूए यांच्या व्यतिरिक्त अभ्यासक्रम सुचवावे.

– प्रदीप अहिरे

एम. कॉम. करतानाच तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या शिक्षण विभागामार्फत सुरू करण्यात आलेले स्टॉक मार्केट/ म्युच्युअल फंड/ वित्तीय व्यवस्थापन/ विमा सल्लागार/ वित्तीय नियोजन/ शेअर्सचे मूल्यांकन/ तांत्रिक विश्लेषण आदी विषयांशी संबंधित लघू मुदतीचे अभ्यासक्रम करू शकाल. तुम्ही सध्या शिकत असलेले अभ्यासक्रम आणि हे अभ्यासक्रम तुम्हाला करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देऊ  शकतात.

संपर्क :  – http://www.bsebti.com/other/current_program_schedule.html

*  मी मेकॅनिकल विषयातील अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांला आहे. मला आरआरबीमधील टेक्निकल (तांत्रिक) विभागाची परीक्षा द्यायची आहे. कृपया अभ्यासासाठी पुस्तकांची नावे सुचवा.

– अजय अवलेकर

परीक्षेचा पेपर दोन तास कालावधीचा आणि १५० गुणांचा असतो. प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचे असतात. या परीक्षेत नकारात्मक गुणांकन आहे. या पेपरमध्ये तांत्रिक क्षमता आणि सामान्य विज्ञान या विषावरील ९० प्रश्न आणि सामान्य अध्ययन, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित यावर ६० प्रश्न विचारले जातात. सामान्य विज्ञान या विषयांच्या प्रश्नांमध्ये १२वीच्या जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमांवर प्रश्न विचारले जातात. अंकगणित हे १० ते १२वीच्या दर्जाचे असते. फक्त त्यातील सर्व संकल्पना स्वयंस्पष्ट होणे गरजेचे आहे. तांत्रिक क्षमतेच्या पेपरमध्ये तुम्हाला ज्या क्षेत्रात नोकरी हवी आहे(उदा-तुमच्या बाबतीत मेकॅनिकल) त्या क्षेत्रावर आधारित प्रश्न विचारले जातात. त्याचा अभ्यासक्रम निवड मंडळामार्फत घोषित केला जातो. तो साधारणत: पदवीपर्यंतचाच असतो. वरील विवेचनावरून लक्षात येईल की कोणत्याही बाह्य़ पुस्तकांचा वापर करण्याऐवजी अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ व शिक्षण मंडळाने ठरवून दिलेल्या अधिकृत पुस्तकांचा अभ्यास केला तरी पुरे आहे.

*   मी सध्या मेकॅनिकलच्या दुसऱ्या वर्षांला शिकत आहे. माझ्या उपयोगाच्या इंटर्नशिप, त्यातील संधी आणि फायद्याबद्दल माहिती द्यावी.

– समीर वाळिंबे, पुणे</strong>

इंटर्नशिपमुळे आपणास प्रत्यक्ष कार्यानुभव मिळतो. याचा उपयोग पुढे नोकरी मिळताना होऊ  शकतो. इंटर्नशिप मिळवण्यासाठी चांगली अभियांत्रिकी महाविद्यालये विद्यार्थ्यांना साहाय्य करतात. तुमच्या कॉलेजमधील प्लेसमेंट सेलच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करा. त्यांच्याकडून अपेक्षित साहाय्य न मिळाल्यास तुम्हाला स्वत: अशा संधी शोधाव्या लागतील. पुण्यात मेकॅनिकल संबंधित उद्योग मोठय़ा प्रमाणात असल्याने थोडेफार प्रयत्न केल्यास अशी संधी मिळू शकेल. ज्या कंपनीत अशी संधी मिळेल तिथे उत्तम काम करा. आपल्या कामाचा ठसा उमटवला तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तिथेच नोकरीसुद्धा मिळू शकते.

*   मी पदवीधर विद्यार्थिनी असून रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यासाठीच्या स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी कोणत्या खासगी शिकवण्यांचा आधार घ्यावा? 
– दर्शन पाटोळे

सर्वप्रथम तुम्ही रेल्वेमधील कोणती नोकरी करावयाची आहे, हे निश्चित करावे. रेल्वे निवड मंडळामार्फत होणाऱ्या परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम जाहीर केला जातो. त्यानुसार सर्व संकल्पना समजून अभ्यास केल्यास आणि अधिकाधिक सराव केल्यास ही परीक्षा उत्तीर्ण होणे अशक्य नाही. चांगल्या खासगी शिकवणी वर्गाची व्याख्या करता येणे शक्य नाही. आपले मूलभूत ज्ञान पक्के असल्यास कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होता येते. इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान याची तयारी घरीसुद्धा करता येते.

*  मला संगणक अभियांत्रिकीमधील डेटाबेसचा अभ्यासक्रम करायचा आहे. त्यातील डेटाबेस, अ‍ॅडमिन, सॅप डेटा मायनिंग या अभ्यासक्रमांपैकी कुठल्या अभ्यासक्रमाला जास्त मागणी आहे?

– स्वाती टोपे, नाशिक

हे तीनही अभ्यासक्रम तुम्हाला करिअरची चांगली संधी उपलब्ध करून देऊ शकतील. विशेषत: डेटा मायनिंग आणि डेटा अ‍ॅनालिटिक्स या विषयांच्या तज्ज्ञांची गरज अनेक मोठय़ा संस्थांना भासू लागली आहे. या विषयांवरील अभ्यासक्रम इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट कोलकाता तसेच नरसी मोनाजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेने सुरू केले आहेत. चांगल्या संस्थेतून या विषयावरील अभ्यासक्रम पूर्ण करून मिळवलेल्या ज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास यामध्ये उत्तम करिअर घडू शकेल.