यंदा माझे बीएस्सी पूर्ण होईल. २०१९ च्या राज्य सेवेतील परीक्षेत यश मिळवून मला उपजिल्हाधिकारी पद गाठायचे आहे. मी खासगी शिकवणी लावू की स्वत: तयारी करू? माझा फार गोंधळ उडाला आहे. शिकवणी वर्ग भरमसाट शुल्क घेतात. स्वत: प्रयत्न करून अपयश मिळाले तर? त्याची भीती वाटते. माझ्याकडे फक्त एकच वर्ष आहे. मी वाटेल ती मेहनत घ्यायला तयार आहे. पण कसे, काय, कुठे प्रयत्न करावेत, याची माहिती नाही. कृपया मार्ग सुचवा.

– संजीवनी वानखेडे, चंद्रपूर</strong>

तुझा प्रश्न मी पुन:पुन्हा किमान पाच वेळा वाचला. खरे तर हे उत्तर केवळ तुझ्यासाठी नसून ‘लोकसत्ता’च्या तुझ्यासारख्या हजारो वाचकांसाठी आहे. त्यामुळे तुझ्या भाबडय़ा प्रश्नाकडे वळून आपण सविस्तर प्रत्येक बाबीची चर्चा करू या.

*      माझ्याकडे फक्त एकच वर्ष आहे. म्हणजे माझ्या घरचे मला परीक्षेसाठी, शिकण्यासाठी यापेक्षा जास्त वेळ देण्याची शक्यता नाही, असा याचा अर्थ होतो. घरच्या परिपूर्ण पाठिंब्याशिवाय किंवा थेट स्वत:च्या हिमतीवर शिकायची तयारी दाखवल्याखेरीज स्पर्धा परीक्षांच्या रस्त्याचा विचार धोक्याचा ठरतो. एक वर्ष तयारीला, एक वर्ष परीक्षेतील अपयशाचा अभ्यास करून पुन्हा तयारी करायला, तर तिसरे वर्ष पद मिळवण्यासाठी असा किमान वेळ काढणे गरजेचे असते.

*      मी वाटेल ती मेहनत घ्यायला तयार आहे. जास्त मेहनत म्हणजे पटकन यश याऐवजी नेमकी अभ्यासाची पद्धत, त्याची आखणी, त्यासाठीचे विविध संदर्भपुस्तकांचे वाचन यातून स्वअभ्यासाची सुरुवात होत असते. हा स्वअभ्यास लहानपणापासून अंगी मुरलेले या परीक्षांत सहसा यशस्वी होत असतात. क्रमिक पुस्तक, त्यावरचा क्लास व मिळालेले डिस्टिंक्शन या सरधोपट क्रमाने जाणारे या परीक्षांत गडबडतात. स्पर्धा परीक्षांचा सोळा-अठरा तास रोज अभ्यास करतो हे वाक्यच तपासून पाहायला हवे. नेमकेपणाने आठ ते दहा तास अभ्यास पचवण्याची मानवी मेंदूची क्षमता लक्षात घ्यायला नको काय?

*      खासगी शिकवण्या खूप महाग झाल्या आहेत. मागणी व पुरवठा या नात्याने ही गोष्ट होणारच. पण महागडी शिकवणी म्हणजे हमखास यश याचा विचार कोण करणार? अमुक शिकवणी वर्गामधून इतके अधिकारी निर्माण झाले हे आपण सारेच वाचतो, मात्र त्यासाठी किती जणांनी त्याच वर्गाला हजेरी लावली होती, हा आकडा विचारणारा, विचारून त्याचा अर्थ लावणारा यशाची पहिली पायरी चढतो. स्वअभ्यास, पूर्वतयारी व शिकवणी वर्गामध्ये परीक्षेचे तंत्र शिकणे असा विचार प्रत्येकाने जरूर करावा.

*      मला उपजिल्हाधिकारी पद गाठायचे आहे. अशी पदे किती? अन्य पदे कोणती? त्या पदांवरची व्यक्ती काय काम करते? ते करायला आपण का उत्सुक आहोत? की फक्त पदाच्या अधिकाराकडे व पगाराकडे पाहून आपण या परीक्षेचा ध्यास घेत आहोत? यंदा परीक्षेला बसणारे विद्यार्थी किती व पदे किती? या प्रत्येक प्रश्नाचा कसलाही विचार न करता  या मृगजळी स्वप्नाकडे धावलात तर उपयोगाचे नाही. यातील प्रत्येक बाबीवर निदान आठ-दहा वेळा विचार केला तर यशाची पायाभरणी तरी होते. नाही तर स्वप्नांचे मनोरे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात.

*      अपयश मिळाले तर? – प्रथम प्रयत्नात यश मिळवणारे अक्षरश: शोधावे लागतात, हे वास्तव लक्षात घ्यावे. अपयश न मानता त्यातून शिकणारे, कुठे कमी पडले यावर विचार करणारे नक्की यशस्वी होतात. मात्र या साऱ्या खेळामध्ये आता माझी कुवत संपली किंवा आता माझ्या हाती यापेक्षा जास्त द्यायला आयुष्यात वेळ नाही, याची नेमकी जाणीव होणेसुद्धा महत्त्वाचे असते. त्यालाच सारे यशस्वी अधिकारी ‘प्लॅन बी’ असे नाव देतात. त्यांचा ‘प्लॅन बी’ पक्का तयार होता म्हणूनच अपयशाची भीती न बाळगता त्यांनी यश खेचून आणले ना?

या सगळ्याचा सारासार विचार करुनच निर्णय घे.

विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो, करिअर मंत्र या सदरासाठीचा  ई-मेल आयडी मात्र आता बदललेला आहे.  यापुढे आपले प्रश्न  career.mantra@expressindia.com   येथे पाठवावेत. प्रश्नामध्ये आपली शैक्षणिक पात्रता जरूर नमूद करावी. त्यामुळे  उत्तरामध्ये अधिक स्पष्टता आणता येईल.