बारावीच्या परीक्षेचे वळण करिअरचा मार्ग आखत असते. ही परीक्षा आता अगदी जवळ आली आहे. कलाशाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या उरलेल्या दिवसांत कसा अभ्यास करावा, याविषयी..

*   मराठी – बऱ्याच विद्यार्थ्यांचे म्हणणे असते की, मराठीचा पेपर वेळेत पूर्ण होत नाही. तीन तासांत पेपर पूर्ण करण्याचा सराव ठेवला तरच तो पूर्ण होईल. यासाठी आधी पाठय़पुस्तकाचे सखोल वाचन आवश्यक आहे, कारण व्याकरण हे पाठय़पुस्तकातूनच विचारले जाते.

पत्रलेखनाचा प्रश्न निवडताना आधी विषय नीट वाचून समजून घ्यावा, कारण घाईघाईत विद्यार्थ्यांना विषयच कळत नाही. एकदा पत्रलेखनाचा विषय होता- ‘रात्रीची गस्त वाढवणे’. बऱ्याच विद्यार्थ्यांना ‘गस्त’ या शब्दाचा अर्थच कळला नाही. त्यामुळे त्यांनी गस्त चांगली वाटते, ती वाढवा असे पत्रलेखन केले. शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी सकस वाचन वाढवायला हवे.

*   इंग्रजी – हा विषय मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना जड वाटतो. पण तसे करायचे कारण नाही. यातल्या तोंडी परीक्षेत तुम्ही पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता.

त्याची नीट तयारी करा. रॅपिड रीडिंगला आठ गुण आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पाठय़पुस्तक किमान तीन वेळा तरी वाचावे.

पाठय़पुस्तकाचे वाचन झाले असेल तर प्रश्नांची उत्तरे लगेच देता येतात. ठ३ी ें‘्रल्लॠ साठीसुद्धा दिलेल्या सूचना नीट वाचा. त्यानुसारच उत्तर लिहायचे आहे, हे ध्यानात ठेवा. फॅमिली ट्रीचा प्रश्न असेल तर बरेच विद्यार्थी झाडाचे चित्र काढून त्याला फांद्या दाखवतात. असे करू नका.

*   भूगोल – शाळेपासून शिकत आलेल्या या विषयातही २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा आहे. ती जर व्यवस्थित पार पडली तर जास्त मार्क मिळू शकतील. सुरुवातीचा वस्तुनिष्ठ प्रश्न २० गुणांचा आहे. १० गुणांसाठी  map marking आहे. जर नकाशा वाचन झाले असेल तर नकाशा सहज भरू शकता. भूगोलातील बरेच धडे अर्थशास्त्राच्या धडय़ांवर आधारित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते सारखेच वाटतात. मात्र यातील वेगळेपण आणि परस्परसंबंध जाणून घ्या.

*   इतिहास -इतिहासात २० गुण प्रकल्पांसाठी (project) असतात. सुरुवातीचा वस्तुनिष्ठ प्रश्न व्यवस्थित सोडवा. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहिण्याचा प्रश्न असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोपा वाटतो; पण यातही पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर पाठय़पुस्तकाच्या सखोल वाचनाला पर्याय नाही.

*   मानसशास्त्र -मानसशास्त्र हा विषय विज्ञान शाखेतील विद्यार्थीसुद्धा आवडीने घेतात. हा खरोखरच खूप महत्त्वाचा आणि रंजक विषय आहे. मानसशास्त्रामध्येसुद्धा वेळेचे नियोजन महत्त्वाचे आहे. चौथा आणि सहावा धडा हे मोठय़ा प्रश्नांसाठी आहेत. बरेचदा विद्यार्थ्यांना धडा कितपत कळला आहे, त्यांची तयारी किती पक्की आहे, हे समजण्यासाठी केस स्टडीसुद्धा दिली जाऊ शकते.

*   हिंदी – राष्ट्रभाषा हिंदी हा विषय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. इतर विषयांप्रमाणे या विषयातही पाठय़पुस्तकाचे वाचन गरजेचे आहे. निबंध लेखन हे सुरुवातीला न करता शेवटी लिहावे. त्यामुळे शेवटचा राहिलेला वेळ निबंधासाठी वापरता येतो. निबंधात कोणकोणते मुद्दे मांडायचे आहेत, याचा विचारही करता येतो.

*   संस्कृत – ज्या विद्यार्थ्यांचे पाठांतर चांगले आहे त्यांनी संस्कृतचा अभ्यास जरूर करावा. संस्कृतमध्ये श्लोक जसेच्या तसे लिहावे लागतात. या श्लोकांचा अर्थ समजून मग उत्तर लिहावे. भाषांतराचा (translation) प्रश्न व्यवस्थित वाचून मगच सोडवा.

*   तर्कशास्त्र – या विषयात २० गुणांचा एक प्रकल्प असतो. उरलेले ८० गुण विभाग ए आणि बीमध्ये विभागले गेलेले असतात. लॉजिकमधील गणिते जर बरोबर समजली असतील तर विद्यार्थ्यांना पूर्ण गुण मिळू शकतात. truth table हा विषयही खूप गमतीदार आहे. त्याचा चांगला अभ्यास करा.

या व्यतिरिक्त महत्त्वाचे

*   रोज कोणत्याही दोन विषयांचे पेपर सोडवाच. सकाळी ज्या विषयाचा पेपर सोडवला त्यातले अवघड प्रश्न आणि त्यांची उत्तरे नंतर तयार करावीत. दुपारी परत दुसऱ्या विषयाचा पेपर सोडवावा.  प्रत्यक्ष परीक्षेआधी एका विषयाचे किमान पाच पेपर तरी पूर्ण व्हायला हवेत.

*   बहुतेक विद्यार्थ्यांचे अर्थशास्त्र, इंग्रजी, मराठी, मानसशास्त्र हे पेपर पूर्ण होत नाहीत. त्यासाठी वेळेचे नियोजन हवे. अर्थशास्त्रामध्ये पहिल्या तासामध्येच १, २, ३ असे प्रश्न सोडवले तर बाकीचा पेपर वेळेत पूर्ण होऊ शकतो. प्र. ५ हा दिलेल्या विधानाशी तुम्ही सहमत किंवा असहमत आहात ते कारणासहित लिहिण्याचा असतो. (agree or disagree) कारण माहिती नसेल तर ज्या पर्यायावर ठाम आहात तो पर्याय जरूर लिहा.

*   धडय़ाखालील सराव प्रश्नांही जरूर सोडवा. ऑप्शनला टाकलेल्या धडय़ातले वस्तुनिष्ठ प्रश्नतरी तयार करून ठेवा.

*    आपल्या नोट्स आपणच काढा. परीक्षेच्या आधी प्रत्येक विषयाचे मुद्दे लिहून ठेवा. आयत्या वेळेला वाचायला ते उपयोगी पडतात.

प्रा. मनिषा हारनहळ्ळी 

(लेखिका एचएससी बोर्डामध्ये परीक्षा नियामक म्हणून काम पाहतात.)