खेळण्यांच्या दुकानांमध्ये व्यवस्थितपणे ठेवलेल्या मोटारगाडय़ा, विमाने, हेलिकॉप्टर्स, ट्रक, बस, डबलडेकर आबालवृद्धांचे लक्ष वेधून घेतात. निरनिराळे रंग, वैविध्यपूर्ण रचना आणि अत्यंत आकर्षक डिझाइन यामुळे ही खेळणी अक्षरश: जिवंत भासतात. खरं म्हणजे मोटारगाडी असो अथवा बाहुली, थोडा वेळ खेळून झालं की लहान मुलांचा पुढचा उद्योग म्हणजे त्या खेळण्यांच्या अंतरंगाची चाचपणी, इंजिन कुठं असतं, आवाज कुठून येतो, चाकं कशी फिरतात हे शोधणे. या आणि अशा अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे पालकांपाशी असणं तसं कठीणच, पण या प्रश्नांचा जिद्दीने पाठपुरावा करणारे विद्यार्थी एक परिपूर्ण करिअर म्हणून पुढे टॉय डिझायनिंग क्षेत्राचा विचार करून स्वत:ची प्रगती साधू शकतात.
डिझायनिंग ही एक स्वतंत्र आणि फार मोठी शाखा आहे. त्याची व्याप्ती प्रचंड आहे. त्यात टॉय डिझायनिंग हे एक स्पेशलायझेशन म्हणायला हवे. तांत्रिक-अभियांत्रिकी ज्ञान आणि कला यांचा एकत्रित मिलाफ असलेले हे सर्जनशील करिअर विद्यार्थ्यांना करता येऊ शकते. या कौशल्यांना जोडून संगणकाचे ज्ञान असल्यास आणखी लाभ होऊ शकतो. आवड व गती ओळखून वेळीच या क्षेत्राचा विचार केला गेला तर टॉय डिझाइनविषयी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक गोष्टींबरोबरच कल्पकता, नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची तयारी, विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्या अनुषंगाने बाजारामध्ये येणारे गेम्स यांचा अभ्यास करता येऊ शकेल. टॉय डिझायनिंगसाठी पात्रतेचे निकष हे पूर्णपणे वेगळे आहेत. उदा. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी इथे प्रवेश घेऊ शकतात, तसेच मार्केटिंगमधील पदविका किंवा पदवी असलेले विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकतात. मात्र, पात्रतेचे निकष हे प्रत्येक संस्थेचे वेगवेगळे असू शकतात हे मात्र विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे.
मुळातच प्रॉडक्ट डिझायनिंग या शाखेची व्याप्ती मोठी आहे आणि त्यात टॉय डिझाइन ही एक परिपूर्ण शाखा आहे. केवळ राज्यात अथवा देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्येसुद्धा कुशल टॉय डिझायनर्सची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. एकदा का विद्यार्थ्यांने डिझायनिंगच्या विश्वात प्रवेश केला की त्याला पुढे त्याच्या आवडीच्या शाखेमध्ये शिक्षण-प्रशिक्षण घेता येऊ शकते. उदा. ज्यांना मानसशास्त्राची आवड आहे ते मानसशास्त्रावर आधारित गेम्स (सायकॉलॉजिकल गेम्स) डिझाइन करू शकतात. शिक्षणक्षेत्राशी संबंधित व्यक्ती आणि तत्सम आवड असणाऱ्या व्यक्ती शैक्षणिक साहित्य म्हणूनही खेळांचा खूप कल्पकतेने वापर करू शकतात. वेगवेगळ्या पद्धतीची सॉफ्ट टॉइज बनविण्यातही आपली चुणूक दाखवता येईल. अगदी वाढदिवसापासून लग्न समारंभाच्या रुखवतात सर्रास वापरले जाणारे सॉफ्ट टॉइज बनवणे हासुद्धा करिअरचा एक पर्याय होऊ शकतो. अशा क्षेत्राचे अधिकृत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांला नोकरीची उत्तम संधी मिळू शकते, शिवाय स्वयंरोजगाराचा पर्यायही खुला होऊ शकतो.
कोलकात्याच्या इन्स्टिटय़ूट ऑफ टॉय डिझायनिंग या खासगी संस्थेत टॉय डिझायनिंगचे वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी http://www.itmtindia.in हे संकेतस्थळ पाहावे.
गुजरातमधील अहमदाबाद, पालडी येथे असणारी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन ही संस्था केंद्र सरकारची स्वायत्त संस्था असून या संस्थेत ‘टॉय अ‍ॅण्ड गेम डिझायनिंग’ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
पुस्तकी अभ्यासाबरोबरच, प्रात्यक्षिके आणि विविध उपक्रमांनी सज्ज अशा अडीच वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला कुठल्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो! या संस्थेच्या राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेत उत्तम गुणांनी यशस्वी होणे प्रवेशाकरता अनिवार्य ठरते.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी या मुंबईस्थित असलेल्या संस्थेचे इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर (आयडीसी)येथेही प्रॉडक्ट डिझाइनचा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे आणि केवळ मुंबईतच नव्हे तर आयडीसी कार्यरत असलेल्या गुवाहाटी, कानपूर, हैदराबाद आदी ठिकाणीही टॉय डिझायनिंगसंबंधित अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या संबंधीचे वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम पुण्याच्या सिम्बॉयसिस संस्थेत तसेच मणिपाल विद्यापीठ यांसारख्या खासगी संस्थेतही उपलब्ध आहेत. एकूणच अत्यंत सर्जनशील अशा या टॉय डिझायनिंग क्षेत्राकडे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांचे विविध पर्याय आज उपलब्ध आहेत.
हेमंत महाजन