डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था

राज्यातील सरकारी आणि केंद्रीय विद्यापीठांच्या बरोबरीनेच अभिमत विद्यापीठेही आपल्या विद्यापीठ विश्वमध्ये सक्रिय आहेत. या विद्यापीठांमध्ये सरकारी आणि खासगी असा थेट फरक करता येतो. सुरुवातीला सरकारी मदतीने सुरू झालेल्या शैक्षणिक संस्था आणि नंतरच्या काळात विशिष्ट विषयांच्या अभ्यासासाठी अशा संस्थांना मिळालेला अभिमत विद्यापीठांचा दर्जा हे अशा शैक्षणिक संस्थांचे वैशिष्टय़ ठरते. पुण्यात येरवडा परिसरामध्ये असणारी ‘डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था’ हीसुद्धा त्यापैकीच एक.

mumbai university fake marksheet marathi news
कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठाकडून पोलीस तक्रार दाखल
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

संस्थेची ओळख

देशातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या या संस्थेची स्थापना आहे, ६ ऑक्टोबर, १८२१ची. संस्थेचे स्थापनेच्या वेळचे नाव होते ते ‘द हिंदू कॉलेज’. ७ जानेवारी, १८५१ पासून ‘द पूना कॉलेज’ या नावाने, तर १५ नोव्हेंबर १८६४ पासून ही संस्था सध्याच्या, अर्थात डेक्कन कॉलेज या नावाने ओळखली जात आहे. स्थापनेपासून सुरुवातीचा काही काळ विश्रामबागवाडय़ामध्ये व त्यानंतर वानवडीमधून चालणाऱ्या या संस्थेला स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच येरवडा परिसरामध्ये जागा मिळाली. साधारण सव्वाशे एकरांच्या परिसरामध्ये त्यानंतर सुरू झालेले हे कॉलेज त्यानंतरच्या काळामध्ये संस्कृत, पुरातत्त्वशास्त्र आणि भाषाशास्त्रामधील एक प्रमुख शैक्षणिक आणि संशोधन केंद्र म्हणूनच उदयाला आले. पुण्याबाहेर असल्याने आणि कमी विद्यार्थी संख्येमुळे ब्रिटिशांनी १९३४ मध्ये हे कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला होता, ही बाब आता कोणाला सांगूनही खरी वाटणार नाही. माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमधून १७ ऑगस्ट, १९३९ पासून ही संस्था पुन्हा सुरू झाली. संस्थेची बहुमोल कामगिरी विचारात घेत ५ मार्च, १९९० रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला. संस्थेने १ जून, १९९४ पासून एक अभिमत विद्यापीठ म्हणून आपल्या कार्याला प्रत्यक्षात सुरुवात केली.

विभाग

भाषा, संस्कृती आणि पुरातत्त्व वारशाबाबत शास्त्रीयदृष्टय़ा शिक्षण- प्रशिक्षण आणि संशोधन करू शकणारी पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य ही संस्था करत आहे. संस्थेमध्ये सुरू असणारे विभाग आणि या विभागांमधून चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांवर एक नजर टाकली, तरी याविषयीची खात्री आपल्याला पटू शकते. संस्थेच्या  http://www.dcpune.ac.in या संकेतस्थळावरून याविषयीची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेमध्ये १९३९ मध्ये सुरू झालेला भाषाशास्त्र विभाग हा या क्षेत्रात कार्यरत असा देशातील सर्वात जुना विभाग ठरतो. त्यामुळेच या विभागाची ओळख ही ‘फादर ऑफ इंडियन लिंग्विस्टिक्स’ म्हणूनही करून दिली जाते.

भारतीय विद्यापीठांमधील पहिला पुरातत्त्वशास्त्र विभाग सुरू करण्याचा मानही याच संस्थेकडे आहे. पुरातत्त्वशास्त्राचे शिक्षण आणि संशोधनासाठी ओळखला जाणारा हा विभागही १९३९ मध्ये सुरू झाला. पुरातत्वशास्त्राशी संबंधित वेगवेगळ्या शाखा आणि उपविषयांमध्ये सखोल मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन या विभागातून विद्यार्थ्यांना मिळते. भारतातील विविध राज्यांमध्ये शास्त्रीय पद्धतीने मूलभूत संशोधन आणि उत्खनन, सर्वेक्षणाचे काम या विभागामार्फत चालते. संस्थेमध्ये असलेल्या संस्कृत आणि कोशशास्त्र(लेक्सिकोग्राफी) विभागामध्ये १८२१ पासून संस्कृतशी निगडित असलेल्या विविध शाखांचा अभ्यास करण्यासाठी काम सुरू आहे. संस्थेने संस्कृत शब्दकोशाच्या माध्यमातून केलेले भरीव कार्य हे या विभागाचे वेगळेपण ठरते.

अभ्यासक्रम

या विद्यापीठामध्ये पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रमाणपत्र आणि पीएचडी या चार वेगवेगळ्या टप्प्यांवरील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तिन्ही विभागांमध्ये चालविले जाणारे पदव्युत्तर पदवीचे अभ्यासक्रम हे दोन वर्षे कालावधीचे व पूर्णवेळ स्वरूपाचे आहेत. त्यामध्ये एम.ए. (एआयएचसी आणि आर्किऑलॉजी), एम.ए. लिंग्विस्टिक्स, एम.ए. संस्कृत अँड लेक्सिकोग्राफी या अभ्यासक्रमांचा समावेश होतो. त्याशिवाय संस्थेमध्ये पुरातत्त्वशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदविकाही संस्थेमध्ये चालविली जाते. संस्थेमध्ये चालविल्या जाणाऱ्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये संशोधन पद्धती, कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स, दक्षिण आशियामधील भाषांची ओळख, इटालियन, पर्शियन, जपानी आदी भाषा, आर्किऑलॉजी ऑफ बुद्धिझम, फोनेटिक्स फॉर स्कूल टीचर्स, भाषाशास्त्राची ओळख या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांमध्ये हेरिटेज साइट मॅनेजमेंट अँड सायंटिफिक कन्झव्‍‌र्हेशन, अंडरवॉटर आर्किऑलॉजी या विषयांचा आढावा विद्यार्थी घेऊ  शकतात. पुरातत्त्वशास्त्राशी निगडित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी भारताचा राजकीय इतिहास, वैज्ञानिकदृष्टय़ा पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास, भारताचा धार्मिक इतिहास, भारताचा सामाजिक आणि आर्थिक इतिहास, पुरातत्त्वशास्त्र आणि साहित्य ते अगदी अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणावर चर्चेला आलेल्या बायोआर्किऑलॉजीचाही अभ्यास करू शकतात. भाषाशास्त्र विभागाच्या माध्यमातून भाषाशास्त्र, फोनेटिक्स, भाषाशास्त्राची सैद्धांतिक जडणघडण ते अगदी अत्याधुनिक अशा कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स आणि अप्लाइड लिंग्विस्टिक्सपर्यंत वेगवेगळे विषय विद्यार्थ्यांना अभ्यासता येतात. संस्कृत आणि कोशशास्त्र विभागामध्ये विद्यार्थ्यांना या विषयांच्या मूलभूत ओळखीपासून ते संशोधनापर्यंतच्या टप्प्यावर नेऊन ठेवणारे नानाविध विषय अभ्यासता येतात. याव्यतिरिक्त संस्थेच्या सध्या सुरू असलेल्या कार्याच्या बळावर संग्रहालयशास्त्र, मराठा आणि मध्ययुगीन इतिहास, तसेच भारतीय आणि विदेशी भाषा या तीन विभागांचे भविष्यकालीन कार्य प्रस्तावित करण्यात आले आहे.

सुविधा

केवळ सैद्धांतिक पातळीवरील धडे न देता,  विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांमधून विषयांच्या जवळ नेण्याचे काम ही संस्था करत आहे. संस्थेमध्ये असणारे पुरातत्त्वशास्त्र संग्रहालय मानवी इतिहासाच्या विविध टप्प्यांविषयीची माहिती देते. पुरातन भारतीय सांस्कृतिक इतिहास आणि पुरातत्त्वशास्त्राची माहितीही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरते. संस्थेमध्ये मराठय़ांच्या इतिहासाची माहिती देणारे विशेष संग्रहालय आहे. १८व्या आणि १९व्या शतकातील ऐतिहासिक माहिती या संग्रहालयामधून जाणून घेता येते. मराठय़ांचा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी  महत्त्वाचे संदर्भ ही संस्था उपलब्ध करून देते. भाषाशास्त्र विभागामध्ये असणारी अत्याधुनिक प्रयोगशाळा भाषाशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाफ नेमकेपणाने उलगडवून दाखविते. संस्थेचे ग्रंथालय हे सांस्कृतिक वारशासंदर्भात महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती उपलब्ध करून देणारे एक केंद्र म्हणूनच ओळखले जाते. इथे जवळपास दोन लाखांवर पुस्तके आणि संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. केवळ राज्यातून वा देशभरातूनच नव्हे, तर परदेशांमधूनही अनेक अभ्यासक याचा लाभ घेत असतात. या ग्रंथालयातील सुविधांच्या आधारे आपली संशोधने परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहे आणि जिमखान्याचीही सुविधाही आहेच.

योगेश बोराटे : borateys@gmail.com