21 February 2019

News Flash

विद्यापीठ विश्व : लोकशिक्षणाचे महत्त्व

अमरावतीमधील तपोवन परिसरातील शैक्षणिक संकुलामधून या विद्यापीठाचे प्रशासकीय व शैक्षणिक कार्य चालते.

संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती

संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती

स्थापना

पश्चिम विदर्भामध्ये उच्चशिक्षणाच्या उत्तम संधी मिळाव्यात या उद्देशाने १९८३ सालच्या महाराष्ट्रदिनी (१ मे) तत्कालीन अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली. तत्कालीन नागपूर विद्यापीठातून स्वतंत्र झालेल्या या विद्यापीठाच्या माध्यमातून सध्या विदर्भामधील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम या पाच जिल्ह्य़ांमध्ये उच्चशिक्षणासंबंधी विविध सोयी-सुविधा पुरविल्या जातात. संत गाडगेबाबांनी या परिसरामध्ये लोकशिक्षणासाठी केलेले कार्य पाहता, लोकशिक्षणासाठीच स्थापन झालेल्या या विद्यापीठाला नंतरच्या काळामध्ये ओळख मिळाली ती त्यांच्याच नावाने. ‘संत गाडगेबाबांचे पूर्ण झालेले स्वप्न’ म्हणून विद्यापीठ गीताद्वारे संस्थेचा गौरवोल्लेख होतो. त्यातून एकाच वेळी गाडगेबाबांच्या कार्याची महतीही समजते आणि विद्यापीठाच्या माध्यमातून चालणाऱ्या शैक्षणिक कार्याचे महत्त्वही अधोरेखित होते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांनीही विद्यापीठाच्या विविध विद्यार्थिकेंद्री उपक्रमांची दखल घेतली आहे. तसेच वेगवेगळ्या योजना आणि उपक्रमांद्वारे विद्यापीठाला वेळोवेळी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. ‘नॅक’ने २०१६ मध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थिकेंद्री सोयी-सुविधांचे पुनर्मानांकन करताना विद्यापीठाला ‘ए-ग्रेड’ दिली आहे.

परिसर आणि सोयी-सुविधा

अमरावतीमधील तपोवन परिसरातील शैक्षणिक संकुलामधून या विद्यापीठाचे प्रशासकीय व शैक्षणिक कार्य चालते. जवळपास पावणेपाचशे एकरांचा हिरवागार परिसर हे इथल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरते. या परिसरामध्ये विद्यापीठाने टप्प्याटप्प्याने उच्चशिक्षणासाठी आवश्यक आणि पूरक भौतिक सोयीसुविधांचा विकास केला आहे. त्यामध्ये अगदी अलीकडच्याच काळात विकसित झालेल्या सुसज्ज अशा स्मार्ट क्लासरूम्सचाही समावेश आहे. या परिसरातील वेगवेगळ्या विषयांना वाहिलेले २८ शैक्षणिक विभाग आणि बुलढाणा येथे असलेल्या मॉडेल डिग्री कॉलेजच्या माध्यमातून विद्यापीठांतर्गत पातळीवर शैक्षणिक अभ्यासक्रम चालविले जातात. केवळ पाठय़पुस्तकी अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातून पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी कौशल्ये विकसित करण्यावर विद्यापीठाचा भर राहिला आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, पोस्ट ऑफिस, उपाहारगृह आदी सुविधाही या आवारामध्ये उपलब्ध आहेत. विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच विद्यापीठाचे ग्रंथालय अस्तित्वात आले आहे. सध्या ग्रंथालयाच्या नव्या प्रशस्त इमारतीमधून विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरविल्या जातात. या ग्रंथालयामध्ये देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, संत गाडगेबाबा यांच्याविषयीच्या साहित्याला वाहिलेली विशेष दालने आहेत. विद्यापीठाच्या या परिसरामध्ये जलव्यवस्थापन, जलपुनर्भरण, सौर ऊर्जानिर्मिती आदी पर्यावरणपूरक उपक्रमांसाठीही विद्यापीठाने विशेष प्रयत्न केले आहेत. ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन’चे (आयआयएमसी) महाराष्ट्रामधील एकमेव असे केंद्रही याच विद्यापीठाच्या परिसरातून चालते. तेथील सोयी-सुविधा आणि अभ्यासक्रम हे या विद्यापीठासाठी जमेची बाजू ठरतात.

अभ्यासक्रम

विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागांमधून पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच नव्या वाटेने जाणाऱ्या अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. विद्यापीठाच्या होम सायन्स विभागामध्ये कम्युनिकेशन अ‍ॅण्ड एक्स्टेन्शन, रिसोर्स मॅनेजमेंट आणि फूड सायन्स अ‍ॅण्ड न्युट्रिशन या तीन विषयांमधील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अ‍ॅप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स विभागामध्ये एम. एस्सी अ‍ॅप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालतो. लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फर्मेशन सायन्स विभागामध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवीसोबतच सर्टिफिकेट कोर्स इन लायब्ररी ऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन लायब्ररी नेटवर्किंगसारखे अभ्यासक्रमही चालविले जातात. जिओलॉजी विभागामध्ये पदव्युत्तर पदवीसोबत याच विषयामधील पदव्युत्तर पदविकेचा पर्यायही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हिंदी विभागातून ‘ट्रान्सलेशन हिंदी’ विषयातील पदव्युत्तर पदवी घेण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाच्या केमिकल टेक्नोलॉजी विभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी बी. टेक आणि एम. टेकचे अभ्यासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांव्यतिरिक्त विद्यापीठाच्या इतर सर्वच विभागांमधून विद्यार्थ्यांना नियमित पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकण्याची संधी विद्यापीठाने मिळवून दिली आहे. विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सायन्स विभागामध्ये एम.एस्सी आणि एमसीएच्या अभ्यासक्रमासोबतच डिप्लोमा आणि एम.ई.चे अभ्यासक्रमही विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत.

विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या एकूण प्राध्यापकांपैकी बहुतांश प्राध्यापक हे पीएचडीप्राप्त गटामध्ये मोडतात, ही या विद्यापीठासाठी उजवी बाजू ठरते. विद्यापीठाच्या नोंदणीकृत पेटंट्सची तसेच प्रकाशित झालेल्या पेटंट्सची उल्लेखनीय संख्यासुद्धा विद्यापीठाच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे.

योगेश बोराटे : borateys@gmail.com

First Published on February 13, 2018 1:36 am

Web Title: university world sant gadge baba amravati university