23 January 2021

News Flash

विद्यापीठ विश्व : विज्ञानशिक्षणाचे केंद्र

युनिव्हर्सटिी कॉलेज, लंडन

युनिव्हर्सटिी कॉलेज, लंडन

युनिव्हर्सटिी कॉलेज, लंडन

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

विद्यापीठाची ओळख

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सटिी रँकिंगनुसार (२०१९) जगातले दहाव्या क्रमांकाचे असलेले विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सटिी कॉलेज, लंडन. अठराव्या शतकातील ग्रेट ब्रिटनमधील विचारवंत व समाजसुधारक जेरेमी बेंथहॅम यांच्या विचारांनी प्रवृत्त होऊन या विद्यापीठाची स्थापना १८२६ साली करण्यात आली. तत्कालीन इंग्लंडमध्ये महिलांना शिक्षणासाठी विद्यापीठांमध्ये प्रवेश नाकारला जात असे. इंग्लंडमधील महिलांसाठी यूसीएल विद्यापीठाने सर्वप्रथम शिक्षणाचे द्वार खुले केले. स्थापनेवेळी विद्यापीठाचे नाव ‘लंडन युनिव्हर्सटिी’ असे होते. नंतर ते ‘युनिव्हर्सटिी कॉलेज’ असे करण्यात आले. १९७७ मध्ये विद्यापीठाला सध्याचे नाव बहाल करण्यात आले. यूसीएल विद्यापीठ हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. ‘ let all come who, by merit, deserve the most reward’ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे.

लंडनच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या ब्लूम्सबेरी परिसरात यूसीएल विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस आहे. तसेच शहरात इतर ठिकाणी विद्यापीठाचे प्रमुख शैक्षणिक-संशोधन विभाग, महाविद्यालये आणि शैक्षणिक रुग्णालये इत्यादी गोष्टी पसरलेल्या आहेत. सध्या यूसीएलमध्ये सात हजारांपेक्षाही अधिक तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक अध्यापन-संशोधनाचे कार्य करत आहेत. तर जवळपास चाळीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम अकरा शैक्षणिक-संशोधन विभागांद्वारे चालतात.

अभ्यासक्रम

यूसीएल विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम हे पूर्णवेळ अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम तीन ते चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी कला, विज्ञान, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील बहुतांश विषयांवर आपले लक्ष केंद्रित करतात. यूसीएलमध्ये एकूण अकरा शैक्षणिक विभाग म्हणजे स्कूल्स आहेत. विद्यापीठातील कला आणि मानवता, मेंदूशास्त्र, अभियांत्रिकी शास्त्र, कायदा आणि सुव्यवस्था, जीवशास्त्रे, समाजशास्त्रे, इतिहास, पर्यावरण लोकसंख्याशास्त्र, आरोग्य, शिक्षण, गणित आणि भौतिकशास्त्र अशा विषयांतील ११ प्रमुख विभागांमार्फत विद्यापीठातील सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांची प्रमाणपत्रे, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा

यूसीएल विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या वर्षांसाठी निवासाची सोय, पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पूर्वतयारी अभ्यासक्रम, करिअर सपोर्ट सुविधा, लंडनमधील निवासासाठी आवश्यक मार्गदर्शन, सांस्कृतिक व मनोरंजनाच्या विविध स्रोतांची माहिती यांसारख्या नानाविध सुविधांचा समावेश आहे. विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व पाठय़वृत्तीच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठीची अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय व सर्व प्रयोगशाळा अद्ययावत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून काही अटींवर हेल्थ इन्शुरन्स व वैद्यकीय सुविधा दिल्या जातात. विद्यापीठाचे यूसीएल प्रेस हे स्वतंत्र प्रकाशनगृह आहे. विद्यापीठाच्या यूसीएल बिझनेस, यूसीएल कन्सल्टंट या प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार सेवादेखील सशुल्क उपलब्ध आहेत.

वैशिष्टय़े

यूसीएल विद्यापीठ अभिमानाने सांगते तसे भारत, केनिया, मॉरिशस, घाना, आधुनिक जपान आणि नायजेरिया या देशांचे ‘राष्ट्रपिता’ हे यूसीएलचे माजी विद्यार्थी आहेत. जगाच्या नकाशावर ठसा उमटवणाऱ्या अनेक व्यक्ती या विद्यापीठामध्ये काही काळ शिक्षण घेत होत्या. यामध्ये महात्मा गांधी, रवीन्द्रनाथ टागोर, टेलिफोनचा जनक अलेक्झांडर ग्रॅहम बेल, ओट्टो हॅन, पीटर हिग्ज, फ्रान्सिस क्रीक आदींचा समावेश आहे.

शैक्षणिक उत्कृष्टता आणि पारंपरिक विद्वत्तापूर्ण मूल्ये असल्यामुळे यूसीएल विद्यापीठ हे शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन यासाठी जगभरातील सर्व बुद्धिवंत आणि प्रतिभावंतांसाठी नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. या विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील तत्त्वज्ञ, लेखक, कलाकार आणि शास्त्रज्ञ, निर्माण केले आहेत. आतापर्यंतच्या उपलब्ध सांख्यिकीनुसार विद्यापीठातील एकूण तेहतीस माजी विद्यार्थी वा प्राध्यापक नोबेल पारितोषिक विजेते आहेत.

संकेतस्थळ :

https://www.ucl.ac.uk/

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2019 2:52 am

Web Title: university world university college london
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : निबंध कसा लिहावा?
2 एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा पूर्व परीक्षा चालू घडामोडी
3 प्रश्नवेध यूपीएससी : अठराव्या शतकातील घडामोडी
Just Now!
X