दरवर्षी एप्रिल महिना उजाडल्यानंतर नागरीसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पूर्वपरीक्षेच्या हालचाली सुरू होतात. परंतु यावर्षी आयोगाने पूर्वपरीक्षा जूनमध्ये घेण्याचे घोषित केल्यामुळे तिची तयारी आयोगाची अधिसूचना जारी झाल्यापासून म्हणजेच साधारण फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाली असेल. प्रस्तूत लेखामध्ये आपण नागरीसेवा परीक्षेचा पहिला टप्पा असणाऱ्या पूर्वपरीक्षेला कसे सामोरे जावे याबद्दल चर्चा करणार आहोत. २०११मध्ये यूपीएससीने पूर्वपरीक्षेच्या प्रारूपामध्ये बदल केला. पूर्वपरीक्षेत आता दोन पेपर आहेत. एक ‘सामान्य अध्ययनाचा’ व दुसरा ‘नागरीसेवा कल चाचणी (C-SAT)’.  २०१५पासून हा पेपर पात्रता (Qualifying)  स्वरूपाचा केलेला आहे. त्यामुळे पूर्वपरीक्षेचा ‘कट ऑफ’ हा केवळ पहिल्या सामान्य अध्ययनाच्या गुणांवर अवलंबून असतो. त्यामध्ये C-SAT चे गुण धरले जात नाहीत. या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना किमान ३३ टक्के म्हणजेच ६६ गुण प्राप्त करावे लागतात. दोन्ही पेपर्स प्रत्येकी २०० गुणांचे आहेत व त्यासाठी प्रत्येकी दोन तासांचा कालावधी निर्धारित केला आहे. पहिल्या पेपरमध्ये १०० प्रश्न व दुसऱ्या पेपरमध्ये ८० प्रश्न आहेत. पूर्वपरीक्षा बहुपर्यायी व वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे. प्रश्नपत्रिका इंग्रजी व हिंदी भाषेमध्ये असते. पूर्वपरीक्षा चाळणी स्वरूपाची असून यात प्राप्त केलेले गुण नागरीसेवा परीक्षेच्या अंतिम गुणतालिकेमध्ये गृहीत धरले जात नाहीत. यामुळे आपला उद्देश फक्त हा टप्पा पार करून मुख्य परीक्षेसाठी पात्र होणे एवढाच असला पाहिजे. पूर्वपरीक्षेमध्ये नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking)असून चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी त्या प्रश्नाला असणाऱ्या गुणापकी १/३गुण कपात केले जातात. याचे भान ठेवूनच प्रश्नपत्रिका सोडवणे महत्त्वाचे ठरते.

दरवर्षी साधारण ४ ते ५ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. यामध्ये पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेकरिता पात्र होणाऱ्या उमेदवारांची संख्या त्यावर्षी भरण्यात येणाऱ्या अंदाजित रिक्त पदांच्या १२ ते १३ पट असते. मुख्य परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी उमेदवाराने दोन्ही पेपरमध्ये प्राप्त केलेले गुण एकत्रित करून आयोगाने निश्चित केलेल्या पात्र गुणांवर (qualifying Marks) आधारित असते. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘कट ऑफ’विषयी खूप संभ्रम असतो. खुल्या प्रवर्गासाठी २०१४ मध्ये २०५/२००, २०१५ मध्ये १०७.३४/२०० व  २०१६चा कट ऑफ अजून आयोगाने जाहीर केलेला नसला तरी तो १२०+/२०० असण्याची दाट शक्यता आहे. ‘कट ऑफ’ कमी-जास्त होणे हे परीक्षेच्या काठिण्य पातळीवर अवलंबून असते.

पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम मर्यादित वाटत असला तरी त्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. सामान्य अध्ययनाच्या पहिल्या पेपरमध्ये पुढील अभ्यास घटकांचा समावेश होतो. भारताचा इतिहास, भारताची राष्ट्रीय चळवळ, भारत व जगाचा भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था व कारभारप्रक्रिया, आíथक व सामाजिक विकास, पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता, सामान्य विज्ञान, सामान्य ज्ञान व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी यांचा समावेश होतो. नागरीसेवा कल चाचणी (C-SAT) या पेपरमध्ये आकलन कौशल्य, आंतरवैयक्तिक संभाषण व इतर कौशल्ये, ताíकक विचार व विश्लेषणात्मक क्षमता, निर्णय प्रक्रिया व समस्यांची सोडवणूक, सामान्य बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण आणि इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य यांचा समावेश आहे. यापकी इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य या अभ्यास घटकावर येथून पुढे प्रश्न विचारले जाणार नाहीत, असे आयोगाने यापूर्वीच घोषित केले आहे.

पूर्वपरीक्षेच्या दोन्ही पेपरच्या अभ्यासक्रमाची शैली पूर्णपणे भिन्न असल्याने आपल्या तयारीची रणनीती त्या अनुषंगाने आखली पाहिजे. साधारणत: सामान्य अध्ययनाच्या पेपरद्वारा उमेदवाराचे विविध घटकांचे आकलन, त्यासंबंधी माहितीचे ज्ञान, त्यातील अलीकडील घटना, त्यासंबंधी विविध मतप्रवाह अशा विविध बाबींची चाचणी घेतली जाते. स्वाभाविकच माहिती-ज्ञानाबरोबर स्मरणशक्ती, अचूकता ही कौशल्ये तपासली जातात. दुसऱ्या पेपरमध्ये संकल्पनात्मक, विश्लेषणात्मक व समस्या सोडविण्याच्या कौशल्यावर भर दिलेला आहे.

सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये चांगले गुण मिळविण्यासाठी या परीक्षेचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. याकरिता अभ्यासक्रम पाहिल्यानंतर सर्वप्रथम मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय विश्लेषण करणे आवश्यक आहे. प्रश्नांचे स्वरूप समजल्याशिवाय पुढचे अभ्याससाहित्य कसे वापरावे, नोट्स कशा काढाव्या याविषयी अंदाज येणार नाही. प्रश्नपत्रिका विश्लेषणामुळे परीक्षेची संरचना लक्षात येण्याबरोबरच यूपीएससी दरवर्षी बदलत असलेल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचे आकलन करणे सुलभ जाते. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषणही अभ्यासाबरोबर समांतरपणे चालणारी प्रक्रिया आहे, हे ध्यानात घ्यायला हवे. यूपीएससीचे गतिशील स्वरूप पाहता अभ्यासक्रमातील सर्व घटकांविषयी मूलभूत ज्ञान व संकल्पना अवगत असणे क्रमप्राप्त आहे.

पूर्वपरीक्षेच्या प्रत्यक्ष तयारीला लागल्यानंतर प्रथम काय वाचावे असा प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो. सामान्य अध्ययनाच्या अभ्यासातील मूलभूत घटक किंवा साधन म्हणून ‘एनसीईआरटी’च्या क्रमिक पुस्तकांकडे पाहता येईल. ही पुस्तके अभ्यासक्रमाचे आकलन करून देण्यात व विषयाची ओळख घडवून आणण्यात महत्वाची भूमिका पार पडतात. पूर्वपरीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा पाया (बेस) हीच पुस्तके असतात.

यानंतर मूल्यवर्धनाकरिता इतर संदर्भग्रंथांचा वापर करणे उचित ठरेल. अभ्यासक्रमातील घटकांचा बारकाईने विचार करून विविध विषयावरील प्रमाणित व अद्ययावत संदर्भ साहित्य मिळवावे. या संदर्भग्रंथांच्या जोडीने ‘हिंदू’, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या सारखी दैनिके तसेच ‘बुलेटिन’, ‘योजना’सारखी मासिके महत्त्वपूर्ण ठरतात. विद्यार्थ्यांनी नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, पूर्वपरीक्षेतील प्रश्न वस्तुनिष्ठ असले तरी संकल्पनात्मक, विश्लेषणात्मक व बहुविधानी स्वरूपाचे असतात. त्याचबरोबर यूपीएससी दरवर्षी थोडय़ाफार प्रमाणात प्रश्नांच्या स्वरूपामध्ये बदल करत असल्याने पूर्वपरीक्षेमध्ये घोकंपट्टीला स्थान नाही. यामुळे परिपूर्ण तयारीकरिता आपले ज्ञान नेहमी अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. उपरोक्त बाबींचा विचार करता ‘नियोजनपूर्वक, शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण अभ्यास’ हा यशाचा मार्ग मानता येईल. पुढील लेखामध्ये भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था या विषयाची पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी कशी करावी, याचा विचार करणार आहोत.