विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, १८ जूनला असलेल्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रत्यक्ष पेपर देतानाची रणनीती आज पाहू.

प्रवेशपत्राच्या दोन प्रती सोबत ठेवाच.   त्यावरील फोटो स्पष्ट ओळखू येत नसल्यास आणखी २ पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत ठेवा. प्रवेशपत्रासोबतच आधारकार्ड, मतदान ओळखपत्र इ. यापकी किमान एखादे ओळखपत्र जवळ राखा.  परीक्षेकरता   कमीतकमी दोन  काळ्या शाईचे बॉलपेन जवळ ठेवा. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम उत्तरपत्रिका (OMR Sheets) दिल्या जातात. त्यामध्ये आपला आसन क्रमांक, प्रश्नपत्रिकेची सीरिज, प्रश्नपत्रिकेवर नमूद असणारा संकेतांक, विषयाचा संकेतांक इ. बाबी अचूकपणे नोंदवून संबंधित रकान्याखाली असणारी वर्तुळे काळ्या शाईच्या बॉलपेनने छायांकित करावीत. अन्यथा खाडाखोड होण्याचा किंवा एखादे वर्तुळ छायांकित करायचे राहून जाऊ शकते.

प्रश्नपत्रिकेवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.  प्रश्न वाचताना त्यातील महत्त्वाचे शब्द  व त्यांचा अर्थ समजून घ्या. दिलेले पर्यायही काळजीपूर्वक वाचा. उत्तरपत्रिकेमध्ये  उत्तरे छायांकित करताना, ती योग्य पद्धतीने करतोय ना, याचे भान ठेवा.  अनवधानाने चुकीचे वर्तुळ छायांकित केल्यास ब्लेड, खोडरबर किंवा व्हाइटनर इ. चा वापर करून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे उत्तरपत्रिकेला नुकसान पोहोचण्याचा धोका असतो.

पेपर सोडवताना एखादे वेळेस सलग आठ ते दहा प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवता आली नाहीत तरी त्याचे अजिबात दडपण घेऊ नका. या दडपणाचा कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पण आपले काही प्रश्न ओळीने बरोबर आल्यास अधिक उत्तेजितही होऊ नये. पेपर शक्यतो तीन फेरीमध्ये सोडवा . पहिल्या फेरीमध्ये सोपे प्रश्न, सोबतच जे प्रश्न आपल्याला अजिबात येत नाहीत त्यावर खूण करून ठेवावी, असे प्रश्न सोडविण्यास वेळ घालवू नये. दुसऱ्या फेरीमध्ये ज्या प्रश्नांच्या दोन पर्यायांमध्ये संभ्रमावस्था असते असे प्रश्न ‘इलिमिनेशन तंत्रा’चा वापर करून सोडवण्याचा प्रयत्न करावा. ही फेरी खूप महत्त्वपूर्ण ठरते. कारण पूर्वपरीक्षेमध्ये सामान्य अध्ययन पेपर एकचे गुण गृहीत धरले जातात. याकरिता ‘कॅलक्युलेटेड रिस्क’ घेणे उपयुक्त ठरते. पहिल्या पेपरमध्ये १०० प्रश्नांपकी किती सोडवावेत हे त्या प्रश्नपत्रिकेच्या काठिण्य पातळीवर अवलंबून ठरते. कित्येकजण परीक्षेमध्ये अनावश्यक प्रमाणात प्रश्न सोडवतात व माहिती नसलेल्या प्रश्नांबाबत उगाचच धोका पत्करतात. परिणामी नकारात्मक गुणपद्धतीचे नुकसान सोसावे लागते. पेपर सोडवताना दोन पद्धतींचा वापर करता येतो. एक म्हणजे प्रश्न सोडवल्यावर त्याचे उत्तर ताबडतोब छायांकित करणे आणि दुसरे २० ते २५ प्रश्नांचा एक गट करून ते सोडवून झाल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे आपण छायांकित करू शकतो. दुसऱ्या पद्धतीचा वापर केल्याने परीक्षेदरम्यान  मेंदूला क्षणभराची विश्रांती मिळू शकते.

नागरीसेवा कलचाचणी (सीसॅट) हा पेपर सोडवण्यास प्रारंभ करताना जर प्रश्नपत्रिकेमध्ये ‘निर्णय निर्धारणा’ (Decision Makingचे प्रश्न विचारले असतील तर ते प्रथम सोडवणे श्रेयस्कर ठरते. या पेपरमध्ये उताऱ्यावरील प्रश्नांची (आकलन) संख्या लक्षणीय असते. ज्या उताऱ्याखाली तीन किंवा अधिक प्रश्न विचारले असतील ते सोडवण्यास प्राधान्य द्यावे. ज्या उताऱ्याखाली फक्त एक प्रश्न विचारला असेल तो नंतर सोडवावा. उताऱ्यावरील आकलनासंबंधीचे प्रश्न (Reading Comprehension) सोडवताना संबंधित उताऱ्याखालील प्रश्न आधी वाचून घ्या. नंतर उतारा वाचून  त्याचे आकलन करून  प्रश्न सोडवावेत. या पद्धतीमुळे प्रश्नातील महत्त्वाचे शब्द आपल्या ध्यानात राहतील व उताऱ्यांचे आकलन सोपे होते.अवघड प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार उतारा वाचण्यात वेळ घालवू नये. तो  प्रश्न सोडून द्यावा. पहिल्या फेरीमध्ये सोपे प्रश्न सोडवून घ्यावेत. तसेच जे प्रश्न सोडवण्यास तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागतो, ते सोडून द्यावेत व शेवटी काही वेळ शिल्लक असल्यास या प्रश्नांकडे वळावे. यामुळे आपला   वेळ वाचतो व इतर प्रश्नांना अधिक वेळ देता येतो. हा पेपर पात्रता स्वरूपाचा आहे. त्यामुळे आपल्याला पात्र होण्यासाठी लागणाऱ्या प्रश्नांची गोळाबेरीज झाल्यास उर्वरित प्रश्न सोडवण्याची रिस्क घेऊ शकतो.