25 March 2019

News Flash

यूपीएससीची तयारी : मुलाखतीची व्याप्ती

‘बायोडाटा’च पायाभूत मानून त्यातील प्रत्येक घटकाची तयारी करावी.

केंद्र लोकसेवा आयोगाने यूपीएससी परीक्षेतील पूर्व व मुख्य परीक्षा या टप्प्यांसाठी अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे; परंतु मुलाखतीचा अभ्यासक्रम नमूद केलेला नाही. मुलाखतीसाठी विशिष्ट अभ्यासक्रम नमूद केलेला नसला तरी या टप्प्याची तयारी करण्यासाठी पुढील घटक लक्षात घेऊन तयारी करता येते. वस्तुत: मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना उमेदवाराला आपली संपूर्ण व्यक्तिगत माहिती नमूद करावी लागते. या अर्जास ‘डिटेल्ड अ‍ॅप्लिकेशन फॉर्म’ (DAF) असे म्हणतात. हा ‘बायोडाटा’च पायाभूत मानून त्यातील प्रत्येक घटकाची तयारी करावी.

उमेदवाराच्या व्यक्तिगत माहितीतील पहिला घटक म्हणजे नाव होय. यात उमेदवाराचे स्वत:चे नाव, आई-वडिलांचे नाव आणि आडनावासंबंधी माहिती संकलित करावी. यातील कोणत्याही नावाचा विशिष्ट अर्थ असल्यास तो लक्षात घ्यावा. यातील कोणत्याही नावाची ऐतिहासिक पाश्र्वभूमी व काही एक स्रोत असल्यास त्याची तयारी करावी. तसेच आपल्या नावाची एखादी व्यक्ती इतर क्षेत्रात सुप्रसिद्ध असल्यास तिच्याविषयी माहिती संकलित करावी. आई-वडिलांच्या व्यवसाय-नोकरीसंदर्भात देखील तयारी करणे अत्यावश्यक ठरते. त्यांचे क्षेत्र, विभाग, कामाचे-जबाबदाऱ्यांचे स्वरूप, त्यासंदर्भातील तथ्यात्मक माहिती, समस्या-आव्हाने यापासून ते विविध उपायांपर्यंतचे विविध आयाम लक्षात घ्यावेत.

दुसरी बाब म्हणजे विद्यार्थ्यांचे मूळ ठिकाण, सध्याचे ठिकाण, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य असे वर्गीकरण करावे. यातील प्रत्येक घटकाचा थोडक्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राजकारण, अर्थकारण, इतर काही महत्त्वाची वैशिष्टय़े यासंबंधी तयारी करणे अत्यावश्यक ठरते. त्यातही आपला जिल्हा, विभाग आणि राज्य याविषयी लोकसंख्यात्मक माहिती, आíथक स्थितीविषयक आकडेवारी व वैशिष्टय़े, सामाजिक-आíथक विकासविषयक स्थिती आणि इतर काही खास वेगळेपण या अनुषंगाने एक प्रकारचे प्रोफाइलच तयार करावे. आपल्या भागातील महत्त्वाच्या समस्या व आव्हाने, त्याविषयक शासकीय, बिगरशासकीय उपाय याव्यतिरिक्त काही आवश्यक उपायांचा सविस्तर विचार केलेला असावा.

शैक्षणिक पाश्र्वभूमी हा तिसरा महत्त्वपूर्ण घटक आहे. यात अगदी शालेय शिक्षणापासून, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन आणि पदवी-पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची माहिती निर्णायक ठरते. विशेषत: पदवी शिक्षण आणि त्यातील मुख्य विषय ही बाब महत्त्वाची मानावी. ज्या शाखेत आणि विषयात पदवी संपादन केली आहे त्यातील पायाभूत संकल्पना, विचार आणि उपायोजनात्मक भाग, अलीकडील शोध व घडामोडी यावर लक्ष केंद्रित करावे. शिक्षण संस्थांची नावे आणि ठिकाणे यासंबंधीदेखील प्रश्न विचारले जाऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यासंबंधीही माहिती प्राप्त करावी.

उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पलू अधोरेखित करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘अभ्यासबाह्य बाबीतील रस’ होय. यात विद्यार्थ्यांचा छंद, क्रीडा प्रकारातील रस, विविध स्पर्धात प्राप्त केलेली पारितोषिके, बक्षिसे, शालेय-महाविद्यालयीन जीवनात भूषविलेली पदे व जबाबदाऱ्या यापासून ते एखाद्या सामाजिक कार्यातील सहभाग अशा अभ्यासबाह्य घटकांचा समावेश होतो. वास्तविक पाहता अभ्यासबाह्य घटक हा त्या त्या उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. त्यामुळे मुलाखत मंडळदेखील बहुतांश वेळा या घटकावरच भर देत असते. उमेदवाराने खरेच या बाबी केल्या आहेत का? कशा केल्या आहेत? उमेदवार त्यातून काय शिकला आहे? त्याबाबतीत तो किती प्रामाणिक, जिज्ञासू आहे? अशा महत्त्वपूर्ण बाबींची चाचणीच जणू केली जाते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने या घटकाची प्रभावी तयारी करणे महत्त्वाचे ठरते.

उमेदवाराने मुख्य परीक्षेसाठी निवडलेला वैकल्पिक विषय हा देखील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. संबंधित विषय का निवडला? संबंधित विषयाचा नागरी सेवेत कसा उपयोग होईल? यासारख्या सामान्य प्रश्नांपासून वैकल्पिक विषयातील मूलभूत संकल्पना, विचार, चालू घडामोडी, उपयोजनात्मक भाग यावर विविध प्रश्न विचारले जातात.

आíथक घडामोडी आणि अर्थव्यवस्था हा स्वतंत्र घटक मानून त्यातील उत्पन्न, करविषयक पायाभूत संकल्पनांपासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेसमोरील कळीचे मुद्दे, त्याविषयक विविध विश्लेषणे, धोरणात्मक उपाय इथपर्यंत विविधांगी तयारी करावी, आíथक मुद्दय़ांची तयारी करताना समर्पक आकडेवारी हाताशी असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

आपल्या भोवताली घडणाऱ्या चालू घडामोडींविषयीही अनेक प्रश्न विचारले जातात. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळी आणि सामाजिक, राजकीय, आíथक, सांस्कृतिक, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा अशी विभागणी करून त्यासंबंधी महत्त्वाच्या घडामोडीची सविस्तर तयारी करावी. चच्रेतील मुद्दय़ांचे स्वरूप, कारणे, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, संभाव्य उपाय इ. आयामांसंबंधी तयारी करावी. संबंधित मुद्दय़ांविषयी जी प्रचलित मतमतांतरे आहेत त्याची माहिती उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या, कळीच्या मुद्दय़ांविषयी स्वतचे मत असणे महत्त्वाचे ठरते.

अशारीतीने उपरोक्त विविध घटकांची सविस्तर माहिती संकलित करून त्यावर आधारित अधिकाधिक ‘मॉक इंटरव्ह्य़ूज’चा सराव केल्यास अधिक गुण मिळवता येतील.

First Published on March 8, 2018 1:27 am

Web Title: upsc exam interview preparation