27 January 2021

News Flash

यूपीएससीची तयारी : मुख्य परीक्षा विशिष्ट क्षमतांची गरज

थोडक्यात कोणत्याही बाबीचे वाचन सखोल, व्यापक आणि चिकित्सक दृष्टिकोनातून केलेले असावे.

तुकाराम जाधव

विद्यार्थी मित्रहो, यूपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी सर्वसाधारण क्षमतांबरोबर काही विशिष्ट क्षमतांचा विकास अत्यावश्यक ठरतो. या लेखात त्यातील प्रमुख क्षमतांचा विचार करणार आहोत. व्यापक अर्थाने विचार केल्यास विशिष्ट अभ्यासक्रमावर आधारित कोणत्याही स्पर्धात्मक अथवा बिगर स्पर्धात्मक परीक्षेसाठी पायाभूत म्हणून आवश्यक ठरणारी वाचन व आकलनक्षमता यूपीएससी परीक्षेतही कळीची ठरते. तसे पाहिल्यास कोणत्याही साक्षर व्यक्तीस आपापल्या भाषेतील साहित्य वाचता येतेच. परंतु यूपीएससीसारख्या तीव्र स्पर्धात्मक आणि गतिशील स्वरूपाच्या परीक्षेत संदर्भ साहित्यातील लेखनाचा शब्दार्थाच्या पलीकडे जाऊन त्यामागील व्यापक संदर्भ, त्याचा मथितार्थ व गर्भितार्थ, त्यातून पुढे येणारे संकेत, प्रतीकात्मक अर्थ अशा विभिन्न अंगांनी वाचन-आकलनाची मर्मग्राही पद्धत विकसित करावी लागते. म्हणजे लेखनातून प्रतीत होणारे विविध अर्थ जाणून घेण्याची सवयच अंगी बाणवावी लागते.

थोडक्यात कोणत्याही बाबीचे वाचन सखोल, व्यापक आणि चिकित्सक दृष्टिकोनातून केलेले असावे. अशा व्यापक दृष्टीवर आधारित वाचन सवयीमुळे आपल्या आकलनशक्तीचा अपेक्षित विस्तार साधता येतो.

उपरोक्त चíचलेल्या वाचन-आकलन प्रक्रियेशी अभिन्नपणे जोडलेली एक महत्त्वाची क्षमता म्हणजे विचारक्षमता होय. यूपीएससी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका समकालीन आणि गतिशील स्वरूपाचा असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीची कसोटी पाहणाऱ्याच ठरतात. किंबहुना अभ्यासलेल्या घटकावर किती विचार केलेला आहे आणि त्याची चिकित्सा करण्याची क्षमता पुरेशी विकसित झाली आहे किंवा नाही ही बाब पूर्वपरीक्षेपासून मुलाखतीपर्यंतच्या टप्प्यात निर्णायक ठरते. त्यामुळे आपल्या वाचनात येणाऱ्या प्रत्येक संदर्भाचा निष्क्रियपणे स्वीकार न करता त्यातील संकल्पना, माहिती, विश्लेषण याचा कारण-परिणाम संबंध पाहावा आणि ‘एखादी बाब अशीच का आहे’ असा चिकित्सक विचार करावा.

प्रभावी लेखनक्षमता (सादरीकरण/लेखी अभिव्यक्ती) ही आणखी एक महत्त्वाची क्षमता होय. यूपीएससी परीक्षेतील मुख्य परीक्षेच्या टप्प्यात या लेखनक्षमतेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण एकूण १७५० गुणांची मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची असून त्यात प्राप्त होणारे गुण विद्यार्थ्यांच्या यशात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मुख्य परीक्षेत आकलनक्षमता पायाभूत ठरते, यात शंका नाही. परंतु विविध संदर्भाद्वारे विकसित केलेले हे आकलन लेखी उत्तराच्या स्वरूपात सादर करण्याचे कौशल्यही तेवढेच, किंबहुना त्यापेक्षाही महत्त्वाचे ठरते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लेखनक्षमतेचा आशयात्मक आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही अंगांनी विचार करावा लागतो. वरील भागात अधोरेखित केलेली वाचन-आकलन-विचारक्षमता लेखनातील आशयात्मक अंगाची काळजी घेईलच. परंतु अभिव्यक्ती म्हणजेच लेखी सादरीकरणाच्या कौशल्याचा स्वतंत्रपणे विचार करणे महत्त्वाचे ठरते. यात व्याकरणदृष्टय़ा योग्य वाक्यरचना, विरामचिन्हांचा अपेक्षित वापर, समर्पक शब्दप्रयोग व पारिभाषिक शब्द, साधी परंतु अर्थवाही भाषा, मांडणीतील सलगता आणि सुसंगती, लेखनातील सुसंघटितपणा, समर्पक पद्धतीने आलेख, आकृत्यांचा वापर, महत्त्वाच्या बाबींना अधोरेखनासारख्या साधनांद्वारे दिलेली दृश्यात्मकता आणि मांडणीतील नेमकेपणा या महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. अलंकारिक आणि क्लिष्ट भाषा म्हणजेच प्रभावी भाषा असा बऱ्याच विद्यार्थ्यांचा समज असतो. परंतु साधी, सुलभ परंतु अर्थवाही भाषा हे तत्त्व यूपीएससीच्या बाबतीतही लागू होते हे लक्षात घ्यावे. अर्थात या कौशल्याचा विकास साधण्यासाठी भरपूर वाचन आणि लेखनाचा नियमित सराव जरुरी ठरतो. नियमित आणि सातत्यपूर्ण लेखन सरावाद्वारेच मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे निर्धारित शब्दमर्यादेत प्रभावीपणे उत्तर लिहिता येईल.

यूपीएससी परीक्षेतील मुलाखत म्हणजेच व्यक्तिमत्त्व चाचणीच्या बाबतीत महत्त्वाची ठरणारी क्षमता म्हणजे संवादकौशल्य होय. मुलाखतीसाठी आवश्यक संवादकौशल्याचाही आशय आणि तोंडी अभिव्यक्ती अशा मुख्य दोन अंगांनी विचार करता येतो. यातील अभिव्यक्ती या दुसऱ्या आयामात आपली देहबोली; भाषा; आवाजाची पातळी, त्यातील चढउतार; योग्य श्रवणक्षमता व बोलण्यातील नेमकेपणा, इ. प्रमुख बाबींचा समावेश होतो. अर्थात बोलण्याच्या सातत्यपूर्ण सरावाद्वारेच प्रभावी अभिव्यक्ती क्षमता विकसित करता येऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2018 12:58 am

Web Title: upsc main exam 2
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : कृषी घटक (एकत्रित प्रश्न विश्लेषण)
2 दमदार कारकीर्द घडवा!
3 नोकरीची संधी
Just Now!
X