आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन
आजच्या प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन या नमूद घटकाचा सर्वागीण आढावा घेणार आहोत. भारत हा भौगोलिकदृष्टय़ा खूप मोठा देश आहे आणि प्रत्येक वर्षी भारताला विविध प्रकारच्या आपत्तींना सामोरे जावे लागते. वादळे, महापूर, भूकंप, दुष्काळ, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी, सुनामी यामध्ये जागतिक हवामान बदलामुळे उत्तरोत्तर अधिकच वाढ होत आहे आणि याच्या जोडीला मानवनिर्मित आपत्तीचाही धोका आहे. आण्विक ऊर्जा केंद्रे, रासायनिक उद्योग यांमध्ये होणारे अपघात आणि यामुळे निर्माण होणारी आपत्तीसदृश परिस्थिती आणि याचा पर्यावरण आणि मानवी जीवनावर होणारा परिणाम गंभीर स्वरूपाचा असतो. सध्या जगातील जवळपास सर्व देशांमध्ये आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन हा महत्त्वाचा धोरणात्मक भाग बनविण्यात आलेला आहे. भारत सरकारनेही आपत्तींना यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक पातळीवर विविध प्रकारच्या सरकारी यंत्रणा कार्यरत केलेल्या आहेत. तसेच याच्या जोडीला कायदेही करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे देशातील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षमपणे राबविता येऊ शकते. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यासाठी सरकारकडून विशेष कार्यक्रम राबविले जातात.
आधुनिक तंत्रज्ञामुळे जगभरातील जवळपास सर्व देशांमध्ये विकासात्मक प्रक्रिया अधिक वेगवान बनलेली आहे. पण यामुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. उदा. अमर्याद जंगलतोड आणि यामुळे होणारा जमिनीचा ऱ्हास, औद्योगिक क्षेत्रामधून उत्सर्जति केले जाणरे हरितगृह वायू, ज्यामुळे झालेली जागतिक तापमानवाढ आणि याचे जागतिक पर्यावरण आणि हवामानावर झालेले दुष्परिणाम, वाढत चाललेली लोकसंख्या, औद्योगिक क्षेत्राची वाढ, शहरीकरण इत्यादीमुळे नसíगक साधनसंपत्तीचा वेगाने ऱ्हास होत आहे आणि याच्या परिणामस्वरूप जगभर विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. साधारणत: नसíगक आणि मानवनिर्मित असे आपत्तीचे वर्गीकरण केले जाते. सद्य:स्थितीमध्ये जगभर आपत्तींमध्ये वाढ झालेली आहे आणि याला मानवनिर्मित घटक सर्वाधिक जबाबदार आहेत असा एक मतप्रवाह आहे. जर आपत्तीची वारंवारता कमी करावयाची असेल तर शाश्वत विकासाच्या प्रक्रियेला अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावर आणि भारतातही यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. आतापर्यंत झालेल्या तीन मुख्य परीक्षांमध्ये या घटकावर प्रत्येक वर्षी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हे प्रश्न खालीलप्रमाणे होते-
२०१३ मुख्य परीक्षा
आपत्तीपूर्व व्यवस्थापनेसाठी असुरक्षितता आणि आपत्तीपूर्व व्यवस्थापन जोखीम मूल्यमापन किती महत्त्वाचे आहे? प्रशासक या नात्याने तुम्ही आपत्ती व्यवस्थापन पद्धतीमधील कोणत्या मुख्य क्षेत्रावर लक्ष द्याल?
२०१४ मुख्य परीक्षा
दुष्काळाला त्याचा स्थानिक विस्तार (Spaital’), ऐहिक कालावधी (Temporal), संथ सुरुवात आणि पीडित वर्गावरील स्थायी स्वरूपातील प्रभाव या दृष्टीने आपत्ती म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDM) च्या सप्टेंबर २०१० च्या मार्गदर्शक सूचना ध्यानात घेऊन, भारतामध्ये एल-निनो (El-Nino) आणि ला-निनो (La-Nino) च्या संभाव्य दुष्परिणामांना सामोरे जाण्यासाठीच्या यंत्रणा सज्जतेची चर्चा करा.
२०१५ मुख्य परीक्षा
भारतीय उपखंडामध्ये भूकंपाच्या वारंवारतामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. असे असूनसुद्धा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठीच्या दृष्टीने भारतातील तयारीमध्ये लक्षणीय उणिवा दिसून येतात. विविध पलूंची चर्चा करा.
उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नाची आपण थोडक्यात उकल करून घेऊ या. या घटकावर प्रश्न विचारताना संकल्पनात्मक पलूंचा अधिक विचार केलेला दिसून येतो आणि प्रश्नाचे स्वरूप सामान्यत: विश्लेषणात्मक पद्धतीचे आहे. या प्रश्नाची योग्य उकल करण्यासाठी सर्वप्रथम या घटकाची मूलभूत माहिती असणे महत्त्वाचे आहे. आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीपूर्व व्यवस्थापन, आपत्तीप्रभाव कमी करण्याच्या उपाययोजना, भूकंप, दुष्काळ व एल-निनो
(El-Nino) आणि ला-निनो (La-Nino) या हवामानविषयक संकल्पनांची योग्य माहिती असल्याशिवाय प्रश्नाचा नेमका कल ओळखता येऊ शकत नाही. हा घटक व्यवस्थित समजून घेण्यासाठी पर्यावरण आणि हवामान या विषयाशी संबंधित संकल्पनांची माहिती असणे गरजेचे आहे हे वरील प्रश्नावरून दिसून येते. तसेच २०१५ मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच या योजनांमध्ये असणाऱ्या उणिवा यांसारख्या धोरणात्मक पद्धतीवर भाष्य करणारा आहे. यासारख्या प्रश्नाचे योग्य आकलन करण्यासाठी सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, आपत्ती निवारणासाठीचे प्रयत्न, आपत्तीची योग्य हाताळणी करण्यासाठीची तयारी, इत्यादी बाबींचा र्सवकष पद्धतीने विचार केल्याशिवाय समर्पक उत्तर लिहिता येत नाही. म्हणून हा घटक मूलभूत ज्ञानासह चालू घडामोडींचा आधार घेऊन अभ्यासावा लागणार आहे, हे उपरोक्त प्रश्नावरून समजते.
या घटकासाठी नेमके कोणते संदर्भ वापरावेत याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. या घटकासाठी एन.सी.ई.आर.टी. अथवा सी.बी.एस.ई. बोर्डाची शालेय पुस्तके सर्वप्रथम वाचावीत, ज्यामधून या घटकाची मूलभूत माहिती आपणाला मिळते. बाजारात या घटकासाठी अनेक गाइडस् स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत. यातील कोणतेही पुस्तक जे सोप्या पद्धतीने या घटकाची माहिती देईल ते वाचावे. उदाहरणार्थ, आर. गोपालन लिखित ‘Environmental’ हे पुस्तक. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन संबंधित प्रकरण आहे. हा घटक पर्यावरण आणि हवामान याच्याशी अधिक संबंधित आहे आणि यातील महत्त्वाच्या संकल्पना समजून घेण्यासाठी पी. डी. शर्मा लिखित ‘Ecology’ पुस्तक अभ्यासावे. या घटकाचा चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी दैनिके, योजना, कुरुक्षेत्र, डाऊन टू अर्थ आणि वर्ल्ड फोकस ही मासिके, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वेबसाइट्सचा वापर करावा. यापुढील लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील ‘सुरक्षा’ या घटकाची चर्चा करणार आहोत.
श्रीकांत जाधव
(लेखांक – ११)