इंग्रजी उताऱ्यांच्या आकलनाकरता विषयाच्या आकलनाबरोबरच भाषेच्या अंगानेही विचार करायला हवा. इंग्रजी उताऱ्यांमध्ये अनेक वेळा एखाद्या वाक्प्रचाराचा, म्हणीचा किंवा शब्दाचा अर्थ विचारला जावू शकतो. अथवा असा अर्थ सरळपणे विचारला नसला तरीदेखील प्रश्नाचा रोख एखाद्या ठरावीक शब्दाच्या अर्थावर असू शकतो. म्हणूनच इंग्रजी शब्दसंग्रह वाढविणे या घटकासाठी अतिशय गरजेचे आहे. मात्र याचा अर्थ उताऱ्यातील सर्वच इंग्रजी शब्द माहीत असल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही असा होत नाही. अनेक वेळा अवघड शब्दांचे अर्थ संदर्भानुसार लावता येतात अथवा किमान साधारण जवळ जाणारा अर्थ विचारात घेतला जावू शकतो. हे कौशल्य सरावाने व किमान शब्दसंग्रहाच्या आधारे विकसित करता येते.

इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे. सीसॅटमधील यश हे केवळ इंग्रजी भाषेच्या उत्तम आकलनावरच अवलंबून आहे असे समजण्याची अजिबात गरज नाही. मात्र इंग्रजी भाषेच्या प्रभुत्वाचा फायदा होतो. िहदी भाषांतरांची सातत्याने मदत होतेच असे नाही. इंग्रजीमध्ये येणाऱ्या उताऱ्यांबाबतीत लक्षात घ्यायची अजून एक गोष्ट म्हणजे, या ठिकाणी इंग्रजी संभाषण कौशल्याची अथवा लेखन कौशल्याची कोणतीही गरज नाही. म्हणूनच इंग्रजी व्याकरणाचे अवास्तव भय बाळगण्याचे मुळीच कारण नाही. उमेदवारास केवळ इंग्रजी वाचनामधून अर्थाचे आकलन होणे आवश्यक आहे. म्हणूनच सीसॅटच्या नवीन अभ्यासक्रमाचा समावेश झाल्यामुळे, सीसॅट म्हणजेच इंग्रजी असा समज करून घेऊन, सरसरकट इंग्रजी सुधारण्यामध्ये आपला सर्व वेळ व शक्ती खर्च करू नये. आजच्या स्पध्रेच्या युगात इंग्रजीचे ज्ञान असणे व्यक्तिमत्त्वासाठी निश्चितच पूरक आहे. परंतु इंग्रजीचे ज्ञान, विशेषत व्याकरणाचे आणि लेखन व संभाषण याकरिता आवश्यक अशा ज्ञानाची पूर्वपरीक्षेच्या टप्प्यावर विशेष गरज नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांनी आपले लक्ष इंग्रजी या एकमेव घटकामुळे विचलित न होऊ देता, अतिशय वस्तुनिष्ठपणे ठरावीक कौशल्ये विकसित करण्यावर केंद्रित करावे.

इंग्रजी उतारे हा या स्पर्धापरीक्षेचा एक अनिवार्य भाग असला तरीदेखील याबाबतीत पुढील काही गोष्टींवर आपण विचार करणे गरजेचे आहे. जसे की, मराठी मातृभाषा असणाऱ्या व्यक्तीला मराठी उताऱ्यांवरील १००% प्रश्नांची उत्तरे बरोबर देता येतीलच असे नाही. त्याचप्रमाणे, शहरी किंवा निमशहरी भागात शिकलेल्या विद्यार्थ्यांला इंग्रजी उताऱ्यांवरील सर्वच प्रश्नांची उत्तरे बरोबर देता येतील असे नाही. उताऱ्यांवरील प्रश्नांमध्ये अचूकता येण्याकरता शहरी-ग्रामीण अशा सर्वच विद्यार्थ्यांना या कौशल्यांबाबतीत सरावाची व त्यातून पारंगत होण्याची गरज असते. म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे सीसॅटमधील इंग्रजी आकलनाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून अतिशय वस्तुनिष्ठपणे इंग्रजी वाचन, शब्दसंग्रह सुधारणा व आकलन या तीनच गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

इंग्रजी शब्दसंग्रह आणि आकलन

शब्दांआधी येणाऱ्या प्रत्ययांवरून अर्थाचा अंदाज लावण्याविषयी याआधीच माहिती दिली आहे. त्याच्याच जोडीला मूळ शब्द (Roots) व उगमस्रोत (Origins) यांच्यामध्ये रस घेतल्यास इंग्रजी शब्दांचा ताण न वाटता उलट ते लक्षात ठेवणे ही एक सुकर प्रक्रिया होऊ शकते. जसे की,cise  (कापणे) cide  (मारणे) या मूळ शब्दांचा विचार केल्यास अनेक शब्द लक्षात ठेवणे सोपे जाते. उदा. incision, scissor, genocide, pesticide, insecticide, scission, incise, incisor.  याचप्रमाणे – aster किंवा – astro म्हणजे ‘ताऱ्यांशी संबंधित’ हे लक्षात घेतल्यानंतर asterisk, astrology, astrophysics, astronaut, asterism या सर्व शब्दांचा अर्थ कळणे सोपे होऊन जाते.

अशाच प्रकारे उगमस्रोतांचा (Origins) विचार केल्यास एकदा अभ्यासलेले शब्द कायम लक्षात राहतात. याकरिता सर्वप्रथम इंग्रजी-इंग्रजी असा शब्दकोश वापरण्याचा सराव हवा व असा शब्दकोश वापरणे अवघड असते हे मनातून काढून टाकायला हवे. इंग्रजी शब्द जरी अवघड असला तरीदेखील त्याचा अर्थ उलगडून सांगण्यासाठी ज्या इंग्रजी शब्दांचा वापर केलेला असतो ते सापेक्षत: खूपच सोपे असतात. किंबहुना अशा प्रकारे सोप्या शब्दांमध्ये अर्थ दिलेला असणे हेच चांगल्या शब्दकोशाचे लक्षण आहे. म्हणूनच इंग्रजी-इंग्रजी शब्दकोशाचा जरूर वापर करावा. नावाजलेल्या शब्दाकोशांमध्ये ज्या ज्या शब्दांच्या उगमस्रोताची माहिती असेल त्या त्या शब्दांच्या खाली तो Origins या सदराखाली, शब्दाच्या अर्थाच्या सर्वात शेवटी दिलेला असतो. जसे की,  juggernaut या अतिशय अवघड वाटणाऱ्या शब्दाखालील उगमस्रोत पाहिल्यास आपण तो शब्द व त्याचा अर्थ कधीही विसरणार नाही.  Juggernaut म्हणजे ‘ज्याला थांबवू शकत नाही असे प्रचंड अथवा भव्य काहीतरी’. हा शब्द ब्रिटिशांनी भारतातून इंग्रजीमध्ये नेला. ओडिशामध्ये होणाऱ्या पुरीच्या रथयात्रेतील रथाने एकदा वेग घेतला की, त्याला थांबवणे अशक्य होवून जाते. हे दृश्य ब्रिटिशांनी जेव्हा बघितले तेव्हाच आजूबाजूचे सर्व भारतीय ‘जग्गनाथ, जग्गनाथ’ असा जयघोष करीत होते. याच जग्गनाथचे त्याच्या रथाच्या वेगावरून व भव्यतेवरून पुढे Juggernaut झाले.

अशा प्रकारे अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून इंग्रजीकडे एक प्रकारचे कौशल्य म्हणून त्याचा विचार केल्यास त्यातील ताण निघून जातो. मराठीतून उत्तमरीत्या आपले म्हणणे मांडता येणे हेदेखील एक कौशल्यच आहे. मराठी बोलता येणाऱ्या प्रत्येकालाच हे कौशल्य अवगत असते असे नाही. इंग्रजीचासुद्धा याचप्रमाणे विचार केल्यास आपल्याला असे लक्षात येते की, इंग्रजी उत्तम येणे अथवा इंग्रजीचे ज्ञान असणे ही खूपच व्यापक गोष्ट आहे. ज्यामध्ये वाचन-आकलन, लेखन, संभाषण अशा सर्वाचा समावेश होतो. परंतु पूर्वपरीक्षेतील आवाका हा फक्त वाचन-आकलन यापुरताच मर्यादित आहे हे ध्यानात घेतल्यानंतर केवळ तीच कौशल्ये विकसित करण्यावर भर देता येणे शक्य आहे. तसेच इतर कौशल्यांची या टप्प्यांवर तितक्या जास्त प्रमाणावर गरज नाही हे पक्के लक्षात आल्यानंतर ‘इंग्रजी’मुळे येणारा ताण बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो.

शब्दसंग्रह सुधारण्याच्या व पर्यायाने आकलनात सुधारणा घडवून आणण्यासाठी इतर अनेक मार्गाचा उपयोग करता येतो. पुढील लेखात आपण शब्दसंग्रह तसेच वाचनाचा वेग यावर अधिक चर्चा करणार आहोत.

अपर्णा दीक्षित