सुश्रुत रवीश

स्पर्धा परीक्षांच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आयोगाची ठरावीक विषयाला धरून काय मागणी आहे, हे नीट समजून घेणे. ही मागणी विषयाबद्दल तसेच परीक्षा पद्धतीबद्दल असू शकते. ठरावीक विषयाची परीक्षा घेण्यामागचा हेतू, विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा साचा, या सर्वाचा नागरी सेवांशी असणारा संबंध हे लक्षात घेतल्यास विषयाची तयारी करणे सोपे जाऊ शकते. हे मुख्य परीक्षेतील सर्वच विषयांसाठी लागू आहे. अर्थातच एथिक्सच्या पेपरसाठीदेखील अशा विश्लेषणाची खूप मदत होते.

याचाच एक भाग म्हणजे, आयोगाने मागील वर्षांत विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेणे, तसेच एकंदर प्रश्नपत्रिकेच्या बदलत्या स्वरूपाचे विश्लेषण करत राहणे. यामुळे अनेक प्रश्नांचा खुलासा होतो – (१) कोणत्या संकल्पनांवर प्रश्न विचारताना भर दिला गेला आहे? (२) प्रश्न विचारत असताना, चालू घडामोडी या संकल्पनांशी कशा जोडल्या जातात? (३) पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न, प्रकार आणि घटक कोणते? (४) तीन तासांत कराव्या लागणाऱ्या लिखाणाचा एकूण आवाका किती? (५) येणाऱ्या प्रत्येक वर्षांबरोबर पेपरचे बदलत जाणारे काठिण्य.वरील बाबींचा आढावा घेतल्याशिवाय तयारीला नेमकी दिशा मिळत नाही. एथिक्ससारखा विषय तुलनेने नवीन असल्याने प्रश्नांचा विषय आणि स्वरूप जरी लक्षात आले, तरीही नेमके लिखाण कसे करायचे याबद्दल उमेदवारांच्या मनात अनेकदा संभ्रम दिसून येतो. तसेच इतर सामान्य अध्ययनांच्या पेपरच्या तुलनेत एथिक्स हा घटक नावीन्यपूर्ण असल्याने, त्याचे वेगळे दडपणही बघायला मिळते. या सगळ्याचा सामना करता येण्यासाठी, वर म्हटल्याप्रमाणे प्रामाणिकपणे विषयाचा आवाका आणि मागणी समजून घेणे आवश्यक आहे.

पुढील लेखापासून आपण मूळ विषयाकडे वळणार आहोत.