वसुंधरा भोपळे – द.वा आंबुलकर

आज आपण कर सहायक गट क परीक्षेच्या पेपर २ बद्दल बोलणार आहोत. या पेपरसाठी परीक्षेला जाता जाता उजळणी कशी करावी आणि त्यासाठी कोणते अभ्यासस्रोत वापरावेत याचा आढावा घेऊ या.

अभ्यासक्रम व अभ्यासस्रोत

१. नागरिकशास्त्र – राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन)

या विभागांतर्गत ग्रामप्रशासन आणि राज्यव्यवस्थापन यामधील मूलभूत संकल्पनांचे आकलन, पंचायत राजव्यवस्था, त्यासंदर्भातील समित्या; त्यांच्या शिफारशी; सदस्य; स्थापना वर्ष; कायदे; या स्तरावर कार्यरत अधिकारी – त्यांचे अधिकार व कर्तव्ये; यासंदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी या घटकांवर विशेष भर द्यावा.

अभ्यासस्रोत – महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतची नागरिकशास्त्र आणि अकरावी, बारावीची राज्यशास्त्राची पुस्तके यासाठी उपयोगी ठरतील.

२. भारतीय राज्यघटना – या विभागात घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे / ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ – अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व विधी समित्या या विभागांतर्गत भारतीय राज्यघटनेबद्दलची निरीक्षणे, केंद्र-राज्य संबंध आणि त्यासंबंधित तरतुदी, नीती आयोग आणि त्याचे महत्त्व; कार्य; संरचना, राष्ट्रपती; पंतप्रधान; मुख्यमंत्री; राज्यपाल ही पदे व या पदांची कार्ये, पात्रता, विशेषाधिकार, लोकसभा; राज्यसभा; तसेच विधानसभा; विधान परिषद यांची कार्यपद्धती, लोकलेखा समिती; तिची निर्मिती; कार्य, संविधान दुरुस्तीविषयक तरतुदी आणि त्यांचे विषय, भारताचा महाधिवक्ता; त्याची कार्ये; अधिकार व त्यासंदर्भातील तरतुदी, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, त्यासंदर्भात संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि तिचे पडसाद, या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर विशेष भर द्यावा.

अभ्यासस्रोत – सहावी ते दहावीपर्यंतची नागरिकशास्त्राची महाराष्ट्र बोर्डाची पाठय़पुस्तके अकरावी व बारावीची राज्यशास्त्राची पुस्तके, एम. लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी हे पुस्तक.

३. पंचवार्षिक योजना – या विभागांतर्गत नियोजनाची प्रक्रिया, प्रकार, भारताच्या आतापर्यंतच्या पंचवार्षिक योजनांचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल आणि त्या संदर्भातील पंचवार्षिक योजनांमधील तरतुदी या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर विशेष भर द्यावा.

अभ्यासस्रोत – वरील घटकासाठी भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी तसेच स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र भाग १ हे डॉ. किरण देसले यांचे पुस्तक अभ्यासावे.

४.  चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील 

हा घटक अभ्यासताना परीक्षेच्या अगोदर किमान एक वर्ष अगोदर घडलेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी विचारात घ्याव्या लागतात. यामध्ये विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था भारतीय राजकारण, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निकाल, नवीन लागू झालेल्या करप्रणाली, जागतिक उच्चांक, राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे अधिनियम, विविध योजना, चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील वैशिष्टय़पूर्ण कामगिरी यांचा समावेश करावा.

अभ्यासस्रोत – योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.

५. बुद्धिमापन चाचणी व मूलभूत गणितीय

कौशल्ये – ५.१) बुद्धिमत्ता चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी या घटकावर प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धी आणि बौद्धिक क्षमतेचाही कस पाहिला जातो. या विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त सराव आणि उजळणीची गरज असते.

५.२) मूलभूत गणितीय कौशल्य – यामध्ये मूलभूत अंकगणितीय कौशल्ये, अंक आणि त्यांचे परस्पर संबंध, अशा दहावीच्या स्तरावरील गणितीय क्रियांवर अधिक भर देणे अपेक्षित आहे.

अभ्यासस्रोत – वा. ना. दांडेकर यांची गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांची पुस्तके, सातवी स्कॉलरशिप, आठवी व नववीची टळरची पुस्तके आणि दहावीची ठळरची पुस्तके

६. अंकगणित – गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा-तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्त्वमापन व क्षेत्रमापन.

अभ्यासस्रोत – या घटकांचा अभ्यास पाचवी ते दहावीपर्यंतच्या अंकगणित विषयाच्या पाठय़पुस्तकातील उदाहरणसंग्रह सोडवून करावा.

७. पुस्तपालन व लेखाकर्म (Book Keeping and Accountancy)- लेखाकर्म अर्थ, लेखासंज्ञा, द्विनोंद पद्धतीची मूलभूत तत्त्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकीर्द, सहायक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रके तयार करणे, नफा न कामाविणाऱ्या संस्थांची खाती.

अभ्यासस्रोत – या घटकांचा अभ्यास करण्यासाठी बाजारात उपलब्ध असणारे पुस्तकपालन व लेखाकर्म या संदर्भातील उपलब्ध असणारे अभिजीत बोबडे यांचे पुस्तक वापरावे.

९. आर्थिक सुधारणा व कायदे – यामध्ये उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण या संकल्पना, त्यांचा अर्थ, व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, प्रश्न व समस्या, GST, VAT, विक्रीकर संबंधित कायदे व नियम या घटकांवर प्रश्नांचा अधिक भर असतो.

अभ्यासस्रोत – या घटकांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था हे दत्त व सुंदरम यांचे पुस्तक तसेच स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र भाग १ व भाग २ ही डॉ. किरण देसले यांची पुस्तके अभ्यासावीत.

महिलांसाठी संशोधनकिरण  केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे

महिला संशोधकांसाठी असणाऱ्या ‘नॉलेज इन्व्हॉल्वमेंट इन रिसर्च अ‍ॅडव्हान्समेंट नर्चरिंग’ म्हणजे ‘किरण’ योजनेअंतर्गत २०१८-१९ या शैक्षणिक सत्रामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात खालीलप्रमाणे संशोधनपर संधी उपलब्ध आहेत.

* योजनेअंतर्गत समाविष्ट विषय – योजनेअंतर्गत समाविष्ट विषयांमध्ये कृषी व संबंधित क्षेत्र, आरोग्य व सकस आहार, विज्ञान व तंत्रज्ञान विकास यासारख्या विषयातील संशोधनपर कामाचा समावेश आहे.

* आवश्यक पात्रता – अर्जदारांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रासह वरील विषयातील पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संशोधनपर कामाची रुची असायला हवी. संगणकाचे ज्ञान आवश्यक.

* पाठय़वृत्तीचा कालावधी व तपशील- ‘किरण’ योजनेअंतर्गत संशोधनपर फेलोशिपचा कालावधी तीन वर्षांपर्यंत असेल व त्यादरम्यान त्यांना खालीलप्रमाणे दरमहा संशोधनपर पाठय़वृत्ती देण्यात येईल.

एमएस्सी पात्रताधारक उमेदवारांसाठी दरमहा ३० हजार रुपये.

एमफील/ एमटेक पात्रताधारक उमेदवारांसाठी दरमहा ४० हजार रुपये. पीएचडी पात्रताधारक उमेदवारांसाठी दरमहा ५५ हजार रुपये.

*  अधिक माहिती व तपशील- वरील संदर्भात अधिक माहिती व तपशीलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची महिला संशोधकांसाठी असणाऱ्या ‘किरण’ संशोधन योजनेची जाहिरात पाहावी अथवा विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या http://www.dst.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

* अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज सायंटिस्ट एफ, किरण डिव्हिजन, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी भवन, न्यू मेहरोली रोड, नवी दिल्ली- ११००१६ या पत्त्यावर १६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.