दुय्यम सेवा (गट ब) संयुक्त पूर्व परीक्षेचे स्वरूप आणि या परीक्षेच्या तयारीसाठी विश्लेषणाची पद्धत याबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये मुख्य परीक्षेच्या नव्या स्वरूपाबाबत चर्चा करण्यात येत आहे तर पूर्व व मुख्य परीक्षेच्या तयारीबाबत पुढील लेखांमध्ये स्वतंत्रपणे चर्चा करण्यात येईल.

* मुख्य परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम विश्लेषण

सन २०१८च्या दुय्यम सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेच्या स्वरूपातही मागील वर्षीपेक्षा काही बदल करण्यात आले आहेत. या वर्षी मुख्य परीक्षेमध्ये पेपर एक हा तिन्ही पदांसाठी संयुक्त पेपर असणार आहे. आणि पेपर दोन हा सामान्य क्षमता चाचणी आणि त्या त्या पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानावर आधारित वेगळा अभ्यासक्रम यांवर आधारित असेल. केवळ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा तिसरा टप्पा असणार आहे.

एकूण दोनशे गुणांसाठी होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या दोन प्रश्नपत्रिका असतील व त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल.

अभ्यासक्रम पेपर १ (संयुक्त पेपर)

मराठी – सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्या

वरील प्रश्नांची उत्तरे.

इंग्रजी – Common vocabulary, Sentence structure, Grammer, Use of idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

* सामान्य ज्ञान – चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील

माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

* संगणक व माहिती तंत्रज्ञान – आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डेटा कम्युकिकेशन, नेटवर्किंग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधा मिळविण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॉब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य.

अभ्यासक्रम पेपर २ (पदनिहाय वेगळे)

हा पेपर दोन प्रत्येक पदासाठी स्वतंत्र आहे. पण यामध्ये पुढील घटक समान आहेत. –

बुद्धिमत्ता चाचणी महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल

* भारतीय राज्यघटना

यापुढचे चार / पाच घटक हे पदनिहाय वेगवेगळे आहेत.

याचा अर्थ या तिन्ही पदांसाठी मुख्य परीक्षा वेगळी घेण्यात येत असली तरी जवळपास ७० % अभ्यासक्रम या तीनही परीक्षांसाठी समान आहे आणि उर्वरित ३० % अभ्यासक्रम प्रत्येक परीक्षेत संबंधित पदाच्या मागणीनुसार वेगळा आहे. या वेगळ्या अभ्यासक्रमातही काही समान मुद्दे आहेतच. त्यामुळे पसंतीनुसार तिन्ही पदांसाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.

मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. तसेच प्रत्येक चार चुकीच्या उत्तरामागे एका प्रश्नाचे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतात. मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे सहाय्यक कक्ष अधिकारी व विक्रीकर निरीक्षक पदाची अंतिम यादी तयार करण्यात येऊन पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्र पडताळणी नंतर उमेदवारांची शिफारस करण्यात येईल. तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मात्र मुख्य परीक्षेनंतर १०० गुणांची शारीरिक चाचणी व त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची ४० गुणांची मुलाखत घेतली जाणार आहे. हे गुण एकत्रित करून तयार केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीच्या आधारावर उमेदवारांची शिफारस करण्यात येणार आहे.

मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणावरून या परीक्षांची काठिण्य पातळी वाढत असल्याचे दिसते. उपलब्ध पदे कमी जास्त झाल्यास त्याचा काठिण्य पातळीवर परिणाम होतोच, पण राज्यसेवा, नागरी सेवा या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचाही बॅक अप प्लॅन म्हणून दुय्यम सेवांसाठीच्या परीक्षा देण्याचा कल वाढत असल्याने काठिण्य पातळीमुळे कट ऑफवर फार मोठा परिणाम होत नसल्याचेही दिसते. त्यामुळे गांभीर्याने आणि योग्य दृष्टिकोनातून तयारी करणे हाच एकमेव पर्याय आता सर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर उपलब्ध आहे.