अपर्णा दीक्षित

आजच्या लेखात आपण यूपीएससीच्या निबंधाच्या पेपरची नेमकी मागणी काय असते हे पाहणार आहोत. २०१७मध्ये विचारल्या गेलेल्या विषयांची यादी पुढीलप्रमाणे –

Section – अ

Section – A

(1)    Farming has lost the ability to be a source of subsistence for majority of farmers in India.

(2)    Impact of the new economic measures on fiscal ties between the union and states in India.

(3)    Destiny of a nation is shaped in its classrooms.

(4)    Has the Non- Alignment Movement(NAM) lost its relevance in a multipolar world.

Section – B

(1)    Joy is the simplest form of gratitude.

(2)    Fulfillment of ‘new woman’ in India is a myth.

(3)    We may brave human laws but cannot resist natural laws.

(4)    Social media is inherently a selfish medium.

वरील विषयांची यादी बघता असे लक्षात येते की, एकूणच विषय आव्हानात्मक आहेत. शाळा- कॉलेजमध्ये ज्याप्रमाणे निबंध विषयांची निवड केली जात असे, तशी निवड यूपीएससी करताना दिसत नाही. त्याचबरोबर सर्वच विषय भारताच्या संदर्भातच लिहायचे आहेत असे बंधन नाही. त्याबद्दल सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे.

सर्वसाधारणत: सुविचारांवर आधारित, तत्त्वज्ञानाचा पाया असणारे किंवा जे अमूर्त विषय असतात, ते विषय लिहिणे जसे आव्हानात्मक असते तसेच गुणांच्या बाबतीत हमखास परतावा देणारेही असतात. या विषयांवर निबंध लिहीत असताना भारतातील उदाहरणे आणि संदर्भ देत असतानाच जागतिक स्तरावरील उदाहरणे आणि संदर्भही जरूर द्यावेत. वरील यादीतील ‘अ’ भागातील तिसऱ्या विषयात ज्याप्रमाणे भारतातल्या शिक्षण व्यवस्थेवर टिप्पणी करू शकतो, त्याचप्रमाणे जागतिक पातळीवरील अनेक उत्तम शैक्षणिक व्यवस्थांची उदाहरणेही देऊ शकतो. या प्रकारच्या निबंधांमधून व्यक्ती म्हणून आपण कोण आहोत त्याची प्रगल्भता विविध उदाहरणे, दाखले, नमुने यातून देता येते. असे करत असताना साहित्य, चित्रपट, संगीत, जगाचा इतिहास या सगळ्यातले संदर्भ वापरत लिखाण समृद्ध करता येते. याउलट सामान्य अध्ययनाशी निगडित विषय निवडत असताना एखाद्या विषयात आपण किती खोलवर जाऊ शकतो, विषयाची गुंतागुंत किती प्रगल्भपणे उलगडून दाखवू शकतो याचा कस लागतो. हे निबंध शक्यतो भारतीय वास्तवाला धरून लिहावेत. चच्रेच्या अनुषंगाने जागतिक पातळीवरचे मुद्दे येण्यास हरकत नाही, मात्र आपल्या आजूबाजूच्या वास्तवाचे आपल्याला भान आहे हे दाखवण्यासाठीची, हा निबंध ही उत्तम संधी आहे.

भाषा व शैली

व्याकरणाच्या दृष्टीने योग्य, सुटसुटीत व प्रभावी वाक्ये कोणत्याही चांगल्या निबंधाचे महत्त्वाचे घटक असतात. सुटसुटीत भाषा म्हणजे बोलीभाषा नाही. यूपीएससीच्या परीक्षेमध्ये दिल्या जाणाऱ्या निबंध विषयांवर लेखन करताना मजकुराबरोबरच भाषेचीही प्रगल्भता दिसणे आवश्यक आहे. एखाद्या मुद्दय़ाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कशा प्रकारे भर द्यावा, दोन वाक्यांमधील तर्कसंगती स्पष्ट करण्यासाठी कोणते शब्द वापरावेत, आपल्याजवळील माहितीचा वापर करून ठामपणे मत मांडत असताना अनावश्यक अधिकाराचा सूर कसा टाळावा या सर्व गोष्टी योग्य भाषेच्या वापरामधून साध्य होतात. प्रगल्भ विचार व भाषा यांचा वापर म्हणजे केवळ जड व मोठय़ा शब्दांची खिरापत नाही. ज्या शब्दांच्या अर्थाबद्दल आपल्याला खात्री नाही, असे शब्द वापरणे टाळावे. तसेच मोठे, अलंकारिक शब्द वापरल्यामुळे आपले लिखाण दिखाऊ होत नाही ना याची काळजी घ्यावी. मात्र आपले लिखाण जर नैसर्गिकरीत्या गुंतागुंतीचे व अनेक पातळ्यांवर विश्लेषण करणारे असेल तर, शब्दांचा वापर आपोआपच अधिक प्रगल्भ होत जातो.  प्रत्येक वाक्य छोटे व सुटसुटीत असेल याची खबरदारी घ्यावी. वाक्य मोठे झाल्यास योग्य ठिकाणी स्वल्पविराम, अर्धस्वल्पविराम, विसर्गचिन्हांचा योग्य वापर करावा. संपूर्ण अर्थबोध होऊ शकणार नाही इतकी मोठी वाक्ये करण्याचे मुळातच टाळावे. कोणतेही अर्थपूर्ण लेखन करण्याकरिता वरील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.