करिअर निवडीसारख्या महत्त्वाच्या निर्णयात विद्यार्थ्यांना मदत

करण्यासाठीच लोकसत्तातर्फे ‘मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. करिअर समुपदेशक विवेक वेलणकर यांनी करिअरचे राजमार्ग आणि वेगळ्या वाटा उलगडून दाखवल्या तसेच डोळसपणे करिअर निवडीचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

’   गुण नव्हे आवड महत्त्वाची

दहावीच्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये जरी शाखा निवडायची असेल तरी त्याची तयारी डिसेंबरपासून सुरू होत असते. विज्ञान, वाणिज्य, कला किंवा पदविका अभ्यासक्रम करायचे असे प्रश्न या वयातील मुलांना पडू लागतात. दहावीनंतरची विद्याशाखा ठरवताना फक्त गुणांचा विचार केला जातो. मात्र यावेळी आपली आवडही तपासा. बेस्ट ऑफ फाइव्हसारख्या प्रकारांमुळे कधी कधी मुलांचे खरे गुण नसून तो गुणवाढीचा फुगवटा आहे की काय, असे वाटू लागते. त्यामुळे केवळ टक्क्य़ांवर प्रवेश ठरवू नका. नाहीतर एखाद्या मुलाला असतात ८५ टक्के तो म्हणजे मला विज्ञान शाखेत जायचेय, पण वस्तुस्थिती अशी असते की, त्याला नेमके विज्ञानातच कमी गुण मिळालेले असतात. जास्त गुण मिळाले म्हणजे विज्ञान शाखा निवडायची आणि कमी गुण मिळाले की इतर शाखांकडे वळायचे हा पारंपरिक विचार डोक्यातून काढून टाकला पाहिजे. आपल्याला आवडतील, जमतील आणि झेपतील अशा विषयांची निवड करा. पालक, मित्र आणि त्या क्षेत्रातील जाणकारांची मदत घ्या. मात्र निर्णय स्वत:चा स्वत:च घ्या. शिवाय घेतलेल्या निर्णयाशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहा. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही क्षेत्रांत करिअरच्या समान संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.

’   होम सायन्सचा पर्याय

हा मुलींसाठी एक उत्तम पर्याय आहे. पण होम सायन्स म्हणजे फक्त स्वयंपाक असा गैरसमज असल्याने या विषयाकडे मुली वळतच नाहीत. खरी  परिस्थिती वेगळी आहे.  होम सायन्समध्ये अनेक उत्तम अभ्यासक्रम आहेत. होम मेकिंगपासून ते इंटिरिअर डेकोरेशन आणि इंटिरिअर डिझाइनचे अनेक विषय येतात. त्यामुळे पदवीनंतर स्वत:चा व्यवसाय करायला संधी आहे.

’   कलेच्या क्षेत्रातील संधी

रांगोळ्या, मेंदी, चित्र हे उत्तम काढणारे अनेकजण असतात. इयत्ता नववीपर्यंत त्याचे कौतुक होते. दहावी आल्यावर मात्र पालक या सगळ्या कला बासनात गुंडाळून ठेवायला सांगतात. खरे तर ज्यांच्या हातात कला आहे त्यांच्यासाठीही दहावीनंतर अनेक उत्तम पर्याय आहेत. फाइन आर्टचे अनेक पदवी, पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम या मुलांसाठी उपलब्ध आहेत. जे जे स्कूल ऑफ आर्टची प्रवेश परीक्षा मे महिन्यात होते. या परीक्षेसाठी रेखाटनाचेच चार पेपर असतात.

’   अभियांत्रिकी अभ्यासक्रम

अभियंता अर्थात इंजिनीअर व्हायचे असल्यास दहावीनंतर पदविका अभ्यासक्रम करून ते करता येते किंवा बारावीनंतर सीईटी देऊन करता येते. पदविकेनंतर थेट पदवीच्या द्वितीय वर्षांला प्रवेश घेता येतो. दोन्ही मार्गानी गेल्यास वेळ सारखाच म्हणजे ६ वर्षांचा लागतो. या दोन्हीपैकी कोणता मार्ग निवडायचा हा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायला हवा. इंजिनीअरिंगसाठी बायफोकल हा एक चांगला पर्याय आहे. पण त्यासाठी उगाच ओढाताण करू नका. बारावीनंतर इंजिनीअरिंगसाठी ७० शाखा आहेत. पण विद्यार्थी त्याकडे लक्षच देत नाहीत. काही अभ्यासक्रमासाठी तर एकेकच महाविद्यालये आहेत, तिथला प्रवेश त्यामुळे सोपाही होतो. उदा. पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल्ससाठी एमआयटी पुणे हे एकच आहे. एनव्हायरन्मेंटल इंजिनीअरिंगसाठी केवळ कोल्हापूरचे केआयटी कॉलेजच आहे. पॅकिंग टेक्नॉलॉजीसाठी केवळ पुण्याचे पीव्हीजी कॉलेजच आहे. या कॉलेजांतील विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकऱ्याही मिळतात. पण माहिती नसल्याने विद्यार्थी तिकडे जात नाहीत. एनव्हायरन्मेंटल इंजिनीअरिंगचे अनेक विद्यार्थी परदेशात एमएस करायला जाऊ शकतात. त्यामुळे बारावीची सीईटी झाल्यावर आधी या शाखांची माहिती करून घ्या. शिवाय आर्मी इंजिनीअरिंगचा पर्यायही आहेच. तो फक्त मुलांसाठी आहे. मात्र त्यासाठी कठोर मेहनत आहे.    इंजिनीअरिंगचे कॉलेज निवडताना जे जास्तीतजास्त नोकऱ्या देणारे असेल ते चांगले हा निकष लावला जातो.

’   कायद्याचे बोला

कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा गेल्या वर्षीपासून सुरू झाली आहे. ती पास झाल्यावर त्या गुणांच्या आधारे, कोणत्याही कायदा शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात ५ वर्षांचा अभ्यासक्रम करता येतो. मात्र यात नोकरीपेक्षा व्यवसायाच्या संधी जास्त आहेत.

’   हॉटेल मॅनेजमेंट/ बल्लवाचार्य

हॉटेल मॅनेजमेंटला जाण्यासाठी अकरावी-बारावी, एमसीव्हीसी कोणताही अभ्यासक्रम चालतो. अकरावी-बारावी हॉटेल मॅनेजमेंट असाही अभ्यासक्रम आहे. हा शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असून परीक्षा आणि प्रमाणपत्रही शासनाकडून दिले जाते. त्यामध्ये पाच विषय त्या त्या संदर्भातील कौशल्याचे असून इतर दोन विषय इंग्लिश, मराठी सर्वसामान्य विषय आहेत. त्यामध्ये वीस प्रकारचे अभ्यासक्रम असून त्यामध्ये विद्यार्थ्यांला त्या विषयाचे किमान ज्ञान दिले जाते. यातून विद्यार्थ्यांना पुढील प्रगती साधता येते किंवा त्याच गुणवत्तेवर स्वत:च्या पायावर उभे राहता येते.

हॉटेल मॅनेजमेंटसाठी बारावीनंतर विविध प्रवेश परीक्षा आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेतून देशातील ५२ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो. राज्यस्तरीय प्रवेश परीक्षेतून राज्यातील दहा महाविद्यालयांत प्रवेश मिळतो. याशिवाय हॉटेल मॅनेजमेंटच्या पदविकेचा पर्याय उपलब्ध आहे. बारावीच्या गुणांवर हॉटेल मॅनेजमेंटच्या पदविकेला प्रवेश मिळवता येऊ शकतो.

’   डिझायनिंगमधील वाव

फक्त विज्ञानच नव्हे तर कला आणि वाणिज्य शाखांतल्या विद्यार्थ्यांनाही आयआयटी पवईमध्ये शिकायची संधी मिळते. कारण आयआयटीने स्वत:चे डिझाइन स्कूल सुरू केले आहे. आयडीएस असे त्याचे नाव आहे. आयआयटी पवई, आयआयटी भुवनेश्वर या दोन्ही ठिकाणी ते असून त्यांच्यासाठी आयसीड ही प्रवेश परीक्षा आहे. कम्युनिकेशन डिझायनिंग, प्रोडक्ट डिझायनिंग आदी अभ्यासक्रम तिथे आहेत. डिझायनिंगसाठी एनआयडीचा पर्यायही आहेच. अहमदाबाद, बेंगळुरू, गांधीनगर या ठिकाणी या संस्था आहेत. त्यांच्या प्रवेशासाठी क्रिएटिव्हिटी स्किल आणि रेखाटने या दोनच गोष्टी पाहिल्या जातात. शिवाय फॅशन डिझायनिंग करायचे असेल तरीही अनेक पर्याय आहेत. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन डिझायनिंगसारखी उत्तम संस्था नवी मुंबईला आहे.

’   मास कम्युनिकेशन

माध्यमांचे महत्त्व आणि संख्या दोन्ही वाढल्याने या अभ्यासक्रमांना विशेष महत्त्व मिळाले आहे. मुंबईत झेविअर्स आणि पुण्यात सिम्बॉयसिस आदी संस्था यात चांगले प्रशिक्षण देत आहेत.

’   परदेशी भाषांमधील संधी

जर्मन, जापनीज, फ्रेंच, चायनीज, स्पॅनिश, पोर्तुगीज अशा अनेक भाषांच्या अभ्यासाला सध्या खूप महत्त्व आले आहे, कारण यात अनेक करिअरसंधी आहेत. भाषाप्रेमींनी या अभ्यासक्रमांचा जरूर विचार करावा. यातील चायनीज आणि जापनीजची लिपी चित्रलिपी आहे. मात्र अन्य भाषांमध्ये रोमन लिपी आहे त्यामुळे त्याचा फायदा होतो.

’   वाणिज्य शाखेतील व्यावसायिक शिक्षण

सीए, सीएस असे अनेक पर्याय या शाखेत आहेत. फक्त ज्यांच्या स्वभावात चिकाटी आहे, त्यांनी ते निवडावेत. यासाठी प्रवेश परीक्षा, मुख्य परीक्षा, पूर्वपरीक्षा अशी या परीक्षांची चौकट ठरलेली आहे. सीएला तीन वर्षांचा तर सीएसला दीड वर्षांचा सराव करावा लागतो. अभ्यासक्रम आणि कामाचा अनुभव या दोन्हीला त्यात महत्त्व आहे.

’   विज्ञान शाखा..

मेडिकल, इंजिनीअर, फार्मसी, बायोटेक्नॉलॉजी, रिसर्च असे पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतात. बायोलॉजी जमत नसेल तरी काही हरकत नाही. इंजिनीअरिंगला तर ती लागतच नाही. बायोला भूगोलाचा पर्याय आहे. फिजिक्सचा पाया भक्कम करण्यासाठी गणिताला पर्याय नाही.

’   मेडिकलमधील करिअर..

मेडिकलमध्ये नेहमीच्या एमबीबीएस, बीडीएसपलीकडेही अनेक संधी आहेत, पण त्याकडे मुले दुर्लक्ष करतात. फिजिओ थेरपी, स्पीच थेरपी, अ‍ॅक्युप्रेशर थेरपी, व्हर्टनरी सायन्स यात करिअरच्या अनेक संधी आहेत. फार्मसीलाही चांगला वाव आहे. प्राण्यांच्या डॉक्टरांना परदेशातही मागणी आहे. इन्शुरन्स कंपन्या आणि बँकांकडूनही प्राण्यांच्या डॉक्टरांची नेमणूक केली जाते. मुलींसाठी फिजिओ थेरपिस्ट हा चांगला अभ्यासक्रम आहे. फार्मसीसाठी प्रवेश परीक्षा असते. यात पदवी आणि पदविका अभ्यासक्रम आहेत. पण योग्य ते महाविद्यालय निवडून घ्यावे लागते.

’   र्मचट नेव्ही

दोन सरकारी महाविद्यालये या अभ्यासक्रमांचे शिक्षण देतात. बीएस्सी नॉटिकलचे शिक्षण मुंबई आणि कोलकत्याला मिळते. सोबत अनेक खासगी महाविद्यालयेही याचे शिक्षण देतात. मात्र यात कंत्राटी पद्धतींवर नोकऱ्या असतात. शिवाय हे साहसी माणसांचे करिअर आहे. यात मुलींनाही संधी आहेत.

’   वैमानिक होण्यासाठी..

वैमानिक होण्यासाठी सरकारी आणि खासगी दोन्ही मार्ग आहेत. एनडीएमध्ये प्रवेश मिळवून सरकारी खर्चाने वायुदलामध्ये यशस्वी प्रवेश करता येतो किंवा विमान चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधून शिक्षण घेऊन विमान चालवण्याचे व्यावसायिक परवाना मिळवता येतो. मात्र त्यासाठी सुमारे ३५ ते ३६ लाखांचा खर्च आहे. त्यासाठी रायबरेली येथे सरकारी कॉलेज असून त्याचे शुल्कही ३५ लाखांपर्यंत आहे.

 

प्रायोजक :  या उपक्रमाचे ‘टायटल पार्टनर’ पितांबरी तर असोसिएट पार्टनर विद्यालंकार क्लासेस होते. पॉवर्ड बाय पार्टनर्स अलिफ ओव्हरसीज, सक्सेस फोरम, रोबोमेट प्लस, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिटय़ूट, आयटीएम ग्रूप ऑफ इन्स्टिटय़ूशन, विद्यासागर क्लासेस आणि चार्टर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अकाऊंटन्ट्स, दिलकॅप कॉलेजेस अ‍ॅण्ड इन्स्टिटय़ूट्स, नेरळ, द युनिक अ‍ॅकॅडमी हे होते. तर हॉटेल टिप टॉप प्लाझा हे व्हेन्यू पार्टनर होते.

(शब्दांकन – श्रीकांत सावंत)