News Flash

शब्दबोध : चव्हाटा

चव्हाटा म्हणजे जेथे चार वाटा किंवा चार रस्ते एकत्र येतात ती जागा

डॉ. उमेश करंबेळकर

चव्हाटा म्हणजे जेथे चार वाटा किंवा चार रस्ते एकत्र येतात ती जागा. त्यालाच चौक असेही म्हणतात. चार वाटा एकत्र येत असल्यामुळे चव्हाटा हा नेहमीच रहदारीने गजबजलेला असतो. अशा ठिकाणी दुकान थाटल्यास मालाची विक्रीही चांगली होते. त्यामुळेच व्यापारासाठी मोक्याची जागा म्हणून चव्हाटय़ाकडे पाहिले जाते.

पूर्वीच्या काळी जेव्हा वर्तमानपत्रे किंवा दूरदर्शनसारखी प्रसारमाध्यमे मोठय़ा प्रमाणावर किंबहुना नव्हतीच, तेव्हा हा चव्हाटा प्रसार-माध्यमाचे कार्य करायचा. चव्हाटय़ाच्या ठिकाणी वेगवेगळ्या भागातले प्रवासी येत. त्यांच्या बोलण्यातून दूरदेशींच्या वार्ता कळत. त्याचबरोबर स्थानिक बातम्या, घडामोडीही दूरच्या प्रवासाला जात. त्यामुळे एखादी गोष्ट चव्हाटय़ावर झाली की ती जगजाहीर झाली असे समजले जाई.

म्हणूनच एखाद्या व्यक्तीची वा  घराण्याची चारचौघांत चव्हाटय़ाच्या ठिकाणी नाचक्की झाली म्हणजे ‘अब्रू चव्हाटय़ावर मांडली’ असा अर्थ होई. त्यातूनच ‘अब्रू चव्हाटय़ावर मांडणे’ असा वाक्-प्रचार रूढ झाला. ‘घरातलं भांडण उंबऱ्याच्या आत ठेवावं.  चव्हाटय़ावर मांडू नये.’असा उपदेश वडीलधारी मंडळी करत.

चव्हाटा म्हणजे चार वाटा एकत्र येणे. तर अव्हाटा म्हणजे ज्या वाटेने जाऊ  नये अशी वाट, म्हणजेच आडमार्ग. चव्हाटय़ाला संस्कृत शब्द आहे चतुष्पथ. ज्ञानेश्वरीत चव्हाटा, अव्हाटा हे शब्द अनेक वेळा आले आहेत. तसाच चतुष्पथही एका ओवीत आला आहे. ती ओवी अशी :

तैसें प्रयाग होत सामरस्याचें

वरी वोसण तरत सात्त्विकाचें

ते संवाद चतुष्पथींचें गणेश जाहले

या ओवीतून गणेश या देवतेच्या प्राचीन काळातील स्वरूपाबाबत माहिती मिळते. गणेश हा मुळात ‘विघ्नकर्ता.’ परंतु त्याची स्तुती केल्यास तो ‘विघ्नहर्ता’ होतो, अशी प्राचीन काळी समजूत होती. सुरुवातीच्या काळातील काही ग्रंथांमध्ये विनायकांचा उल्लेख उपद्रवी असा येतो आणि त्यांची तुष्टी करण्यासाठी हमरस्ते जेथे एकमेकांना छेदतात अशा जागी म्हणजे चव्हाटय़ावर त्यांना नैवेद्य ठेवावा असे सांगितले आहे. त्यातून पुढे गणेश उपासना सुरू झाली आणि गुप्त काळात स्वतंत्र गणेश मंदिरे अस्तित्वात आली. ज्ञानेश्वरीत आलेला ‘चतुष्पथींचे गणेश’ हा उल्लेख त्या प्रथेवर आधारित असावा. अर्थात आजही अनेक लहानमोठय़ा शहरात, सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नावाखाली अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तीचे विसर्जन न करता, चौकातल्या मोक्याच्या जागी त्यांची स्थापना करून’ भक्तीची दुकाने’ उघडलेली पाहिली की चतुष्पथींचे गणेश या विधानाची सत्यता पटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 2:27 am

Web Title: vocabulary 2
Next Stories
1 प्रश्नवेध एमपीएससी : राज्यव्यवस्थेवरील सराव प्रश्न
2 करिअर मंत्र
3 एमपीएससी मंत्र : राज्यव्यवस्था घटकाची तयारी
Just Now!
X